- डॉ.प्रमोद पाठक
छत्रपती शिवाजी महाराजांवरील जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकावरून शिवप्रेमींमध्ये संताप पसरला आहे. प्रत्यक्षात या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती, तथापि प्रथम हायकोर्टाने व अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठविल्याने पुन्हा एकदा शिवप्रेमी खवळले आहेत. छत्रपतींचा अवमानकारक इतिहास आणि खोट्यानाट्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, या पुस्तकात नेमके काय आहे आणि ते कसे विपर्यस्त आहे, याचे विवेचन करणारी ही लेखमाला...
"शिवाजी ः हिन्दू किंग ऑफ इस्लामिक इन्डिया' या पुस्तकाच्या निमित्ताने पुण्यात थोबाड काळे करणे, भांडारकर प्राच्य विद्या संशोधनसंस्थेत जाऊन नासधूस करणे व नंतर त्या प्रकारांचे काही प्रमाणात समर्थनही करण्याचे जे प्रकार झालेत त्यामुळे मला स्वतःला अत्यंत दुःख झाले. माझ्या वैदिक साहित्यावरील संशोधनासाठी व नंतरही इतर संशोधनासाठी ह्या विद्यामंदिराच्या पायऱ्या मी मोठ्या आनंदाने चढलो. वा. ल. मंजुळांसारखी तत्पर, माहितगार आणि स्वतःच एक संदर्भ कोश बनलेली व्यक्ती वंदनीय वाटण्याजोगी व्यक्ती तेथे होती. तिथे वृद्धापकाळालाही न जुमानता तासचे तास संशोधन करत नवे ज्ञानकण निर्माण करणारे ऋषितुल्य संशोधक ज्या बारकाईने अभ्यास करतात, ते पाहून मला स्फूर्ती मिळत असे. अशा विद्यामंदिराची नासधूस करणाऱ्यांना ते काय करत आहेत याची कल्पनाच करता येणे शक्य नाही. नालंदा, तक्षशिला व इतर अनेक विद्यामंदिरांचा विध्वंस करणाऱ्यांच्या मालिकेत बसण्याचे श्रेय मात्र त्यांनी मिळविले. ज्ञान, ज्ञानसाधना, इ. गोष्टींचा गंध नसणाऱ्यांनीच असले वेडाचार करावेत. मला त्या पुस्तकाबद्दल काय वाटले, त्यातील प्रतिपादन कसे अर्धवट आणि अज्ञानावर आधारले आहे, याची थोडक्यात माहिती देणारा एक इंग्रजी लेख मी तेव्हा आठवड्याच्या आत लिहून इमेल द्वारे वितरित केला होता. त्या लेखाचे शीर्षक होते.
Shivaji, Great Hindu Hero or an Exaggerated legend. Debunking James W. Laines ``Hindu king of Islamic India``
तो लेख माझ्या अमेरिकेतील मित्रांनी फार मोठ्या प्रमाणावर वितरित केला. मला त्यावर मिळालेल्या प्रतिक्रिया फार मनःपूर्वक लिहिलेल्या आणि अधिक विस्तृत लिहिण्यासाठी आग्रह करणाऱ्या होत्या. मला मिळालेल्या माहिती प्रमाणे पुण्यात अनेकांनी तो लेख वाचला आणि मला अत्यंत आनंद देणारी घटना म्हणजे मा. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या प्रकाशनातर्फ इ-मेल वर वितरित होणाऱ्या महत्त्वाच्या लेखांमध्ये दै. चिन्टू व्यंगचित्रेमालेद्वारे तो कितीतरी लोकांपर्यंत पोहचला. मला माझ्या थोड्या फार श्रमांचे फार मोठे मोल मिळाले. अनेकांनी व्यक्तिगत स्तरावर व प्रत्यक्ष भेटीत मला त्या लेखाबद्दल प्रतिक्रिया दिल्या व अधिक विस्ताराने लिहिण्याची विनंती केली. मी लेखात लिहिले होते की या पुस्तकातील विधानांचा वाक्यावाक्याला घेऊन प्रकरणशः प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे. ते लिहिलेले खरे करून दाखवा असे गर्भित आव्हान आणि आवाहन असे दोन्ही मिळत गेले. त्या सर्वांचा मान ठेवून व शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण करून ही लेखमाला लिहायला घेतो आहे.
प्रथमतः लेखकाचा समाचार आणि त्याचे साध्यासुध्या गोष्टीतील अज्ञान लक्षात घेतले तर पूर्ण पुस्तकात त्याने जो गोंधळ घातला आहे त्याची कल्पना वाचकांना येईल. अमेरिकेचा निवासी असलेला हा महाभाग, जेम्स डब्ल्यू. लेन, हातात लेखणी मिळताच बाल वाशिंग्टनच्या कुऱ्हाडी प्रमाणे बालबुद्धीने वाटेल त्या दिशेने चालवू लागला. पेशवाईत काही फाकड्या व्यक्ती प्रसिद्धीस आल्या. त्यावरून आठवले की विसाव्या शतकातला हा जेम्स फाकडा आपल्या लेखणीचा उपयोग करून ज्या विषयात त्याला समजण्याची शक्यता नाही त्यात आपली लेखणी वेडीवाकडी चालवू पाहतो आहे. वर पुन्हा आव्हान देतो की माझ्या पुस्तकाचा बौद्धिक पातळीवर प्रतिवाद करा. मात्र जेव्हा प्रतिवाद करण्यासाठी मी उभा राहिलो तेव्हा जेम्स फाकडा माझ्या पत्राची पोचसुद्धा देईना.
मी लिहिलेल्या लेखाची प्रत जेम्स फाकड्याला प्रथम इ-मेलने पाठविली. ती परत आली नाही. पत्रासूराने (Mailer Demon) ती पोहोचली नसल्याचा निरोप दिला नाही. तेव्हा अपेक्षा होती की जेम्स फाकडा अमेरिकी रीतीरिवाजांना धरून त्याची पोच देईल व थॅंक्स म्हणेल. ते न घडल्याने पंधरा दिवस वाट पाहून मी तो लेख पोस्टाने पाठविला. त्याचीही पोच नाही. प्रतिवाद करणे दूरच. आता त्याबाबत काही करता येणे शक्य नाही. धरून बांधून या अमेरिकन फाकड्याच्या हाती तलवार थोपविणे शक्य दिसत नाही, हे माझ्या लक्षात आले. पेशवाईतील पूर्वीच्या एका फाकड्याप्रमाणे हाही पळपुटा ठरला.
इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीचा एक मोठा मानला गेलेला लष्करी अधिकारी मला आठवला. तो माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला आपल्या मराठी लोकांनी इस्टूर फाकडा असे बिरुद लावले होते. पेशवाईतील फाकड्यांमध्ये त्याचा समावेश होतो. याने पुण्यात त्यावेळी बराच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याने पुण्यातील इंग्रजी रेसिडेंसी शस्त्रसज्ज करण्याचा घाट घातला. पण त्याच्यावर शिरजोर ठरलेल्या नानाने त्याची शस्त्रांची चोरटी आयात बरोबर पकडली. नाना फडणवीस असेपर्यंत मराठी राज्याला हात लावता येणार नाही याची त्याला पुरेपूर कल्पना आली. त्याचे वाक्य "जब तक नाना तब तक पुना।' हे इतिहासात प्रसिद्ध झाले आहे. तसे पाहिले तर पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमध्ये "नाना' हा फक्त लेखणी बहाद्दर म्हणून अर्धाच शहाणा गणला गेला. मात्र त्याने इस्टूर फाकड्यावर वेळोवेळी मात केली. आता सुमारे दोन शतकांनी हा अमेरिकन जेम्स फाकडा त्याच आवेशात उभा आहे. त्याला वास्तवात घडलेले लोकविलक्षण, रोमहर्षक आणि स्फूर्तीदायी "शिवचरित्र' मिथ्यकथा - भाकडकथा म्हणून ठरवायचे आहे. (क्रमशः)
Sunday, 25 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment