Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 July 2010

उत्कर्षाला मारण्यामागचे कारण काय?

संशयित ताब्यात असूनही उलगडा नाही
पणजी व वाळपई, दि. २८ (प्रतिनिधी)- उत्कर्षा परब हिला का मारण्यात आले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी गेल्या चार दिवसांपासून वाळपई पोलिसांच्या ताब्यात असूनही याचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. उत्कर्षाला विष पाजून मारण्यासारखे एवढे काय घडले होते, असा प्रश्न सध्या सर्व जनतेला पडलेला आहे.
उत्कर्षा परब मृत्युप्रकरण सध्या सत्तरी तालुक्यात गाजत असून या प्रकरणी ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्यांची केवळ बदली करून भागणार नाही तर त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे, अशी जोरदार मागणी तालुक्याच्या विविध भागांतून होत आहे. नगरगाव पंचायतीच्या ग्रामसभेतही त्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. निरीक्षक शिवराम वायंगणकर दबावाखाली असून योग्य तपासकाम करीत नसल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होत आहे. याच भागात काही महिन्यांपूर्वी गाडगीळ या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येच्या तपासकामाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
उत्कर्षाचे १६ जुलै रोजी तिच्या मामीने अपहरण करून तिला धबधबावाडा येथे डांबून ठेवले होते. याबाबतची रीतसर तक्रार व नंतर एफआयआर (क्र. ३७/१०) वाळपईचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्यासमक्ष दि. १६ रोजी दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला संशयित आरोपीवर भा.दं.सं. कलम ३६३, ३४२, ३२३ व गोवा बालहक्क कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे उत्कर्षा मुलगी असून तिचे वय १६ वर्षे असल्याने अपहरणानंतर तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची योग्यरीत्या वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक होते. परंतु, तिची तपासणी कोणत्या धर्तीवर झालेली आहे, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्कर्षाने दिलेल्या माहितीनुसार तिला मामीने शिरा व कोल्ड डिं्रक दिले होते. शिवाय पोलिसांनी १७ रोजी तिची चौकशी केली का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलिस स्थानकात तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी योग्य वागणूक दिली पाहिजे. असे असताना उत्कर्षाच्या वडिलांना जी वागणूक मिळाली त्यासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना निलंबित केले नाही तर नागरिकांत चुकीचा संदेश जाईल. यामुळे, दोषी पोलिसांना निलंबित न केल्यास वाळपई शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments: