स्कार्लेट खूनप्रकरण
फियोनाची पुन्हा मागणी
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): स्कार्लेट खून प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या पुत्राची "सीबीआय'मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आज पुन्हा एकदा स्कार्लेटची आई फियोना हिने केली आहे. १८ फेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेटचा मृतदेह हणजूण समुद्रकिनाऱ्यावर आढळून आल्यानंतर पहिल्यांदा गृहमंत्र्यांच्या पुत्रावर आरोप झाला होता.
"माझी मुलगी स्कार्लेट हिच्या मृत्यूसाठी जे लोक जबाबदार आहेत ते लोक गोव्यामध्ये अद्याप मोकाट फिरतात'' असा आरोपही फियोना हिने केला आहे. ""ज्या पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या तपासाशी छेडछाड केली, त्याला आधी निलंबित केले व पुन्हा त्याला सेवेत घेण्यात आले. आज स्कार्लेटच्या मृत्यूला अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला असूनही मी अद्यापही स्कार्लेटच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू शकलेले नाही. न्याय मला अद्यापही हुलकावणी देतो आहे,'' अशी खंतही फियोना हिने व्यक्त केली.
उद्या ३० जुलै रोजी फियोना बाल न्यायालयात आपली जबानी नोंदवणार आहे. यावेळी आपण अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करणार असल्याचाही दावा फियोनाने केला आहे. त्यामुळे पोलिस ड्रग माफिया प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे गृहमंत्री या प्रकरणातही गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्कार्लेटच्या मृत्यूनंतर अनेकांनी मला मंत्रिपुत्राबद्दल सांगितले होते. त्यामुळे "सीबीआय'मार्फत त्याच्या सहभागाची चौकशी करावी आणि याचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी तिने केली आहे. माझ्या मुलीला ड्रग पाजून मारण्यात आले. त्यामुळे यात राजकीय आशीर्वादाने चालणाऱ्या ड्रग व्यवसायातील माफियांचाही हात असू शकतो, असे मत तिने व्यक्त केले आहे.
पोलिसांनी सुरुवातीला आरोपींना ताब्यात घेण्याचे सोडून माझ्यावर आरोप करण्यात सुरुवात केली. तसेच संशयितांना पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर वेळ उपलब्ध करून दिला, असा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी दोघा स्थानिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आरोपपत्रही सादर केले आहे.
Friday, 30 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment