Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 March 2010

सेंट झेव्हियर कॉलेजच्या रक्षकास ड्रगप्रकरणी अटक

९० हजारांचा चरस जप्त
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांना चरस तसेच अन्य अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी म्हापशातील सेंट झेवियर महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला काल रात्री अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून अटक केली. त्याच्याकडे ८५० ग्रॅम चरस आढळून आला असून त्याची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याची माहिती या पथकाचे अधीक्षक वेणू बन्सल यांनी दिली.
अटक केलेल्या या सुरक्षा रक्षकाचे नाव बहादूर भगतसिंग (५०) असे आहे. मूळ नेपाळी असलेला हा सुरक्षा रक्षक म्हापसा येथील एकतानगर हाऊसिंग कॉलनीत राहतो. गेल्या २० वर्षापासून तो सदर महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे त्याचा हा व्यवसायात गेल्या १५ वर्षांपासून सुरू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयित आरोपी बहादूर याला दुपारी न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
महाविद्यालयाच्या आवारात अमली पदार्थाची विक्री होणे ही अत्यंत गंभीर बाब असून राज्यातील अन्य महाविद्यालयांच्या व्यवस्थापन मंडळांनीही अशा गोष्टींकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन श्री. बन्सल यांनी केले आहे. अन्य काही महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असून त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
"दुदू' या ड्रग माफियाला अटक करून अमली पदार्थविरोधी पथकाने सामान्य जनतेचा विश्वास संपादन केल्याने गेल्या काही दिवसांपासून या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाशी संपर्क साधून या महाविद्यालयाच्या आवारात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती या पथकाला दिली होती. तसेच, हा छापा टाकण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून योग्य ती माहिती या पथकाच्या पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे सुमारे १५ वर्षांपासून महाविद्यालयाच्या आवारात आणि परिसरात सुरक्षा रक्षकाने अमली पदार्थ विक्रीचा सुरू केलेला धंदा बंद करण्यात या पथकाला यश आले.
संशयित आरोपी बहादूर याच्या प्राथमिक चौकशीत तो गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात गुंतल्याचे उघड झाले आहे. महाविद्यालयाचा सुरक्षा रक्षकच अमली पदार्थांची विक्री करतो आणि याचा पत्ताही महाविद्यालय व्यवस्थापनाला लागत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस अधीक्षक बन्सल व उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गुडलर, सोमनाथ माजिक व त्यांच्या सहकारी पोलिसांनी ही कारवाई केली.

बांदोडकर जन्मशताब्दीचा आज विशेष कार्यक्रम

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यातील मुख्य कार्यक्रम पणजीत होणार आहे. मिरामार येथील भाऊंच्या समाधीवर सकाळी मुख्यमंत्री व अन्य नेते पुष्पांजली वाहतील.
संध्याकाळी ४ वाजता कांपाल येथील बांदोडकर मैदानावर जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित असतील. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, रमाकांत खलप व लुईस आलेक्स कार्दोझ उपस्थित राहाणार आहेत. राज्यभरातील भाऊप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर "स्वरसुमनांजली' हा पद्मजा फेणाणी जोगळेकर, मंजुषा कुलकर्णी, रवींद्र साठे व विजय कोपरकर यांचा सहभाग असलेला कार्यक्रम होणार असून, त्याचे सूत्रसंचालन मंगला खाडीलकर करणार आहेत.

'सोनियाजी! आरक्षणाचा फायदा कलावतीस मिळेल?'

नवी दिल्ली, दि. ११ (रवींद्र दाणी): तिघा यादवांनी काल वादविवाद करून लोकसभा बंद पाडली होती, तर आज त्याच तिघा यादवांनी युक्तिवाद करून लोकसभा जवळपास जिंकली होती.
महिला आरक्षणाच्या मुद्यावर सभापती मीराकुमार यांनी लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व शरद यादव या तिघांनाही आज बोलण्याची संधी दिली. यात बाजी मारली ती लालूप्रसाद यादव यांनी. आपल्या १२-१४ मिनिटांच्या भाषणात लालूप्रसाद यादवांनी सर्वांना जमीनदोस्त केले. लालूप्रसादांच्या ३३ वर्षांच्या राजकीय जीवनातील त्यांचे हे एक सर्वोत्तम भाषण असावे. लालू प्रसाद बोलत होते, ""सोनियाजी! राज्यसभेत महिला विधेयक पारित झाल्यावर कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर जो "डांस' करण्यात आला, ती आपली संस्कृती नाही, ती आमची सभ्यता नाही. आरक्षण या महिलांना मिळणार आहे काय?
""सोनियाजी! मी आरक्षणाच्या विरोधात नाही. कलावतीचे नाव आपण फार ऐकले आहे. आरक्षणाचा फायदा कलावतीस मिळणार आहे काय? गोरगरीब महिलांना मिळणार आहे काय?
""सोनियाजी! राहुलजी युवा नेता आहेत. मी तर राजकारण भरपूर पाहिले आहे. अनुभवले आहे. मी तर कसाही निवडून येईन, तुम्ही तुमच्या पक्षाचे पहा!''
मार्क्सवादी पक्षाचे नेते वासुदेव आचार्य यांचा उल्लेख करीत लालूप्रसाद म्हणाले, तुम्ही ना हिंदुस्थानात आहात ना पाकिस्तानात. आमचा विश्वास मतता दीदीवर आहे. मुस्लिम आरक्षणाबाबत ममतानेच पुढाकार घेतला. तुमच्या हाती काय राहिले?
भाजपा-कॉंग्रेस खासदारांकडे पहात लालूप्रसाद म्हणाले, सर्व पक्षांचे खासदार माझ्याकडे येऊन विधेयकाला विरोध करण्याची विनंती करीत आहेत. मी त्यांना सांगतो, तुम्हीच आपापल्या पक्षाच्या नेत्यांना समजावून सांगा.
शेवटी सभापती मीराकुमार यांचा "समाचार' घेताना लालूप्रसाद म्हणाले, काही वेळेस दुरून बोललेले ऐकू जात नाही. जवळ जाऊन बोलावे लागते. जे मी दोन-तीन दिवसांपासून करीत आहे. त्यात माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. सभापतींनी लालूप्रसादांना भाषण आवरण्याची सूचना करताच हजरजबाबी लालूप्रसाद उत्तरले, ""आज तर मी दुरूनच माझ्या आसनावरून बोलत आहे. तुम्ही मला पूर्ण बोलू दिले नाही तर पुन्हा जवळ येऊन, "वेल' मध्ये येऊन बोलावे लागेल.'' लालूच्या या विधानावर सभागृहात हास्याचा खळखळाट झाला. पुन्हा गोंधळ सुरू झाला आणि सभागृह पुन्हा स्थगित झाले. त्यानंतर सुरू झाला लालूप्रसादांवर अभिनंदनाचा वर्षाव!

रेल्वेच्या धडकेने बिबटा मृत्युमुखी

काणकोण, दि. ११ (प्रतिनिधी): घोडेव्हाळ - बाळ्ळी येथे काल रात्री तीनच्या दरम्यान रेल्वेला आदळल्यामुळे एक बिबटा मृत्युमुखी पडला. आज संध्याकाळी रुळांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा मृत बिबटा दिसला. त्याचा पुढचा एक मागचा एक पाय तुटला होता. जबड्यालाही जखमा झाल्या होत्या. यासंबंधी वन्यजीव संरक्षण केंद्राला कळवण्यात आले. पशुचिकित्सक प्रशांत नाईक यांनी मृत बिबट्याची तपासणी केल्यानंतर त्याला दफन करण्यात आले.

Thursday, 11 March 2010

शिरोडकर, पोकळेविरुद्ध गुन्हा नोंद

भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान रचल्याचा आरोप
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): निलंबित पोलिस अधिकाऱ्यांचे ड्रग्स माफियांशी साटेलोटे असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने आज पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर आणि पोलिस शिपाई साईश पोकळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयीची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली.
भा.दं.सं. १२०(ब) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, ११ व १२ नुसार गुन्हा अन्वेषण विभागाने हा गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, ड्रग्स व्यवसायात गुंतलेले निलंबित पोलिस अधिकारी आणि पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली होती.
कोणताही पोलिस अधिकारी अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवून त्याला मदत करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही आज पोलिस उपमहानिरीक्षक यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच या निलंबित पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यास गुन्हा अन्वेषण विभाग समर्थ असल्याचाही दावा श्री. यादव यांनी यावेळी केला. दरम्यान, डॉ. केतन गोवेकर यांनी निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्या विरुद्ध ड्रग्स माफियांशी संबंध ठेवल्याचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध पणजी पोलिस स्थानकात काल रात्री तक्रार सादर केली आहे.
--------------------------------------------------------------------
अटालाचा ताबा क्राईम ब्रांचकडे
पेडणे आणि हणजूण पोलिसांतर्फे काल सापळा रचून अटक करण्यात आलेला यानिव बेनाईम ऊर्फ "अटाला' याचा गुन्हा अन्वेषण विभागाने ताबा घेतला. तसेच, त्याला न्यायालयात उपस्थित करून सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटाला याला सरकारी अधिकाऱ्याला लाच दिल्याच्या प्रकरणाखाली अटक करण्यात आली आहे.
अंमलीपदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकारी कशा पद्धतीने आपल्याशी मैत्री ठेवून आहेत, तसेच आपण त्यांना कसे पैसे पुरवतो, याची माहिती देणारा व्हिडिओ संकेतस्थळावर झळकल्याने निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यासह चार पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले होते. तसेच त्याचा तपास करण्याची सूत्रे गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आली होती.
यावेळी झालेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्याने आज सकाळी त्यांच्या विरोधात सुओमोटू पद्धतीने गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे "अटाला'ने आपण या अधिकाऱ्यांना पैसे देत होते, अशी जबानीही या विभागाला दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
--------------------------------------------------------------------------
पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती देण्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने पोलिस मुख्यालयात जमलेल्या पत्रकारांनी शेवटी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना कार्यालयातून बाहेर जाताना गाठले. आपण काहीही बोलणार नसून पोलिस उपमहानिरीक्षक सर्व माहिती देईल असे सांगून ते पुन्हा कार्यालयात निघून गेले. त्यानंतर आधी टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने लगेच पत्रकार असलेल्या कक्षात येऊन पत्रकारांना सर्व माहिती दिली.
----------------------------------------------------------------------------
पोलिसच पोलिसांची चौकशी करीत असल्याने त्यात शंका घ्यायला जागा शिल्लक राहते. त्यामुळे याची "सीबीआय'मार्फत चौकशी करण्यासाठी येत्या दोन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा पंचायतींच्या निकालावरून विधानसभेचे अंदाज बांधणे चुकीचे

पर्रीकर यांचे स्पष्टीकरण
मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): जिल्हा पंचायत निवडणुका ह्या पक्षीय स्तरावर लढविल्या गेलेल्या नाहीत व त्यामुळे कोणा पक्षाला बळकटी मिळण्याचा किंवा कोणाचा सफाया होण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. या निकालावरून विधानसभा निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही असे सांगून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत समर्थन दिलेले व पक्षासाठी इभ्रतीचे असलेल्या सर्व जागा जिंकलेल्या आहेत असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले.
पंचायत किंवा जिल्हा पंचायतींना सरकारबरोबरच राहणे क्रमप्राप्त असते, त्यामुळे निवडून आलेल्यांनी आता काहीही सांगितले तरी आपण त्यांची चूक मान्य करत नाही; पण काही राजकारणी आता जो विजयाचा दावा करीत आहेत त्याला आपला आक्षेप असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. एवढा आत्मविश्र्वास होता तर त्या निवडणुका पक्षीय स्तरावर का लढविल्या गेल्या नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दक्षिण गोव्यात जर त्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे तर उपाध्यक्षपद भाजप समर्थकाला देण्याचे औदार्य कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. सरकारबरोबर राहिले नाही तर कॉंग्रेसवाले या संस्थांची विकासकामात प्रत्येक ठिकाणी अडवणूक करतात हा आजवरचा अनुभव आहे. आपण मुख्यमंत्री असताना अशा सर्वच संस्था सरकारबरोबर होत्या. उद्या भाजप सरकार आले तर त्यांची पुन्हा रांग लागेल, असेही ते म्हणाले.
या निवडणुकांवरून विधानसभा निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही असे सांगून विजयी झालेल्या उमेदवारांची मते एकत्र केली तरी ती लाखावर जाणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी नको म्हणून काही ठिकाणी आपण मध्यस्थीसाठी गेलो व त्यात यश आले. अपवाद फक्त फातर्पा मतदारसंघाचा होता. तेथे शेवटच्या दोन तीन दिवसांत आपण पोचलो, अगोदर गेलो असतो तर ती जागाही पक्षाच्या समर्थकाला मिळाली असती, असे ते म्हणाले.

महागाईविरोधात संसदेला घेरावास गोव्यातून भाजपचे हजार कार्यकर्ते

महिनाभराच्या कार्यक्रमाबाबत मडगाव बैठकीत मार्गदर्शन
मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): भाजपने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या महागाईविरोधी आंदोलनाअंतर्गत येत्या २१ मार्च रोजी संसदेला घेराव घातला जाणार असून त्यात गोव्यातून हजारावर भाजप कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. महागाईविरोधात दोन लाखांवर सह्या जमविण्याचे लक्ष्यही भाजपने ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा भाजपने सदर आंदोलनाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. पक्षाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार दामोदर नाईक, रमेश तवडकर, महादेव नाईक, संघटनमंत्री अविनाश कोळी, विनय तेंडुलकर, राजेंद्र आर्लेकर, नरेंद्र सावईकर, कमलिनी पैंगीणकर, छाया पै खोत व्यासपीठावर उपस्थित होत्या.
पुढे बोलताना पर्रीकर यांनी हा आंदोलन कार्यक्रम जिल्हास्तरावर आयोजित करण्याचे काम संबंधित समित्यांना देण्याचे काम स्तुत्य असल्याचे सांगून पक्षाच्या विस्ताराबरोबर अशा प्रकारे कामे वाटून देण्याची गरज व्यक्त केली. समाजाच्या तळागाळातील व्यक्तींशी संपर्क ठेवण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळेच सासष्टीतील बहुतेक सर्व भागांत पक्षाला स्थान मिळाले असल्याचे ते म्हणाले. आमदाराने घरोघरी भेट देण्याची पद्धत आपण सर्वप्रथम सुरू केली व ती विलक्षण यशस्वी ठरली. या आंदोलनासाठीही तीच योजना अंमलात आणण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या बैठकीत अध्यक्ष पार्सेकर यांनी महागाईविरोधी आंदोलनाची एकंदर रूपरेषा स्पष्ट केली. प्रत्येकाची या आंदोलनातील भूमिका कशी असेल याचे विश्लेषण त्यांनी केले. येत्या चार दिवसांचा आंदोलन कार्यक्रम निश्र्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आजपासून सुरू झालेले हे आंदोलन २१ एप्रिल पर्यंत चालणार असे सांगून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पार्सेकर यांनी केले.
आमदार दामोदर नाईक यांनी आपल्या भाषणात जिल्हापंचायतीच्या निवडणूक निकालांच्या आधारे कॉंग्रेसची तळी उचलून धरणारी प्रसारमाध्यमे लोकांची दिशाभूल करीत असल्याचा ठपका ठेवला. गगनाला भिडलेल्या महागाईस कॉंग्रेस सरकार व त्याचे दलाल जबाबदार असल्याचा आरोप करताना अशा प्रकारे मिळालेला पैसा निवडणुका जिंकण्यासाठी वापरात आणला जातो, असे त्यांनी सांगितले. गोव्यात चालणाऱ्या बेकायदा खाणव्यवसायावरही त्यांनी जोरदार टीका केली. आमदार नाईक यांनी वाढत्या महागाई विरोधात ठराव मांडला व त्याला आमदार महादेव नाईक व कृष्णी वाळके यांनी अनुमोदन दिले. नंतर टाळ्यांच्या गजरात ठराव संमत करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन रुपेश महात्मे यांनी केले.

तिघा यादवांनी ९० सेकंदात लोकसभा बंद पाडली!

नवी दिल्ली, दि. १० (रवींद्र दाणी): ५४५ सदस्यांची लोकसभा आज तिघा यादवांनी ९० सेकंदात बंद पाडली. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधाची भयावहता आज १२ वाजता लोकसभेत दिसली.
सकाळी ११ वा. कामकाज सुरू झाल्यावर याच मुद्यावर सभागृह १७ मिनिटात दुपारी १२ पर्यंत तहकूब झाले होते. १२ वाजता कामकाज सुरू झाले. कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व सभागृहाचे नेते अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आपापल्या आसनावर विराजमान होते. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राजनाथसिंह सभागृहात होते. सभापती श्रीमती मीराकुमार आपल्या आसनावर बसताच शरद यादव, लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव सभापतींच्या आसनाजवळ जाऊन, काल राज्यसभेत मार्शलचा वापर करण्याबाबत एवढ्या तीव्रतेने विरोध करू लागले की स्तब्ध व हतबद्ध सभापतींनी ९० सेकंदात सभागृहाचे कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केले.
तीव्र प्रतिक्रिया
राज्यसभेत काल विधेयकास विरोध करणाऱ्या ७ खासदारांना हटविण्यासाठी १०० मार्शल सुरक्षा जवानांचा वापर करण्यात आला. या जवानांनी खासदारांना मारहाण केल्याचे समजते. त्याची अतिशय तीव्र प्रतिक्रिया लोकसभेत उमटत होती. जदयु, सपा व राजद खासदारांनी खासदारांच्या मारहाणीस विरोध केला. हा विरोध एवढा तीव्र होता की, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी व सुषमा स्वराज स्तब्ध झाले होते. या पक्षांचा राग सरकारवर होताच, भाजपावरही होता. सभागृह स्थगित झाल्यावर सपा, राजद व जद (यु) चे खासदार श्रीमती सुषमा स्वराज यांच्याशी वाद करताना दिसत होते.
भाजपात नाराजी
राज्यसभेतील खासदारांच्या मारहाणीबाबत भाजपाचे खासदारही नाराजी नोंदवीत होते. भाजपाच्या काही खासदारांमध्ये तीव्र संताप व नाराजी होती. खासदारांना मारहाण करून सरकार हे विधेयक लोकसभेत पारित करवून घेणार असेल, तर पक्षाने आपल्या भूमिकेवर फेरविचार केला पाहिजे, असे मत खासदार नोंदवीत होते. सरकारने काल सपा-राजद खासदारांना मारहाण करवून विधेयक पारित करवून घेतले. "उद्या असाच प्रसंग आमच्यावर येऊ शकतो,' अशी तीव्र भावना भाजपा खासदार नोंदवीत होते.
ममता ठाम!
दरम्यान, रेल्वेमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचे समजते. आम्ही या विधेयकास पाठिंबा देऊ, मात्र तत्पूर्वी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून मुस्लिम कोटा ठरविण्याबाबत विचार करण्यात यावा, असे ममता बॅनर्जींनी सरकारला सांगितले असल्याचे समजते.

...तर 'एसीजीएल'ला टाळे ठोकावे लागेल!

पाच हजार कुटुंबासमोर भीषण संकट
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): होंडा भूईपाल येथील "ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा' (एसीजीएल) कंपनीच्या नियमित कामगारांनी वेतनवाढीच्या मुद्यावरून अवाजवी मागणी करीत सध्या संपूर्ण कंपनीलाच वेठीस धरले आहे. कंपनीकडून किमान महिना ४ हजार रुपये वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करूनही कामगार संघटनेकडून मात्र नऊ हजार रुपये प्रतिमहिना वाढ देण्याचा हट्ट धरला जात आहे. एवढी वाढ देणे कंपनीला शक्य नाही, याची प्रांजळपणे कबुली देऊनही या कामगारांनी गेल्या २८ फेब्रुवारीपासून उत्पादन बंद ठेवल्याने प्रत्येक दिवसाला १.२५ कोटी रुपयांचा तोटा कंपनीला सहन करावा लागतो आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर कंपनीला टाळे ठोकणे अपरिहार्य ठरेल व त्यामुळे किमान ५ हजार कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सत्तरी तालुक्यातील होंडा येथे असलेली "एसीजीएल' ही राज्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीत नियमित, कंत्राटी व इतर मिळून सुमारे दोन ते अडीच हजार कामगार काम करतात व त्यातील किमान ७५ टक्के मूळ गोमंतकीय आहेत, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. याबरोबर या कंपनीला सुटे भाग पुरवठा करणारे अनेक लघू उद्योग विविध औद्योगिक वसाहतीत कार्यरत असून त्यांचेही उत्पन्न या कंपनीवरच अवलंबून आहे. कंपनीच्या सुमारे ३२५ नियमित कामगारांनी सध्या आपल्या मागणीसाठी ८०० कंत्राटी कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. नियमित कामगारांच्या वेतनात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. यावेळी ही वाढ सुमारे चार हजार रुपये प्रतिमहिना देण्याचे कंपनीने ठरवले असता संघटना मात्र नऊ हजार रुपयांवर ठाम राहिली आहे. कंपनीकडून सादर केलेली वाढ दिल्यास या कामगारांना किमान २२५०० रुपये वेतन प्रती महिना मिळू शकेल. टाटा मोटर्स या कंपनीला मोठ्या प्रमाणात आपले उत्पादन पाठवणाऱ्या "एसीजीएल'समोर कामगारांच्या या भूमिकेमुळे त्रांगडे उभे झाले आहे. टाटा मोटर्सने आपली ऑर्डर रद्द केली तर कंपनी बंद करण्याची नामुष्की ओढवणार आहे. टाटा कंपनीतर्फे धारवाड येथे नवीन विभाग सुरू करण्यात आला असून तिथे प्रतिवर्ष सुमारे तीस हजार बसगाड्या तयार करण्याची क्षमता ठेवली आहे. टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन या परिस्थितीचा आढावाही घेतला असून अप्रत्यक्ष कंपनीला निर्वाणीचा इशाराच दिला आहे.
या कंपनीत राज्य सरकारचाही भाग आहे व त्यामुळे राज्य सरकारने कामगार खात्यामार्फत हस्तक्षेप करून या परिस्थितीवर तोडगा काढावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. कामगार आयुक्तांना या प्रकाराची माहिती करून दिली आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. कंपनीकडे सध्या विविध ठिकाणी पुरवठ्याच्या ऑर्डर्स पडून आहेत व त्यांना वेळेत बसगाड्या पाठवण्याची गरज आहे. टाटा मोटर्सची ११०० बसगाड्यांची ऑर्डर आहे तर सौदी अरेबियाची सुमारे शंभर वातानुकूलित बसगाड्यांचीही ऑर्डर मिळण्याची शक्यता असल्याचीही माहिती समोर आली आहे.
ही कंपनी २००० साली बंद करण्याच्या मार्गावरच होती पण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून या कंपनीला टाटा मोटर्स कंपनीशी सांगड घालून देत ही कंपनी जिवंत ठेवली. सध्या राज्य सरकारकडे ६.५ टक्के व टाटा मोटर्सकडे ४३ टक्के समभाग आहेत. सरकारने तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करून या विषयावर तोडगा काढावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम कंपनीवर ओढवू शकतात, अशीही भीती व्यक्त होत आहे.
कामगार संघटनेकडून निषेध
"एसीजीएल' कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनांतर्फे व्यवस्थापनाचा निषेध करण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून संघटनेची बदनामी सुरू असल्याची टीका विष्णू पेठकर व चंद्रशेखर नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. वाढती महागाई व इतर खर्च पाहता वेतनवाढ मिळायलाच हवी. दर तीन वर्षांनी वेतनवाढ होते व त्यात ८ हजार रुपये वाढ देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे महिला पत्रकारांचा गौरव

स्त्री व्याख्यानमालेचे उद्घाटन
पणजी,दि.१०(प्रतिनिधी): एखाद्या राज्यात स्त्रीला कितपत सन्मान आहे, त्या आधारावरच त्या राज्याची संस्कृती कळते, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी केले. केवळ भौतिक प्रगती झाली म्हणजे राज्य किंवा देश सुधारला असे होत नाही पण प्रत्यक्षात व्यक्तिविकासावरच प्रगतीचे निकष ठरतात, असेही ते म्हणाले.
संस्कृती प्रतिष्ठान, गोवा शाखा व स्वामी विवेकानंद सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्त्री व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खांडेपारकर, संस्कृती प्रतिष्ठानच्या संयोजिका संगीता जाधव, उपसंयोजिका ज्योती कुंकळकर, गौरी काटे आदी मान्यवर हजर होते.
जागतिक महिला दिन शताब्दीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या महिला पत्रकारांचा गौरव श्री. लोलयेकर व श्री. खांडेपारकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात ज्योती धोंड ( गोवादूत), सुहासिनी प्रभुगांवकर (गोमंतक), लीना पेडणेकर (तरुण भारत), प्रीतू नायर (टाइम्स ऑफ इंडिया), डॉम्निका पिंटो (नवहिंद टाइम्स) व अन्वेषा सिंगबाळ (सुनापरान्त) यांचा समावेश होता. सोसायटीच्या कार्यालयात गेली वीस वर्षे सेवा बजावणाऱ्या रीमा शिरोडकर यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
प्रमोद खांडेपारकर यांनी आपले विचार व्यक्त करताना महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महिला पुढे येणार, असा विश्वास व्यक्त केला. महिला या पुरुषांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात असे म्हटले जाते, त्यामुळे महिलांच्या सहभागामुळे भ्रष्ट्राचारावर काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे, असेही ते म्हणाले. घरातील स्त्री सशक्त झाली तरच कुटुंब सशक्त होईल व त्यामुळे स्त्रीला योग्य मान मिळायलाच हवा, असेही ते म्हणाले.
सुरुवातीला संगीता जाधव यांनी प्रास्ताविक केले. ज्योती कुंकळकर यांनी गौरवमूर्ती पत्रकारांची ओळख करून दिली. सौ. सिनारी यांनी सूत्रसंचालन केले.

Wednesday, 10 March 2010

श्री दामबाबाच्या जयघोषात जांबावली गुलालोत्सव साजरा


जांबावली येथील गुलालोत्सवानिमित्त गुलालात न्हाऊन निघालेले भाविक. (छाया : गोवादूत सेवा)
मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): "श्री दामोदर महाराज की जय'चा निनाद आज कुशावतीच्या तीरावरील जांबावलीत दुमदुमला व त्याबरोबरच गेला आठवडाभर जय्यत तयारी सुरू असलेल्या गुलालोत्सवाची सांगता झाली. केवळ गोव्याच्या काना कोपऱ्यातून नव्हे तर शेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्रातूनही दामबाबाचे कुळावी आज त्यांच्या दर्शनासाठी आले व गुलालात न्हाऊन पावन झाले.
आज सकाळपासूनच जांबावलीकडील रस्ते भाविकांच्या वर्दळीने वाहत होते. दुपारनंतर तर मंदिर परिसरांत भाविकांचा महापूर आला व दर्शनासाठी लागलेली रांग मुख्य रस्त्यावर पोचली. दामबाब विराजमान झालेल्या रामनाथाच्या प्राकारात तर मुंगीलाही शिरायला वाव नव्हता अशी गर्दी उसळली होती.
दुपारी अडीच वाजता "श्री दामोदर महाराज की जय'ची ललकारी आसमंतात निनादली, त्या बरोबरच पालखीत विराजमान झालेल्या मठग्रामाच्या सम्राटावर गुलालाची उधळण झाली. क्षणार्धातच संपूर्ण आसमंत गुलालमय झाला. परतणाऱ्या भाविकांमुळे रस्तेही लालोलाल झाले व ते पाहून जांबावलीकडे निघालेले भाविक अधिक उत्साहाने पावले उचलू लागले. साधारण दीड तास ही उधळण सुरूच होती. लोकांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची खाकी वर्दीही लालोलाल झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
नंतर पालखी अवधृतस्नानासाठी गेली व तेथून मंदिरात परतली. या नंतर नवरदेवाची वरात हा कार्यक्रम झाला. उद्या सकाळी धूळफेक होईल व याबरोबरच या शिशिरोत्सवाची सांगता होईल.
दरम्यान, आजच्या गुलालोत्सवासाठी कडक बंदोबस्त होता, वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने तेथे तळ ठोकून होते तसेच वाहन पार्किंगची वेगळी व्यवस्था केल्याने कुठेच गैरसोय झाली नाही.

महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. ९ : संसद व राज्य विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या महिला आरक्षण विधेयकाने आज महत्त्वाचा टप्पा पार केला. अभूतपूर्व अशा गोंधळानंतर आज (मंगळवारी) संध्याकाळी राज्यसभेत झालेल्या मतदानात १८६ मते मिळवत विधेयक मंजूर झाले. राज्यसभेत सध्या २३३ सदस्य असून घटनादुरुस्तीचा दर्जा असलेल्या या विधेयकाच्या मंजुरीसाठी १५५ मते आवश्यक होती. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान झाले त्यावेळी फक्त एका सदस्याने विधेयकाचा विरोध केला. तृणमूल कॉंग्रेसने मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला तर बसपने मतदानावर बहिष्कार टाकला.
संसद आणि विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या विधेयकावर आता लोकसभेत चर्चा आणि मतदान होईल. तिथे विधेयक मंजूर झाल्यास ते राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतरित होईल.
महिलांना सत्तेत भागीदारी देणारे हे विधेयक गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र आज संपुआ सरकारने हे विधेयक मंजूर करवून घेत एक इतिहास घडवला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून कालच हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याला यश आले नाही. आजही या विधेयकाला काही पक्षांचा विशेषत: लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव व शरद यादव यांचा विरोध असला तरी हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकले.
आता या विधेयकाला कायद्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने आणि नंतर देशातल्या किमान १५ राज्य विधानसभांमध्ये दोन तृतीयांश बहुमताने हे विधेयक मंजूर व्हावे लागेल. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या स्वीकृतीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

अटाला पोलिसांच्या जाळ्यात

पणजी व पेडणे दि. ९ (प्रतिनिधी): इंटरनेटवर व्हिडिओ चित्रीकरण प्रसारित करून पोलिस अधिकाऱ्यांच्या ड्रग्स माफियांशी असलेल्या संबंधाचा गौप्यस्फोट करणाऱ्या यानीव बेनाहीम ऊर्फ "अटाला' याला आज दुपारी १.३० वाजता पेडणे व हणजूण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. न्यू वाडा मोरजी येथील नॉर्थ गोवा रेस्टॉरंटमध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आता पोलिस "अटाला' याच्याकडून कोणती जबानी वदवून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या त्याला फौजदारी कायदा कलम ४१ नुसार ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली.
२००८ मध्ये "अटाला' याने "मेटाकॅफे' या इस्रायली संकेतस्थळावर "अपलोड' करण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिपींगमुळे गेल्या काही दिवसात पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. तर, या प्रकरणात एक पोलिस निरीक्षक आणि चार पोलिस शिपाई निलंबित झाले आहेत. त्यांची गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी केली जात असून "अटाला' याची जबानी आता महत्त्वाची ठरणार आहे.
अधिक माहितीनुसार "अटाला' अधूनमधून हणजूण येथील एका भाड्याच्या बंगल्यात राहत होता. दोन दिवसांपूर्वी हणजूण पोलिसांनी "अटाला'चा एक मित्र व इस्रायली नागरिक हुसाबीन याला अटक केली असता त्याने "अटाला'विषयीची माहिती पोलिसांना दिली. तो जीए ०३ बी ६०२५ क्रमांकाची ऍक्टिव्हा घेऊन हरमल, मांद्रे किंवा मोरजी परिसरात असण्याची "टीप' त्याने पोलिसांना दिली होती. या माहितीवरून काल रात्री पासून अनेक ठिकाणी पाळत ठेवण्यात आली होती. आज सकाळी सदर दुचाकी न्यू वाडा मोरजी येथील नॉर्थ गोवा रेस्टॉरंटच्या (सध्या मोरजीम रिसॉर्ट असे नामकरण करण्यात आले आहे) बाहेर उभी असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी रिसॉर्टमध्ये जाऊन चौकशी केली असता तो एका खोलीत असल्याचे सांगण्यात आले. सदर खोली "रिना' या युक्रेन देशाच्या तरुणीने आपल्या नावावर आरक्षित केली होती. दि. ८ ते ११ मार्चपर्यंत ही खोली आरक्षित करण्यात आली होती. पोलिसांनी खोलीवर छापा टाकला असता आत "अटाला' असल्याचे त्यांना आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सरळ पेडणे पोलिस स्थानक गाठले.
दरम्यान, हे रिसॉर्ट चालवणारे कमलजी यांच्याकडे संपर्क साधला असता "अटाला' हा रिना आपली मैत्रीण असल्याचे सांगून तिला भेटायला आला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. तो केवळ तिला भेटायला आला असल्याने आम्ही त्याचा "सी फॉर्म' भरून घेतला नाही, असे त्यांनी सांगितले.
खोली कामगारांनी उघडली
पेडणे पोलिसांनी ज्यावेळी "अटाला' व त्याची मैत्रीण रिना यांना ताब्यात घेतले त्यावेळी खोली क्रमांक ६ उघडू नका असे पोलिसांनी रिसॉर्टचे मालक व कामगारांना बजावले होते. मात्र एका तासाने पुन्हा पोलिस त्या खोलीवर परतले असता पूर्णपणे खोली उघडी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'त्या' माजी पत्रकाराची ड्रग्सप्रकरणी चौकशी

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): ड्रग्स माफियाशी संबंध असल्याची माहिती मिळाल्याने आज एका इंग्रजी दैनिकाच्या "त्या' माजी संपादकाची सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. सदर चौकशी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी केली. २००६ या दरम्यान या तत्कालीन पत्रकाराने "दुदू' याच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला आला होता. त्यानंतर एकाएकी बातम्या बंद झाल्या होत्या. एका पोलिस शिपायाने अन्य एका व्यक्तीच्या मार्फत "त्या' माजी संपादकाशी बोलणी करून "दुदू' विषयी न लिहिण्याची विनंती केली होती. त्या बदल्यास योग्य बक्षिशी देण्यात आली होती, अशी माहिती उघड झाली असल्याने पोलिसांनी आज त्या माजी संपादकालाच पोलिस मुख्यालयात बोलावून चौकशी केली. यावेळी त्याने आपण या लोकांना ओळखत असल्याचे मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, कोणते पोलिस शिपाई या लोकांशी जवळीक साधून होते, त्यांची नावेही त्यांनी जाहीर केली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर माजी संपादकाचे संबंध थेट असल्याचे सिद्ध झाले नसले तरी, त्याच्याकडून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागामार्फत निलंबित पोलिसांच्या सुरू असलेल्या चौकशीत आज त्या पोलिसांची जबानी नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

निकाल जाहीर, रस्सीखेच सुरू

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): जिल्हा पंचायतीच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी सरकारची सरशी झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांत आघाडीचे समर्थन लाभलेल्या बहुतेक उमेदवारांचा विजय झाला असला तरी आता प्रत्यक्षात जिल्हा पंचायत अध्यक्षांच्या निवडीवरून पुन्हा एकदा आघाडी अंतर्गत तीव्र रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष अमोल मोरजकर यांचा पराभव झाला, तर दक्षिण गोव्यात चर्चिल समर्थक मारिया रिबेलो यांची बाणावली मतदारसंघातून पुन्हा एकदा निवड झाल्याने महिलांसाठी राखीव असलेल्या जिल्हा पंचायत अध्यक्षांसाठी नेली रॉड्रिगीस व मारिया रिबेलो यांच्यात चुरस निर्माण होणार आहे.
आज सकाळी १० वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. ताळगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात पुरस्कृत जानू रुझारियो हे विजयी झाल्याची घोषणा सर्वांत प्रथम झाली. हा निकाल जाहीर होताच येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहासमोर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बाबूश मोन्सेरात यांनी जानू रुझारियो यांना घट्ट मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ताळगाव मतदारसंघातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी विजयी झालेल्या उमेदवारांत श्रीमती मांद्रेकर (मांद्रे), दीपक कळंगुटकर (कोरगाव), सुरंगी हरमलकर (धारगळ), पांडुरंग परब (तोरसे), डायना ब्रागांझा (थिवी), कुंदा बागकर (हळदोणा), गुपेश नाईक (पेन्ह दी फ्रान्स), आबेलिना मिनेझीस (कळंगुट), वासुदेव कोरगावकर (हणजूण), मायकल लोबो (साळगाव), जानू रुझारियो (ताळगाव), सुरेश पालकर (सांताक्रुझ), छाया नाईक (चिंबल), आंतोनियो सिल्वेरा (सेंट लॉरेन्स, आगशी), वृंदा नाईक (चोडण), धाकू मडकईकर (कुंभारजुवा), शिल्पा नाईक (लाटंबार्से), फोंडू सावंत (कुडणे), अशोक गावस (होंडा), उमलो गावडे (नगरगाव), दीपिका प्रभू (कुर्टी), गोकुळदास नाईक (तिवरे), शिवदास गावडे (वेलिंग), मेघना येंडे (मये), पौर्णिमा नाईक (बांदोडा), शैला बोरकर (कवळे), नारायण कामत (शिरोडा), जयेश साळगावकर (रेइश मागूश), दीपक धारगळकर (शिवोली) यांचा समावेश आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांत अपर्णा नाईक (साकवाळ), सिंथीया डिसिल्वा (कुठ्ठाळी), विल्फ्रेड डिसा (नुवे), डॉमनिक गावकर (राय), मारिया मिरांडा (दवर्ली), वीणा लॉरेन्सो (कुडतरी), सीमा डायस (गिरदोळी), सॅब्रीना डायस (चिंचिणी), अँथनी रॉड्रिगीस (वेळ्ळी), मारिया रिबेलो (बाणावली), नेली रॉड्रिगीस (कोलवा), प्रदीप देसाई (सावर्डे), रश्मी लांबोर (धारबांदोडा), नवनाथ नाईक (रिवण), रुझारियो फर्नांडिस (शेल्डे), सुप्तीका गावकर (बाळ्ळी), खुशाली वेळीप (फातर्पा), कृष्णा वेळीप (खोला), दया पागी (पैंगीण) यांचा समावेश आहे.
विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे चिंबल मतदारसंघातून उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष किशोर नार्वेकर यांची पत्नी पराभूत झाली व तिथे आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस समर्थक छाया नाईक विजयी ठरल्या. कुर्टी मतदारसंघात आरोग्यमंत्री विश्वजित राणे व गृहमंत्री रवी नाईक समर्थकांत टक्कर होती; तिथे सत्तरी युवा मोर्चाचा पाठिंबा लाभलेल्या दीपिका प्रभू यांचा विजय झाल्याने रवी नाईक यांच्यासाठी हा जबर धक्का ठरला आहे. आता अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी रस्सीखेच सुरू होणार असून विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील अंतर्गत मतभेदाचा परिणाम या निवडणुकीवरही जाणवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदासाठी विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात व ढवळीकरबंधू यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिणेतही राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको व चर्चिल यांच्यात अध्यक्षपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

'जयराम कॉम्प्लेक्स' रहिवाशांचे बिल्डरविरोधात १३ रोजी आंदोलन

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मळा येथील "जयराम कॉम्प्लेक्स'च्या रहिवाशांसमोरील समस्या व अडचणींचा त्रागा सुरूच आहे. या कॉम्प्लेक्सचे बिल्डर कुडतरकर रियल इस्टेटकडून या परिसरात आणखी एका नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा फेरफार करण्यात आल्याची दावा रहिवाशांनी केली आहे. ही इमारत उभी राहिल्यास या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या निर्माण होईल. बिल्डरच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी १३ रोजी अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
जयराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांची गेल्या कित्येक वर्षांपासून बिल्डर विरोधातील ही लढाई सुरूच आहे. मुळात सुरुवातीला या कॉम्प्लेक्समध्ये जागा खरेदी करताना जी आश्वासने बिल्डरने दिली होती, त्यांची पूर्तता करण्यात आली नाहीच; वरून सदर बिल्डर एकामागोमाग एक बेकायदा बांधकामे करीत आहे. या रहिवाशांना अद्याप सोसायटी स्थापन करून देण्यात आली नाही. नव्या बांधकामासाठीची कागदपत्रे संबंधित खात्याकडे सादर केली असताना त्यात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचीही माहिती उघड झाली आहे. या सर्व गोष्टींवर महापालिका व नगर नियोजन खात्याकडून डोळेझाक होत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
या कॉम्प्लेक्समध्ये सध्याच्या परिस्थितीत रहिवासी व इतर व्यापारी मिळून एकूण दीडशे फ्लॅट, दुकाने तसेच दोन इस्पितळेही आहेत.

पत्रकारितेचा धर्म मानणारे वृत्तपत्रच राष्ट्रीय : तरुण विजय

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): वृत्तपत्र खपाने मोठे असले तर देशव्यापी ठरते पण ते "राष्ट्रीय' ठरतेच असे नाही. या देशातील ग्रामीण भागांच्या समस्या आणि घटनांना स्थान देणारे छोटे वृत्तपत्र मातीशी इमान राखून पत्रकारितेचा धर्म पाळत असेल, तर तेच खरे "राष्ट्रीय' वृत्तपत्र मानता येईल. "विवेक'ने आपल्या विचारसरणीशी ठाम राहून केलेले प्रबोधन मौलिक आहे, म्हणूनच ते अधिक शक्तिशाली व राष्ट्रीय आहे, असे उद्गार नामवंत पत्रकार तरुण विजय यांनी येथे काढले. सा. विवेकच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आज पाटो येथे म्युझियम सभागृहात झालेल्या "गोवा विकास विशेषांका'च्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आजच्या या प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोशी, गोवा समितीचे अध्यक्ष प्रदीप तळावलीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल खवंटे, विवेकचे प्रबंधक संपादक दिलीप करंबेळकर, राजू सुकेरकर, प्रा. दत्ता भि. नाईक, प्रा. सुभाष वेलिंगकर, सूर्यकांत गावस व वल्लभ केळकर उपस्थित होते.
सध्या सर्वत्र "पेड न्यूज'ची चर्चा समाजात होत आहे. बातमी देणाऱ्यांकडून पैसे घेणे अथवा पैसे न देणाऱ्यांविरुद्ध मजकूर प्रसिद्ध करणे अशी धोकादायक वृत्ती देशभर पसरत चालली आहे. दंगली उसळल्या की पूर्वग्रहदूषित एकतर्फी बातम्या देण्यात देश पातळीवरील वृत्तपत्रे धन्यता मानतात. या प्रकाराला ते धर्मनिरपेक्षतेचे नाव देतात. वृत्तपत्रसृष्टीत सध्या बेईमानी विरुद्ध इमानदारी, धर्म विरुद्ध अधर्म असा संघर्ष चालू आहे. वृत्तपत्र छोटे असले तरी धर्माच्या बाजूने राहिल्यास ते टिकून राहते, जनमानसात स्थान प्राप्त करते, असे ते म्हणाले. भगतसिंग यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणारे ८४ जण विस्मरणात गेले पण भगतसिंग मात्र अमर झाले आहेत. वृत्तपत्रांची आजची अवस्था छोट्यामोठ्या राजकीय पक्षांसारखी झाली आहे. मोठी वृत्तपत्रे कोट्यवधी कमावतात मात्र गुंतवणूक अन्य उद्योगांत करतात. हे प्रसार माध्यमाला हानिकारक आहे, असे ते म्हणाले. केवळ नागरी समस्यांवर भर न देता सामान्यांप्रति आत्मीयता असल्यास वृत्तपत्रे टिकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रदीप तळावलीकर व प्रा.दत्ता भि.नाईक यांनी "गोवा विशेषांका'विषयी माहिती दिली. दिलीप करंबेळकर यांनी विवेकच्या एकंदरीत वाटचालीचा आढावा घेताना, हिंदू समाजाला धैर्य देण्याचे काम विवेकने वेळोवेळी केल्याचे सांगितले. विवेकतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. अनिल खवंटे यांनी विवेकची प्रशंसा करताना यापुढेही आपले सहकार्य देण्याची ग्वाही दिली. चैताली गावस हिने प्रारंभी ईशस्तवन व समारोपप्रसंगी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत सादर केले.

Tuesday, 9 March 2010


जांबावली येथे आज होणाऱ्या प्रसिद्ध गुलालोत्सवानिमित्त सजवण्यात आलेली श्री देव दामोदराची मूर्ती. (छाया : गोवादूत सेवा)

महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत प्रचंड गदारोळ

सदस्यांचे अन्सारी यांच्याशी गैरवर्तन
नवी दिल्ली, दि. ८ : महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेले ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक आज प्रचंड गदारोळात राज्यसभेत सादर करण्यात आले. विधेयकाच्या सध्याच्या प्रारुपास विरोध असणाऱ्या राजद, जदयु आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी सदनात प्रचंड गदारोळ केला. अध्यक्ष हमिद अन्सारी यांच्याशी गैरवर्तन करण्यापर्यंत या सदस्यांची मजल गेली. यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरात अनेकवेळा स्थगित करावे लागले.
हे विधेयक आजच्या महिला दिनी राज्यसभेत मांडून पारित करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न होता. सरकारने कसेबसे विधेयक तर मांडले, मात्र सदस्यांच्या प्रचंड विरोधामुळे त्यावर चर्चा घडवून ते सरकारला पारित करता आले नाही. आता उद्या या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या विधेयकावर मतैक्य घडवण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. चर्चेशिवाय विधेयक पारित करण्याला आमचा विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. तर हे विधेयक मांडण्याच्या सरकारच्या आग्रहामुळे संपुआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल यांनी संपुआ सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली. तर या विधेयकावरुन जदयुत दोन गट पडले आहेत.
आज हे विधेयक सादर होताच सपा आणि राजदच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर काही सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष हामीद अन्सारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला.
प्रमुख विरोधी पक्ष असणारा भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला आपला पाठिंबा व्यक्त केला असल्यामुळे कितीही विरोध झाला तरी आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी हे विधेयक पारित करण्याचा सरकारचा निर्धार होता. आज सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच प्रचंड गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. दुपारी दोन वाजता तिसऱ्यांदा कामकाज सुरु होताच कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनी महिला आरक्षण विधेयक विचारार्थ राज्यसभेच्या पटलावर ठेवले. यानंतर लगेच सपाचे नंदकिशोर यादव आणि कमाल अख्तर यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादव यांनी तर अन्सारी यांच्यासमोरील टेबलावर चढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी अध्यक्षांसमोरील माईक उखडून फेकला आणि कागदपत्र फाडण्यास सुरुवात केली, यावेळी काही इतर सदस्यदेखील अन्सारी यांच्या टेबलाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे लक्षात येताच मार्शलांनी अन्सारी यांच्याभोवती सुरक्षा कवच तयार केले. त्यानंतर अन्सारी यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित केले.
लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
महिला आरक्षण विधेयकावरुन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि जदयुच्या सदस्यांनी जोरदार हंगामा केल्यामुळे लोकसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करत कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळ तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात होताच सदस्यांनी पुन्हा गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. अनेकवेळा विनंती करुनही सदस्य शांत होत नसल्याचे पाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि जदयुचे अध्यक्ष शरद यादव यांच्या नेतृत्वात या पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्य जागेत येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली.सपाचे सदस्य शैलेंद्र कुमार यांनी कागदपत्रं फाडून सभागृहात भिरकावली.ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तहादूर मुस्लिमन या पक्षाचे एकमेव सदस्य असलेले असाऊद्दीन ओवेसी यांनीदेखील या विधेयकाला सभागृहात जोरदार विरोध केला.

महागाईविरोधात भाजप फुंकणार राज्यव्यापी रणशिंग

- १० रोजी उत्तर व दक्षिण गोव्यात बैठका
- ११ ते १४ पर्यंत प्रत्येक मतदारसंघात बैठका
- १५ मार्चपासून जाहीर सभा व आंदोलनाला सुरुवात
- २१ एप्रिल रोजी दिल्लीत संसदेला घेराव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात गेल्या काही वर्षांत महागाईने जे भीषण स्वरूप प्राप्त केले आहे, त्यामुळे देशातील समस्त गरीब व मध्यमवर्ग पिंजून गेला आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगानेच १० मार्च ते १० एप्रिलपर्यंत गोवा प्रदेश भाजपतर्फे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष उल्हास अस्नोडकर, सरचिटणीस गोविंद पर्वतकर व भाजपच्या महिला नेत्या कुंदा चोडणकर हजर होत्या. महागाईविरोधातील या आंदोलनाद्वारे राज्यभरातून सुमारे दोन लाख सह्या मिळवण्यात येतील. यासंदर्भात येत्या १० मार्च रोजी उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ४.३० वाजता म्हापसा येथील हॉटेल त्रिमूर्ती व दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी मडगाव येथे संध्याकाळी ६.३० वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पूर्ण आंदोलनाची व्यूहरचना आखली जाईल. या दोन्ही बैठकांना संबंधित जिल्ह्यातून किमान शंभर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ११ ते १४ असे चार दिवस प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे व त्यात मतदारसंघनिहाय कार्यक्रमाची आखणी केली जाईल. राज्यातील १८९ पंचायती, १३ पालिका व १ महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी महागाईच्या रौद्ररूपाबाबत जनजागृती केली जाईल. १५ मार्चपासून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होईल व त्यात जाहीर सभा, कोपरा सभा, पुतळा जाळणे, घंटानाद, महिलांतर्फे भांडीनाद व महागाईप्रकरणी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली जाणार आहेत. या सरकारने महागाई वाढवण्यास कसा हातभार लावला याची माहितीही यावेळी जनतेला करून दिली जाणार आहे.
२१ एप्रिल रोजी देशभरातून भाजपतर्फे सुमारे पाच लाख लोक संसदेला घेराव घालतील. या कार्यक्रमासाठी गोव्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी पार्सेकर यांनी दिली.
केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली. सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने जगावे कसे, असा प्रश्न लोकांसमोर उभा ठाकला आहे.
येत्या २२ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महागाईवरून संपूर्ण राज्यभरात रणशिंग फुंकले जाईल व तदनंतर सभागृहातही या विषयावरून सरकारला चांगलेच धारेवर धरणार असेही प्रा. पार्सेकर म्हणाले. महागाईबरोबर भ्रष्टाचार, बेकायदा खाणी, अंमलीपदार्थांचा व्यवहार आदी सर्व विषयांवरून सभागृह दणाणून सोडू, अशीही माहिती त्यांनी दिली.

गृहमंत्र्यांनी राजीनामा देणेच योग्य

प्रा. पार्सेकर यांची मागणी
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): राज्यात अंमलीपदार्थ व्यवहार चालत नाहीत, असा उघडपणे दावा करणारे गृहमंत्री रवी नाईक खुद्द पोलिसांनी अंमलीपदार्थ व्यवहारांचा पर्दाफाश केल्याने उघडे पडले आहेत. त्यांनी खरे तर या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज येथे पत्रकार परिषदेत या विषयावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. अंमलीपदार्थ व्यवहारातील माफिया व पोलिस यांचे साटेलोटे उघड झाल्याने या व्यवहाराचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अलीकडेच पाच पोलिसांना निलंबित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण हा प्रकार म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या व्यवहारात वरिष्ठ पोलिस अधिकारी, राजकारणी व त्यांचे सगेसोयरेही गुंतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निःपक्षपाती चौकशीसाठी हे प्रकरण एखाद्या केंद्रीय तपास यंत्रणेकडेच सोपवणे योग्य ठरेल, असेही प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. अंमलीपदार्थ व्यवहाराबाबत भाजपतर्फे वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवण्यात आला. पण सरकारने दरवेळी या गोष्टींकडे कानाडोळा करणेच पसंत केले. यातही कहर म्हणजे खुद्द राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी तर चक्क राज्यात अंमलीपदार्थ व्यवहार नाहीच, असे ठामपणे सांगून टाकले. सरकार या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईत राज्यात अंमलीपदार्थांचा व्यवहार किती फोफावला आहे हे उघड झाले आहे.
सुशेगाद वृत्ती सोडावीच लागेल
राज्यातील किनारी भागांत विशेष करून पेडणे भागातील किनारपट्टीवर विदेशी लोकांचे वास्तव्य वाढत आहे. या ठिकाणी स्थानिकांनी आपला व्यवहार त्यांच्याकडे सोपवला आहे. केवळ काही पैशांसाठी हे लोक आपले अस्तित्वच धोक्यात घालीत आहेत, असे प्रा.पार्सेकर म्हणाले. या प्रकरणी जनजागृतीची गरज असून लोकांना या गोष्टीतील धोक्यांबाबत अवगत करणे गरजेचे आहे. आपण गेल्या एका वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेल्या विदेशींबाबत विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी गृह खात्याने केवळ तीन विदेशी नागरिकांची नावे दिली होती. मुळात आपण केवळ पेडण्यातच साडेतीनशे प्रकरणे दाखवू शकतो, असा दावाही यावेळी प्रा. पार्सेकर यांनी केला. कष्ट न करता केवळ भाड्याच्या रूपाने मिळणाऱ्या पैशांवर धन्यता मानून आपली घरेदारे विदेशींकडे सोपवलेल्या लोकांना या संकटाची माहिती करून देण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली.

आणखी एका पोलिसाचे ड्रग्सप्रकरणी निलंबन?

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): अंमलीपदार्थ तपासणी पथकाचे नियम धाब्यावर बसवून पंचनामा केल्याप्रकरणी आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे. हेरॉईन पकडल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी न करता केवळ "वासा'वर सदर पदार्थ हेरॉईन असल्याचे ठरवल्याने तत्कालीन अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक पुनाजी गावस यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती, ते दहा दिवस पूर्ण झाले असल्याचे अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बन्सल यांनी सांगितले.
वास घेऊन अंमलीपदार्थ असल्याचे ठरवणे म्हणजे मूर्खपणा आहे. अंमलीपदार्थ पकडल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी "ड्रग टेस्ट कीट' असताना त्याचा वापर न करता वासा आल्याच्या मुद्द्यावर तो पदार्थ ड्रग्स असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. हे नियमाच्या विरोधात असून आम्ही त्या पोलिस अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे, असे श्री. बन्सल यांनी सांगितले.
सध्या सदर पोलिस अधिकारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या सुरक्षा विभागात असून या विभागाच्या उपअधीक्षकांमार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय अशा किती प्रकरणात वास घेऊन ड्रग्स असल्याचे यापूर्वी ठरवले गेले आहे, याचीही तपासणी जुन्या पंचनामा दाखल्यावरून सुरू केल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात एका पोलिस शिपायावर घरी जाण्याची पाळी होती. या पोलिस शिपायाला पोलिसांनी "क्लीन चीट' दिलेली नसली तरी, या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने नियम पाळला नसल्याने ही कारवाई केली जात असल्याचे श्री. बन्सल पुढे म्हणाले.

निलंबित पोलिसांची कसून चौकशी सुरू

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): ड्रग्स माफियांशी साटेलोटे ठेवल्याने निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागाने सुरू केली असून उद्या या पोलिस निरीक्षकाला आणि शिपायांना चौकशीला बोलवण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तर, आत्तापर्यंत एनडीपीएस न्यायालयाने विल्हेवाट लावण्यासाठी या पोलिस अधिकाऱ्याला किती प्रमाणात अंमलीपदार्थ दिले होते. त्यांची कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सांगितले.
"अटाला' या इस्रायली ड्रग्स माफियांनी अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक आपल्याला कशा पद्धतीने संरक्षण पुरवून अमली पदार्थ देत होते, याची माहिती उघड केल्यानंतर या पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. या पोलिसांना "दुदू' प्रकरणात सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या "दुदू' या ड्रग्स माफियाने जामीन मिळवण्यासाठी म्हापसा येथील "एनडीपीएस' न्यायालयात अर्ज दाखल केला असून तो येत्या १६ मार्च रोजी सुनावणीसाठी येणार आहे. "एनडीपीएस' न्यायालयात ठेवण्यात येणारे "ड्रग्स' चोरून ते ड्रग्स माफियाला विकले जात असल्याचे आरोप करण्यात आले असून सध्या न्यायालयाच्या ताब्यात किती अंमलीपदार्थ आहे आणि ते खरोखरच अंमलीपदार्थ आहेत की त्याजागी युरिया किंवा "पेरासिटामॉल'च्या गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत, याचाही शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत अनेक "दुदू' असल्याने त्यांच्यावर आमचे बारीक लक्ष आहे. योग्य वेळ येताच त्यांनाही ताब्यात घेतले जाईल, असे अधीक्षक वेणू बन्सल यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडली राजधानी

जागतिक महिलादिनी महिलाच रस्त्यावर
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या दीर्घकालीन आणि सरकार दरबारी रखडत असलेल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ राजधानीत भव्य निषेध फेरी काढली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करणे व निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी मदत न देता निवृत्ती वेतन लागू करणे, अशा प्रमुख मागण्या या निषेध फेरीच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत.
आज दुपारी २.३० वाजता पणजी पाटो येथून या निषेध फेरीला सुरुवात झाली. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष मुक्ता नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली फेरी पाटो ते चर्च चौकातून थेट १८ जून रस्त्यावरून महिला विकास व बालकल्याण खात्याकडून आरोग्य संचालनालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी या फेरीत सहभागी झालेल्या महिलांकडून आपल्या विविध मागण्यांसंबंधीच्या घोषणा देण्यात येत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त महिला आपल्या हक्कांसाठी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरण्याचा हा प्रकार सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या. संघटनेतर्फे सरकारदरबारी ठेवलेल्या मागण्यात सरकारी सेवेत कायम करून वेतनश्रेणी द्या, तोपर्यंत ज्येष्ठतेला अनुसरून मुख्य सेविकेच्या वेतनाएवढे मानधन द्या अशी मागणी करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे काम हे आता फक्त चार तासांचे राहिलेले नाही. आता इतर सरकारी खात्यांची काही कामे या कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने ही जबाबदारी पूर्णवेळेची झाली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. अनेक वर्षे सेवा बजावत असलेल्या या सेविकांना वृद्धापकाळात फक्त हातात एक लाख रुपये देऊन घरी पाठवण्याची कृती सरकारला शोभते काय, असा सवाल करून निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक निवृत्ती वेतनाची सोय करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
ज्येष्ठतेनुसार मुख्य सेविकेच्या जागी बढती देण्याऐवजी निवडप्रक्रियेतून यादी ठरवण्याच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान, वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या पण २० वर्षे सेवा न बजावलेल्या कर्मचाऱ्यांना रोख रकमेचे धनादेश देण्यात आले नाही, या कृतीचाही यावेळी निषेध करण्यात आला. एकीकडे महिलांना जादा अधिकार देण्याची भाषा सरकारकडून केली जाते, गेली कित्येक वर्षे निःस्वार्थीपणे समाजासाठी सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय देण्याबाबत मात्र सरकार कुचराई करीत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

खासगी बसमालकांचा तिकीट दरवाढीचा प्रस्ताव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): डिझेलचे दर गेल्या २८ फेब्रुवारीपासून वाढल्याने आपोआपच त्याचा फटका खाजगी प्रवासी बसमालकांना बसायला लागला आहे. अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेतर्फे प्रवासी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव वाहतूक खात्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात पहिल्या तीन किलोमीटरसाठी ५ रुपये हा सध्याचा दर कायम राखत पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ४५ पैशांऐवजी ६५ पैसे वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी ही माहिती दिली. हा प्रस्ताव वाहतूक खात्याला सादर करण्यात आला असून वाहतूक व समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर यांनाही या प्रस्तावाची प्रत पाठवण्यात आली आहे. प्रवासी तिकीट दरवाढ हा विषय थेट सर्वसामान्य लोकांशी संबंधित आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस आधीच मेटाकुटीला आला आहे व त्यात आता खासगी बस तिकीट वाढ झाली तर त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. संघटनेला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे व त्यामुळेच केवळ वीस पैशांची नाममात्र वाढ सरकारला सुचवलेली आहे. तिकीट दरवाढीचे खापर लोकांनी बसमालकांवर न फोडता सरकारलाच त्याचा जाब विचारणे योग्य ठरेल. डिझेलच्या दरात २.७२ रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. प्रत्येक प्रवासी बसगाडीला दिवसाकाठी किमान ३५ ते ४० लीटर डिझेल लागते त्यामुळे या वाढीचा फटका दिवसाला किमान शंभर ते दोनशे रुपये बसतो. त्यात वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा विनाकारण अडवणूक केली जाते व दंड ठोठावला जातो, त्यामुळे खासगी बसवाल्यांसाठी हा व्यवसाय दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. प्रवाशांना उत्तम सोय देण्यासाठी काम करणाऱ्या या व्यावसायिकांकडे सरकारने सामंजस्याने वागले पाहिजे. खासगी बसवाल्यांना डिझेलात अनुदान देण्याची योजना राबवल्यास त्याचा लाभ या व्यावसायिकांना होईल, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांची सोय करणाऱ्या खाजगी बस व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही श्री. ताम्हणकर यांनी केले.

Monday, 8 March 2010

जिल्हा पंचायतींसाठी मतदान ५७.२२ टक्के

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज पाच वाजता मतदानपेटीत सीलबंद झाले असून संपूर्ण राज्यात ५७ .२२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयुक्त पी एम. बोरकर यांनी दिली. या मतपेट्यांत बंद झालेले उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीनंतर दि. ९ (मंगळवारी) रोजी ठरणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यात एकूण ४८ जागांसाठी मतदान झाले. कळंगुट आणि नुवे येथे तणाव सोडल्यास अन्य ठिकाणी शांततेत मतदान झाले.
१९० मतदारांचे भवितव्य या मतपेटीत बंद झाले आहे. कोलव्याच्या नेली रॉड्रिक्स या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर नावेली केंद्रातील उमेदवार हिरमन फर्नांडिस यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्या केंद्राची निवडणूक आता दि. ९ मे रोजी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पी. एम. बोरकर यांनी दिली. पेडणे तालुक्यात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर निघाल्याने येथे सर्वांत जास्त म्हणजे ६५.१८ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
काणकोण तालुक्यात ६० टक्के, सत्तरी ६०.३४, तिसवाडी ५४.३३, सांगे ५३.९०, सासष्टी ५०.८६, केपे ६२.३७, फोंडा ५३.२२, डिचोली ६३.४१, मुरगाव ४९.२७ व बार्देश --- टक्के मतदान झाल्याची माहिती श्री. बोरकर यांनी दिली. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान अतिशय संथ गतीने सुरू झाले. सकाळी १० पर्यंत केवळ १३ टक्के मतदानाची नोंद झाली होती तर, १२ पर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने ५ पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
दरम्यान, वेळ्ळी भागात मतदारांना खूष करण्यासाठी मतदानाच्या आदल्या रात्री चक्क एका मंत्र्याने पैशांचे वाटप करण्याची घटना घडल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश आज निवडणूक आयुक्त पी एम. बोरकर यांनी दिला. या घटनेची सुओमोटु पद्धतीने दखल घेत याची चौकशी करून उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निरीक्षकाला देण्यात आले आहेत. आज काही वर्तमानपत्रांत अशा पद्धतीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहे, असे श्री. बोरकर यांनी सांगितले. वेळ्ळी येथे काल रात्री मतदारांना पैसे वाटण्यासाठी मंत्री आल्याची खबर स्थानिकांना मिळताच त्यांनी त्या मंत्र्याच्या पाठलाग करून तेथून हुसकावून लावले होते. या घटनेनंतर या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
-----------------------

दक्षिण गोव्यात सर्वत्र निरुत्साह
मडगाव,(प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकांत मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला व दक्षिण गोव्यातील एकंदर कल पाहता जवळपास सरासरी ५० टक्के मतदान झाले आहे. नुवे तील काही भाग सोडले तर कुठल्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा आढळल्या नाहीत व त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना विशेष धावपळ करावी लागली नाही. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहिती नुसार कुठेच अनुचित प्रकार घडले नाहीत व त्यामुळे शांततापूर्ण मतदान झाले.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी एकूण २० जागा आहेत पण कोलवातून झालेली अविरोध निवड व उमेदवाराच्या अपघाती मृत्यूमुळे नावेलीतील रहित झालेली निवडणूक यामुळे आज प्रत्यक्षात १८ जागांसाठीच मतदान झाले. एरवी कोणत्याही निवडणुकांसाठी सासष्टीत मतदान वेळेपूर्वीच मतदार रांगा लावत पण त्याला ही निवडणूक अपवाद ठरली .काही ठिकाणी तर मतदान वेळ सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी एकाही मताची नोंद झाली नव्हती.
सकाळी १० वा. नंतर काहीसा जोर आला पण मतपत्रिकांचा वापर असूनही मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या नाहीत. दुपारनंतर अडीच ते साडेतीन या वेळेतही तुरळक प्रमाणात मतदार बाहेर पडले पण ५वा. मतदान संपण्यावेळी तर कुठेच रांग नव्हती व त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना लगेच मतपेट्या सील करून आपले काम आवरते घेणे शक्य झाले.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजीव देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सासष्टीतील टक्केवारी अशी आहे. नुवेः६१.६३,राय-६०.९०, दवर्ली ४०.७७, कुडतरी ४५.९३, गिर्दोळी ५४.६१, चिंचीणी ४३.०५, वेळ्ळी ः५४.६३, बाणावली ः४४.५७ .
नुवे मतदार संघातील फतेपुर,डोंगरी या भागांत सकाळपासूनच मतदानाचा जोर होता व तो दुपारपर्यंत टिकला. पर्यटनमंत्री मिकी पाशेकोसमर्थक व वीज मंत्री आलेक्स सिकेरा यांच्या समर्थकांमध्ये तेथे असलेली अटीतटीची लढत हे या मतदानामागील कारण मानले जाते. असाच प्रकार कुडतरी व वेळ्ळीत दिसून आला.
फातोर्डा स्टेडियमवर तणाव
मतदान आटोपल्यावर आणलेल्या नुवे मतदारसंघातील ८ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याला आपण सील करून आणलेल्या पोत्यात एक रिकामी मतपेटीही घातल्याचे दिसून आले व त्याने पोत्याचे सील खुले करून ती रिकामी मतपेटी बाहेर काढली. तो प्रकार एका उमेदवाराच्या समर्थकाने पाहिला व त्याबाबत उमेदवार मास्कारेन्हस यांनी तक्रार मुख्य अधिकाऱ्याकडे करताच त्यांनी दुसरा उमेदवार डिसा याला बोलावून घेतले व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालून प्रश्र्न सोडविला व परत ती पोती सील केली. पण एव्हाना उभय उमेदवारांचे समर्थक तसेच मंत्री मिकी पाशेको व आलेक्स सिके रा तेथे आले व त्यामुळे वातावरण तप्त होत असल्याचे पाहून पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी लोकांना त्वरित तेथून पांगण्याचा इशारा दिला. त्यामुळे तेथे जमलेल्या बघ्यांची व समर्थकांचीही पांगापांग झाली, त्यातून स्टेडियमवर लाठीमार झाल्याची अफवाही पसरली. पण उमेश गावकर यांनी लाठीमाराचा प्रसंगच उद्भवला नसल्याचे सांगितले.

पत्रकाराविषयी चौकशी सुरू

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) ः ड्रग्सप्रकरणात सहभाग असल्याचा संशय असलेल्या अन्य दोन पत्रकारांसह एका मराठी वृत्तपत्रातील "त्या' पत्रकाराविषयी पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून अनेक गोष्टी हाती लागल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सदर पत्रकार अमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्या माफियांच्या समर्थनार्थ लॉबिंग करीत होता, तर ड्रगव्यवहारात गुंतलेल्या अमली पदार्थविरोधी पथकातील भ्रष्ट पोलिसांच्या बाजूने वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी झटत होता. त्यासाठी त्याला एका व्यक्तीकडून "बक्षिसी' मिळत होती, असे सूत्रांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. सर्व पुरावे हाती लागताच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या त्या पत्रकाराची संबंधित वृत्तपत्राच्या व्यवस्थापन मंडळाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.

आता न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा

अमलीपदार्थाची चोरी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - म्हापसा येथील एनडीपीएस न्यायालयातून अमली पदार्थ चोरून आपल्याला पुरवण्यात येत होता, अशी माहिती "अताला' या ड्रग माफियाच्या चित्रफितीत उघड झाल्याने पाच पोलिस निलंबित झाले खरे मात्र, चक्क न्यायालयातून हा अमली पदार्थ चोरला जात होता, अशी माहिती उघड होऊनही अद्याप न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाच्या अखत्यारीत असलेला अमली पदार्थ कसा गायब होत होता, न्यायालयातील कर्मचारी यात सामील होते का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले असून न्यायालय प्रशासन यावर कोणती भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. न्यायालयातून चोरीला जाणारा अमली पदार्थ केवळ अताला यालाच पुरवण्यात येत होता की अन्य ड्रग माफियांनाही तो दिला जात होता, याचाही तपास लावणे महत्त्वाचे बनले आहे.
२००५ मध्ये "दुदू'याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यावेळी त्याला केवळ पाच हजार रुपयांच्या हमीवर सोडण्यात आले होते, अशीही माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या निलंबित करण्यात आलेला पोलिस निरीक्षक आणि चार पोलिस शिपायांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली असून या पाचपैकी एका व्यक्तीची सुमारे दीड कोटी रुपये मालमत्ता असल्याचे उघड झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा आकडा अद्याप वाढण्याची शक्यता आहे. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, याची चौकशी खात्याने केल्यास अनेक अधिकारी कोणाकोणाशी साटेलोटे ठेवून आहेत, याचा भांडाफोड होणार आहे.
निरीक्षक आशिष शिरोडकर वापरत असलेली काळ्या रंगाचे "डिझायर' वाहन भलत्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघडकीस आले आहे. एका पोलिस निरीक्षकाला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेले वाहन घेऊन फिरण्यास कोणती गरज भासली, याचाही तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करीत आहेत.

महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

संसदेत घडणार इतिहास
नवी दिल्ली, दि. ७ - संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठीचे संविधान संशोधन विधेयक उद्या राज्यसभेत मांडण्यात येणार असून, सत्तारूढ कॉंग्रेस, प्रमुख विरोधी पक्ष भाजप आणि डाव्या पक्षांनी या विधेयकास आपला पाठिंबा दिला असल्याने उद्या संसदेत इतिहास घडणार आहे.
एकमत न झाल्याने गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे विधेयक उद्या राज्यसभेत मांडल्यानंतर ते पारित होण्यात कुठलाही अडथळा येण्याची शक्यता नाही. विधेयकाच्या सध्याच्या प्रारुपास विरोध करत असलेल्या पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. तेलगु देसम्, द्रमुक, अण्णाद्रमुक, अकाली दल आणि नॅशनल कॉन्फरन्स या छोट्य़ा पक्षांनीही विधेयकास आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत सध्याची सदस्यसंख्या २३३ इतकी आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधेयकाचे समर्थन केल्यामुळे विरोधकांची धार बोथट झाल्याचे दिसत आहे. नितीशकुमार यांच्या विधानामुळे विधेयकास विरोध असलेल्यांची संख्या फक्त २६ एवढी राहाण्याची शक्यता आहे. संविधान संशोधन विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होण्यासाठी आवश्यक असलेल्या १५५ या संख्येपेक्षा जास्त म्हणजे किमान १६५ सदस्यांचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
विधी आणि न्याय मंत्री विरप्पा मोईली हे उद्या १०८ वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत.

गोव्यातील महिला काळाच्याही पुढे ....

गंगाराम म्हांबरे
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त असो किंवा संसदेत मांडण्यात येणाऱ्या महिला राखीवता विधेयकाच्या पार्श्वभूमीवर असो, गोव्यात महिला किती सक्रिय याचा विचार केला तर अन्य क्षेत्रांप्रमाणेच गोव्यातील महिला राजकारणातही चांगल्याच पुढारल्याचे दिसून येईल. एक काळ तर असा होता की, देशात इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी, नंदिनी सत्पथी अशा कर्तृत्ववान महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन कर्तृत्व गाजवत होत्या; तर गोव्यात श्रीमती शशिकला काकोडकर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या कर्तृत्वाची झलक साऱ्या देशाला दाखवत होत्या.
मुक्तीनंतरच्या कालखंडाचा विचार केल्यास भाऊसाहेब बांदोडकर या वटवृक्षाच्या सावलीत वाढलेल्या ताई काकोडकर अल्पकाळातच एक कर्तबगार राजकारणी महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. १९७३ मध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील त्याचे कार्य, संघटनात्मक पातळीवरील कर्तृत्व आणि राजकारणाची चांगली जाण या जोरावर त्या भाऊसाहेब बांदोडकरांच्या स्वाभाविक राजकीय वारस ठरल्या होत्या. अर्थात, सुमारे चाळीस वर्षांपूर्वी गोव्यातील एक महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवत होत्या. भाऊसाहेब बांदोडकर यांची दूरदृष्टी आणि उदारमतवादी विचारसरणीचा तो परिपाक होता. आज महिलांना समान हक्क समान न्याय राखीवता देण्याच्या विषयावर देशात जागृती होत आहे; परंतु गोव्याच्या या महामानवाने त्याची मुहूर्तमेढ थेट इथल्या राजकारणात रोवूनही ठेवली होती.
दरम्यानच्या काळात आणखीही काही महिला राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. सुलोचना काटकर, मोनिका डायस, आयरिन बार्रुश अथवा व्हिक्टोरिया फर्नांडिस अशी नावे त्या अनुषंगाने घेता येतील. राजकारणात विविध पक्षीय जबाबदाऱ्या या महिला पार पाडत होत्या. निर्मला सावंत अथवा संगीता परब यांनीही मंत्रिपदे भूषविली होती. भाजपच्या महिला आघाडीत तर मुक्ता नाईक, कृष्णी वाळके, शुभांगी वायंगणकर, कुंदा चोडणकर, नीना नाईक यांच्याव्यतिरिक्त नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या महिलाही राजकारणात यशस्वीपणे आघाडी सांभाळीत आहेत. गोव्यातील महिलांसाठी राखीव सरपंचपदी असलेल्या महिलाही यशस्वीपणे आपल्या गावांचा कारभार चालवत आहेत. विद्यमान विधानसभेत एकमेव महिला आमदार म्हणून सांताक्रुझच्या आमदार मामी तळमळीने राज्याच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात. लोकसभेत आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के राखीवतेची तरतूद असलेले महिला विधेयक सुरळीतपणे संमत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास गोवा विधानसभेत १३ आमदार महिला असतील! हा आकडा ऐकून अनेकजण आश्चर्यचकीत तर होतीलच, शिवाय ज्यावेळी १३ मतदारसंघ केवळ महिलांसाठी राखीव ठेवले जातील, त्यावेळी अनेक पुरुष उमेदवारांची झोपच उडणार आहे. विधानसभेत त्यावेळी फक्त २७ पुरुष आमदार असतील. राजकीय पक्षांना आत्तापासूनच १३ महिला उमेदवारांच्या शोधात राहावे लागेल. अर्थात, या राज्यात महिला कार्यकर्त्यांचा तुटवडा अजिबात नाही. तरीही आमदार म्हणून अभ्यास आणि व्यासंग यांची गरज लागते, ज्याची कमतरता आजकाल सर्वत्रच भासते आहे, त्यामुळे महिलांना आत्तापासूनच आपली "तयारी' करावी लागेल. पंचायत आणि पालिका पातळीवर काम करणाऱ्या महिलांना आमदारकीची स्वप्ने पडू लागल्यास नवल नाही, कारण आता तो त्यांचा हक्क असणार आहे. महिला दिनानिमित्त कॉंग्रेस, भाजप आणि डावे पक्ष एकत्रितपणे महिला राखीवता विधेयक संमत करण्यासाठी कंबर कसून उभे ठाकले आहेत, हे या देशातील महिलांचे सुदैव मानायला हवे.

बाह्यविकास आराखडा नगरनियोजनकडे सुपूर्द

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) - मडगावसाठीचा वादग्रस्त ठरलेला बाह्य विकास, आराखडा दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने शेवटचा हात फिरवण्यासाठी नगरनियोजन खात्याकडे सुपूर्द केला आहे.
या पूर्वीच्या आराखड्यात व्यापक प्रमाणात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अनेक बिगर सरकारी संघटनांनी त्याला हरकती घेतल्यावर त्यात दुरुस्ती करण्यासाठी वर्षभरापूर्वी तो "एसजीपीडीए'कडे परत पाठवला होता. त्यावर अभ्यास करून व आवश्यक ते फेरफार करून नगरनियोजन मंडळाच्या गतबैठकीत तो सादरही झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसजीपीडीएने नगरनियोजन मंडळाने केलेल्या सूचनांप्रमाणे फक्त आराखड्याचा आढावा घेतला आहे. मात्र त्याचा आढावा घेऊन तो काही लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी नियमानुसार लोेकांसाठी खुला केला नाही.
आता हा आराखडा नगरनियोजन मंडळाकडे पोहोचला आहे. त्यासंदर्भात लोकांच्या हरकती व सूचना मागवावयाच्या की आहे त्या स्थितीत त्यास अंतिम रूप द्यावयाचे ते नगरनियोजन मंडळावर अवलंबून राहाणार आहे.
या आराखड्याविरुद्ध आंदोलन छेडलेल्या सिटिझन्स वेल्फेअर कमिटीने हा आराखडा रद्द करून नवा आराखडा बनवावा अशी मागणी केली आहे. अत्यावश्यक असलेला जमीन वापर नकाशा तयार न करताच हा आराखडा बनवल्याचे उघडकीस आल्यावर सर्व थरांतून त्यास विरोध झाला आहे. अजूनही तो कायम आहे.

Sunday, 7 March 2010

भागू उपासकर खून प्रकरणातूनही महानंद नाईक दोषमुक्त

मडगाव,दि. ६ (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीं गोव्यात खळबळ माजवलेला सीरियल किलर
महानंद नाईक याला भागू उपासकर खून खटल्यातूनही दोषमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्याला सूरत गावकर खटल्यातही निर्दोष ठरवण्यात आले होते.
येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी आज हा निवाडा दिला.
महानंदवर ठेवलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा सादर करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरल्याचे ताशेरे न्यायालयाने तपाससंस्थेवर सूरत गावकर प्रकरणातही याच कारणास्तव तो दोषमुक्त ठरला होता.
भागू उपासकरचा खून २१ ते २२ मार्च २००७ दरम्यान झाला होता. पारोडा येथे चंद्रनाथ पर्वताच्या पायथ्याशी तिचा मृतदेह सापडला होता. प्रथम कोणीच या प्रकरणात खुनाची तक्रार नोंदविली नव्हती. मात्र महानंदचे कारनामे उघडकीस आल्यावर व फोंडा पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याने भागूच्या खुनाचीही कबुली दिली होती.
त्याने आपण तिला पर्वतावर नेले व नंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. तिच्या अंगावरील दागिने घेऊन मृतदेह शेतात टाकून दिला, अशी कबुली पोलिस तपासात दिली होती. नंतर न्यायलयात त्याने याचा इन्कार केला होता.
भागू ही अनिता देसाई हिच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला होती. तिचे लग्न ठरले होते व तिच्या विनंतीवरून अनिताने तिला आपल्या अंगावरील दागिने उसने दिले होते. काम झाल्यावर तिने ते परत करावयाचे होते.
महानंदने विकलेली भागूच्या गळ्यातील साखळी व बांगडी फोंडा येथील एका सोनाराकडून पोलिसांनी जप्त केली होती. तोच या खटल्यांतील महत्त्वाचा पुरावा मानला जात होता. मात्र ते दागिने अनिता देसाई ओळखू शकल्या नाहीत. सरकार पक्षाची ती बाजूही लंगडी पडली. महानंद नाईक याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२,३९२ व २०१(खून, चोरी व पुरावे नष्ट करणे) या कलमांखाली गुन्हे नोंदवले होते. सरकारतर्फे भानुदास गावकर यांनी व न्यायालयाने मोफत कायदा सेवेद्वारे उपलब्ध केलेले ज्यो वाझ यांनी आरोपीतर्फे काम पाहिले.

अबकारी खाते व मद्य तस्करांचे साटेलोटे!

चेकनाके चुकवून लाखोंंच्या मद्यसाठ्याची गोव्यातून तस्करी

सावंतवाडी व पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - गोव्यात ड्रग माफिया व पोलिसांचे साटेलोटे उघड झाले आहेच, पण आता अबकारी खात्याचे अधिकारी व बेकायदा मद्य तस्करांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडील अबकारी खात्याची नजर चुकवून राज्यातून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी सुरू आहे. अबकारी खाते व वाहतूक खात्याचे चेकनाके चुकवून लाखो रुपयांचा मद्यसाठा सीमेबाहेर नेला जातो. महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते यांच्यातर्फे गोवा- महाराष्ट्र सीमेवर अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला, त्यामुळे या बेकायदा व्यवसायात अबकारी खाते, वाहतूक खाते व मद्य तस्करांच्या अनेक टोळ्यांचे साटेलोटे असावे, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अबकारी खात्यात बनावट दाखल्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात मद्याची आयात होत असल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात उघड करून कोट्यवधींच्या मद्य घोटाळ्याचा कागदोपत्री पुराव्यांसह पर्दाफाश केला होता. या घोटाळ्याची चौकशी "सीबीआय'मार्फत करावी, ही पर्रीकरांची मागणी मान्य करण्याचे धाडस मुख्यमंत्री कामत यांनी दाखवले नाही. वित्त सचिवांमार्फत चौकशी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आता या प्रकरणाला तीन महिने उलटत आले तरी अद्याप या चौकशीची सूत्रेच हलत नसल्याचे उघड झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री या चौकशीत कोलदांडा घालत असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात गोवा- महाराष्ट्र सीमेवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यसाठ्याची तस्करी सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या जानेवारीत गोव्यातून अवैध पद्धतीने सुमारे सात लाख रुपयांचा मद्यसाठा घेऊन कोल्हापूरमार्गे वाहतूक करणारा टेंपो बांदा पोलिसांनी पकडल्यानंतर काल गोव्याहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खाजगी मिनी आरामबसवर छापा टाकून सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने विनापरवाना वाहतूक होणारा एकूण आठ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
दरम्यान, शासकीय गाडीतून मद्य वाहतूक करणाऱ्या एका गाडीचालकाने सावंतवाडी येथील पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रकार काल घडला. कृषी विभाग, भारत सरकार असे नाव असलेल्या गोवा परवान्याच्या ऍम्बेसिडरमधून मद्य वाहतूक होत असल्याची माहिती गोव्यातीलच पोलिसी खबऱ्याने सावंतवाडी पोलिसांना दिली होती. सदर वाहनात मद्याच्या बाटल्या घालताना त्याला दम भरला असता "शासनाची गाडी आहे. पोलिसांत ती थांबविण्याची हिंमत आहे काय,' असा उलट प्रश्न विचारून संबंधित चालकाने गाडीत मद्याच्या बाटल्या भरल्या. ही माहिती सदर खबऱ्याने सांवतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार शहरात सापळा रचण्यात आला; मात्र तत्पूर्वीच त्या गाडीचालकाने पोलिसांना गुंगारा दिल्याने रात्री उशिरापर्यंत शहरात नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, गोव्यात उत्पादन केलेल्या मद्यावर वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे लेबल लावून ते मद्य कर्नाटक व आंध्र प्रदेशात विकले जाते, असा संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टेंपोतून हस्तगत केलेल्या मद्याच्या बाटल्यांवर "एस. वीरा बिसलरी मिनरल लिमिटेड' या कंपनीचे लेबल लावले होते. या कंपनीचे अधिकार "डिस्टिल ब्रॅंड वॉटर बार' हैदराबाद यांना बहाल आहेत. प्रत्यक्षात हे मद्य गोव्यातच तयार होते व बड्या कंपन्यांच्या लेबलखाली बनावट पद्धतीने तयार होऊन ते जादा दराने इतरत्र विकले जाते, असाही पोलिसांचा कयास आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडून मद्याच्या तस्करीबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे व या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न आरंभले आहेत. तथापि, गोवा पोलिस व अबकारी खात्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या या बसमधील (एमएच ०९ बीसी ४०४२) डिकीत गोवा बनावटीच्या मद्याची खोकी ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली चेक नाक्यावर बसची तपासणी करण्यात आली असता विनापरवाना दारुसाठा सापडला. याप्रकरणी आरोपी सुरेश रमेशलाल मिखिजा (२६), होनाजी लक्ष्मण आडागळे(३२ - दोघेही राहणार अहमदनगर) तसेच भय्यास खतीब (३१) व वीराप्पा बसप्पा गणमुखी (३७ - दोघेही राहणार कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिनी बस गोव्याहून कोल्हापूरमार्गे पुण्याला जात होती. ही कारवाई महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक उल्हास नाईक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक जे. एस. पवार, दुय्यम निरीक्षक गोगावले जमादार भागवत तसेच जवान सूरज चौधरी, सावंत, शेलार, कदम, बिरामदार, चाटे यांनी संयुक्तपणे केली.

कचरा व्यवस्थापनाचा गोव्यात पूर्ण बोजवारा

केंद्रीय मंत्री सेलजा यांनी कामत सरकारला फटकारले

पणजी, दि. ६(प्रतिनिधी) - जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याला वर्षाकाठी सुमारे साडेचार लाख विदेशी पर्यटक भेट देतात. देशी व विदेशी पर्यटकांची वार्षिक संख्या इथल्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट आहे. मात्र राज्यात कचरा व्यवस्थापनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याने पर्यटनाच्यादृष्टीने हा चिंतेचा विषय बनल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री कुमारी सेलजा यांनी स्पष्ट केले. एकप्रकारे त्यांनी गोवा सरकारच्या भोंगळ कारभाराची हजेरीच घेतली.
पश्चिम विभागीय पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्यांनी गोव्यातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापनाची दुर्दशा हे पर्यटनासमोरील मोठेचआव्हान आहे. हा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी पर्यटनमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पर्यटकांचा ओघ वाढेल तशी कचऱ्याची समस्या बिकट होत जाईल, त्यामुळे कचरा विल्हेवाट यंत्रणा राबवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी, अशी सूचना त्यांनी केली.
वनक्षेत्र व वन्यजीव विभागाचे सरंक्षण हवे
पर्यटनाचा विकास करताना त्याचा फटका वने व वन्यजीव क्षेत्राला बसणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय पर्यटन सचिव सुजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. पर्यटन उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाची सोय झाली आहे. या उद्योगाचा विस्तार होण्यासाठी समाज अधिकाधिक संवेदनशील बनवण्याकामी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खात्यातर्फे आयोजित केलेल्या "रोड शो'प्रसंगी ते बोलत होते. या रोड शोमध्ये देशातील पर्यटनविषयक अनेक संस्था व उद्योजक सहभागी झाले होते. पर्यावरण हा पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरणाचा सांभाळ करूनच पर्यटनाचा विकास व्हायला हवा. केंद्रीय मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेला या पद्धतीचा हा चौथा रोड शो होता. यापूर्वी पश्चिम बंगाल, बंगळूर व बुद्धगया याठिकाणी अशा रोड शोंचे आयोजन करण्यात आले होते.
"रोड शो'त पर्यटक सुरक्षेवरच भर
अलीकडच्या काळात विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेवरून निर्माण झालेल्या अनेक घटनांमुळे गोव्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या घटना टाळण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पर्यटकांशी संबंधित प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली. गोव्यात किनारी सुरक्षा व्यवस्थापनाचा कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवला जात असल्याचेही ते म्हणाले.
पर्यटन सचिव डॉ. एम. मुदास्सीर यांनीही विचार मांडले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त किनारी पोलिस स्थानक स्थापन करण्याचीही योजना विचाराधीन असल्याची माहितीही देण्यात आली.