Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 27 July 2010

वेर्णा अपघातात दुचाकीस्वार ठार

वास्को, दि. २६ (प्रतिनिधी): नोकरीसाठी वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना "व्हेगन-आर'ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन ज्ञानेश्वर सुतार (२०, बेतोडा फोंडा) याचे निधन झाले. दत्तराज तारकर पेडणेकर (२२, फातोर्डा मडगाव) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आज सकाळी ९.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. केए ४४ एच ४७७० क्रमांकाच्या हिरो होंडावर स्वार सचिन व दत्तराज आयडीसी वसाहतीजवळ वळले असता समोरून कुठ्ठाळीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या "व्हेगन-आर' (जीए ०६ टी १४६५) गाडीने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात सचिन व दत्तराज यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. दोघांना उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले, उपचार घेत असता ११ वाजता सचिनचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून "व्हेगन-आर'चालक रमेश भंडारी (५४, एमपीटी वसाहत सडा) याला अटक केली आहे. सचिनचा मृतदेह हॉस्पिसियोच्या शवागारात ठेवण्यात आला असून उद्या शवचिकित्सा होणार आहे.
वेर्णा पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करीत आहेत.

No comments: