Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 25 July 2010

मुंबई, कोकणला पावसाने झोडपले

मुंबई, दि. २४ - मंबई शहर, उपनगरासह ठाणे जिल्हा आणि कोकणपट्टीला आज पहाटेपासून धुव्वाधार पावसाने झोडपून काढले. जराही विश्रांती न घेता वरुणराजा मुंबापुरीवर बसरत असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आणि स्वाभाविकच रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. सुदैवाने, या पावसाचा परिणाम रेल्वे वेळापत्रकावर झाला नाही.
काल दिवसभर उघडझाप असलेला पाऊस आज पहाटे पुन्हा मुंबईत प्रकट झाला. यावेळी त्याचा नूर काही वेगळाच होता. आज थांबायचे नाही, असे ठरवूनच बहुधा तो आला असावा. पहाटे सुरू झालेला पाऊस दहा वाजेपर्यंत जराही उसंत न घेता कोसळत होता. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांच्या नशिबाने, एवढ्या पावसातही पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू होती. शनिवार-रविवार सुटी असलेल्या नोकरदारांनी मात्र घरी बसून या पावसाचा आनंद लुटला.
पावसाच्या या संततधारेने अंधेरी, परळ या सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवेतील वाहतूक काही काम बंदही करावी लागली होती. हिंदमाता परिसरात नागरिकांना पाण्यातून वाट काढणे जिकिरीचे झाले होते. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यालाही पहाटेपासून पावसानं झोडपून काढलं असून ठाणे,
कोकणात धुमशान
अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, पालघर, मीरा-भाईंदरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरू आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाचा धडाका सुरूच आहे.
त्यामुळे अनेक नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच मुख्य शहराच्या अनेक भागात पाणी शिरल्याने रहिवाशांची अवस्था दयनीय बनली आहे. सावित्री, गांधारी, काळ नद्या दुथडी भरून वाहत असून रायगडमध्ये एक महिला वाहून गेल्याचे वृत्त आहे. हा या जिल्ह्यातील चौथा पूरबळी ठरला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा भरली
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून ६० गावांचा संपर्क तुटला आहे. सुमारे १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचे पात्र ३१ फुटांपर्यंत भरले असून असून धोक्याची पातळी ३९ फूट इतकी आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहर परिसरात वादळी वाऱ्यांमुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. परिणामी शहरातील रस्ते बंद झाले आहेत.

No comments: