Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 19 June 2009

गोमंतकीयांना कॅसिनोंपासून दूर ठेवा

पणजी, दि. १८ (विशेष प्रतिनिधी): मांडवी नदीतील सागरी कॅसिनोंमुळे गोव्यावर येऊ घातलेल्या आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक संकटाविषयी सातत्याने इशारा देत आवाज उठविणारे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कोणत्याही परिस्थितीत या कॅसिनोंना खोल समुद्रात हटविणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार केला. गोमंतकीयांना कॅसिनोवर जाण्यास बंदी घालण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाने गोव्यातील कॅसिनोंना नेहमीच विरोध केला असून भविष्यातही तो कायम राहणार असल्याचे प्रतिपादन श्री. पर्रीकर यांनी केले. नुकत्याच झालेल्या गृह खात्याच्या अस्थायी समितीच्या बैठकीत कॅसिनोंबाबतच्या गैरव्यवहाराविषयी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर राज्याच्या मुख्य सचिवांसहित वरिष्ठ शासकीय अधिकारीही निरुत्तर झाल्याने आपण थक्क झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील समुद्र किनारी सरकारने आणलेल्या या कॅसिनोंवर मोठ्या प्रमाणात पैसे उधळण्यापासून अल्पवयीन गोमंतकीय युवक व व्यावसायिकांना रोखले नाही तर त्यांच्या सात पिढ्या मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांना शाप देतील, असेही श्री. पर्रीकर यांनी ठणकावून सांगितले. पर्रीकर यांच्या मते फ्रांस व मकाऊमध्ये कॅसिनोंवर जाण्यास स्थानिकांना मनाई आहे, केवळ त्याठिकाणी पर्यटक म्हणून जाणाऱ्यांना कॅसिनोंवर जाण्यास परवानगी आहे. मिसिसिप्पी शहरासहित इतर देशांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, बरीच कुटुंबे कॅसिनोंमुळे उद्ध्वस्त झाल्याने त्या देशांची मोठी सामाजिक हानी झाली आहे. तेथे कॅसिनोंवर जाणारी व्यक्ती ही कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने दागदागिने व घरदार विकूनही ते फेडणे शक्य न झाल्याने प्रसंगी आपल्या बायकामुलांनाही "डावाला' लावण्याची पाळी आल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार व विशेषतः नदी परिवहन खात्याने जर या कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण रोखले नाही तर गोमंतकीयांना त्यापासून वाचविणे अजूनही शक्य आहे. पणजीतील किमान सात ते आठ व्यावसायिक कॅसिनोंच्या मोहपाशात अडकून सध्या आर्थिक संकटात सापडल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एका नामांकित खाजगी बॅंकेचा वसुली अधिकारीही कॅसिनोच्या जाळ्यात ओढला जाऊन त्याने वसुलीची रक्कम कॅसिनोंवर उधळल्याचे आणखी एक उदाहरणही त्यांनी यावेळी बोलताना दिले. पर्यटक येथे येतील, एक दोन दिवस कॅसिनोंवर खेळतील व परत जातील. तथापि, गोमंतकीय मात्र या कॅसिनोंच्या मोहपाशात अडकून सर्वनाश ओढवून घेतील असा इशारा देत हे कुटुंबासाठी तसेच समाजासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील या धोक्याचे वादळ घोंगावत असून भारतीय जनता पक्षाचा कॅसिनोंना तीव्र विरोध राहील असे ते म्हणाले.
सर्व नियम पायदळी तुडवून कशाचीही पर्वा न करता परवाना देण्याच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध प्रखर वक्तव्य करताना श्री. पर्रीकर म्हणाले की, कॅसिनो मालकांची वैयक्तिक पार्श्वभूमी व गुणवत्ता तपासून पाहण्याची कोणतीच तसदी सरकारने घेतलेली नाही. कॅसिनो व्यवसायात असलेल्यांबाबत सरकारने पोलिस अहवालही मागविलेला नाही. आपण मुख्यमंत्री असताना पारपत्रासाठी अर्ज केल्यावेळी आपली वैयक्तिक पार्श्वभूमी व आपल्यावरील राजकीय खटल्यांबाबतचा पोलिस अहवाल मागविण्यात आला होता, असे सांगून कॅसिनोंना परवाना देण्यासाठी मात्र सरकारला एवढी घाई का झाली? असा सवाल पर्रीकर यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याने काही पोलिस तक्रारी आपल्याविरुद्ध होत्या व नेमके तेच कारण देत पोलिसांनीही आपल्या पारपत्रासाठी तेव्हा हरकत घेण्यास बरीच तत्परता दाखविली होती. आज गोव्यातील कॅसिनो व्यवसायात सामील असलेल्यांचा वैयक्तिक अहवाल सरकारला सादर करण्यापासून पोलिसांना कोणी रोखले? असा खडा सवालही त्यांनी केला.
गोव्यातील बहुतांश कॅसिनोंना गैरमार्गाने परवाने देण्यात आल्याचे आपल्याकडे आवश्यक ते पुरावे असल्याचे पर्रीकर म्हणाले. कॅसिनो कंपन्यांनी आवश्यक ते कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्याआधीच बंदर कप्तानाकडून त्यांना परवाने देण्यात आल्याची काही प्रकरणे त्यांनी नमूद केली. कॅसिनोंकडून राज्याला महसूल मिळतो, त्यामुळे त्यांना मान्यता देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भाष्य करताना श्री. पर्रीकर म्हणाले की, राज्यासाठी महसूल महत्त्वाचा आहे पण तो कोणती किंमत देऊन? कॅसिनोंनी सरकारसाठी जमविलेला महसूल हा तसा फार मोठा नाही. विक्रीकर चुकविणाऱ्यांकडून तो वसूल करण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न केल्यास त्यात पाच टक्क्यांनी वाढ होऊ शकते, याद्वारे ५० कोटी महसुलाची तिजोरीत भर पडू शकते, असे श्री. पर्रीकर म्हणाले. अधिक महसूल हवा म्हणून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या कॅसिनोंना परवाना द्यायचा का? असा प्रश्नही पर्रीकर यांनी केला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सागरी कॅसिनोंविरुद्ध आवाज उठविणारे कॅसिनोंना खोल समुद्रात हटविल्यानंतर शांत होतील हे सांगण्यासाठी "आउट ऑफ साइट, आउट ऑफ माईंड' असे निवेदन केले होते. त्यांच्या त्या निवेदनाचा समाचार घेताना श्री. पर्रीकर म्हणाले की, ज्यांचे हात घोटाळ्यात अडकले आहेत तेच अशा गोष्टी पिकवितात. गोव्यातील कॅसिनोंबाबत सरकारचे काही लिखित धोरण आहे का? याचे उत्तर गोमंतकीय जनतेने सरकारकडेच मागण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. जर सरकारचे लिखित धोरण असेल तर त्यानुसार किती कॅसिनोंना मान्यता मिळू शकते? कॅसिनोवर कोणत्या प्रकारची यंत्रणा असते? तेथे खेळणाऱ्यांना किती पैसे मिळू शकतात? आदी प्रश्नांची उत्तरेही जनतेने सरकारकडे मागावीत असे श्री. पर्रीकर म्हणाले. काही कॅसिनो जहाजे बेकायदा असून आश्चर्याची बाब म्हणजे विदेशी ध्वज असलेल्या दोन बोटींनाही येथे व्यवसाय करण्यास मान्यता देण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
-------------------------------------------------------------------
कॅसिनोंच्या परवान्यांचा घोटाळा
बुधवारी झालेल्या गृह खात्याच्या अस्थायी समितीच्या दीड तास चाललेल्या बैठकीत आपण उपस्थित केलेल्या कॅसिनोंच्या गैरप्रकाराबद्दल एकाही प्रश्नाचे गोवा सरकारच्या मुख्य सचिवांसहित, अवर सचिव व संयुक्त सचिवांनाही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. किमान पाच कॅसिनोंच्या परवान्यांच्या बाबतीत पूर्वदिनांकित कागदपत्रे तयार करण्यापासून कागदोपत्री लबाडी व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप श्री. पर्रीकर यांनी केला. आपल्या या आरोपाच्या समर्थनार्थ माहिती हक्क कायद्याखाली कागदपत्रे गोळा केल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय अधिकारी, बंदर कप्तान, गृहमंत्री, मुख्यमंत्री व कॅसिनो मालकांच्या संगनमताने गोव्याचा सर्वनाश करण्याचा जो पद्धतशीर घाट रचला जात आहे, तो हाणून पाडल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कॅसिनो प्रकरणांच्या खटल्यात सरकारकडून न्यायालयातही वस्तुस्थितीची नीट माहिती पुरवली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

प्रसंगी प्राणाची आहुती कळणेवासीयांचा निर्वाणीचा इशारा

भूमिपुत्रांच्या मदतीस
वैशाली पाटील येणार

पणजी, दि. १८ (प्रीतेश देसाई): मेसर्स मिनरल ऍंड मेटल या खाण कंपनीच्या विरोधात खदखदत असलेल्या कळणे गावातील भूमिपुत्रांनी वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शवली आहे. २४ जून रोजी ओरोस येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर कळणे गावातील सर्व रहिवासी, खाण कंपनीला देण्यात आलेला परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहेत. या मागणीला प्रशासनाने दाद न दिल्यास त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा गावातील काही तरुणांनी दिला आहे. पणजीपासून ६७ कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या हद्दीतील गोव्याशी साम्य दाखवणाऱ्या कळणे गावात १९ मार्च ०९ पासून सुरू झालेले जनआंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात "सेझ'प्रकल्पांच्या विरोधात लढणाऱ्या वैशाली पाटील उद्या दुपारी कळणे गावात येणार असून त्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या या जनआंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती गावच्या सरपंच सुनीता भिसे यांनी दिली.
गावातील लोकांमध्ये दहशत माजवणे, महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग करणे तसेच जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणे आणि खोट्या खून प्रकरणात गावातील १६ कर्त्या पुरुषांना तुरुंगात डांबल्याने दोडामार्ग पोलिस स्थानकाचे निरीक्षक नंदकुमार देशमुख यांना त्वरित निलंबित करण्याची जोरदार मागणी कळणेवासीयांनी केली आहे. तसेच १६ जणांवर लावण्यात आलेले ३०२ कलम रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या खाणीच्या विरोधात कळणे गावातील श्री देवी माउली मंदिरात गावातील महिला आणि पुरुषांनी गेल्या अडीच महिन्यांपासून "भजन सत्याग्रह' सुरू ठेवला आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत महिला तर सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत पुरुष या मंदिरात ठाण मांडून असतात.
मंदिराच्या पाट्यांवर कागदी फलक लावण्यात आले असून त्यावर ""हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा'', ""आंब्याच्या फांदीवर बसला आहे मोर, मंत्र्याचा मुलगा मायनिंग चोर'' अशा घोषणा लिहून लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रशासनाने अद्याप दाद दिली नसून सत्ताधारी पक्षाचा एकही नेता गावाकडे फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातही तीव्र गरळ ओकली जात आहे. ""नारायण राणे हे विधानसभेत खोटे बोलत असून त्यांनी विधानसभेत कळणे आंदोलनाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी गावात भेट देऊन आधी पाहणी करावी'', असे रोखठोक आव्हान यावेळी सरपंच सुनीता भिसे यांनी दिले आहे.

भाजप सोडणार नाहीः राजेश पाटणेकर

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक निकालांनंतर भाजपच्या एकदोन आमदारांच्या फुटून जाण्याच्या कथित वृत्ताचे पडसाद अधूनमधून उठत असतानाच आज भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर हे कॉंग्रेसच्या गळाला लागल्याची अफवा दुपारपासून सुरू झाली. या अफवेमुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ अस्वस्थता पसरली खरी, परंतु खुद्द राजेश पाटणेकर यांनी पणजी येथील मुख्यालयात संध्याकाळी येऊन आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. कॉंग्रेस पक्षातर्फे भाजप आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, तसे आम्ही कदापि करणार नाही, अशी ग्वाही नंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना पाडून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र देशप्रभू यांना निवडून आणण्यासाठी आकाशपाताळ एक केले होते,परंतु श्रीपाद यांना हरवणे त्यांना शक्य झाले नाही. खुद्द डिचोलीत श्रीपाद यांचे बहुमत कमी करण्याचे कॉंग्रेसचे मनसुबे धुळीस मिळाल्याने स्वतःला सर्वेसर्वा समजणारे काही नेते कमालीचे अस्वस्थ झाले होते.वाळपईचे अपक्ष आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी निवडणूक प्रचार काळात डिचोली शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करूनही काही फायदा झाला नाही. या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात भाजपचे आमदार फुटणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या. या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ज्या आमदारांसंदर्भात या अफवा ऐकू येत होत्या, त्यांनी या वृत्ताचा वेळीच स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. मध्यंतरी खुद्द विश्वजित राणे व बाबुश मोन्सेरात कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचेही सांगितले जात होते, परंतु राज्य सरकारात मंत्री असलेल्या या दोन्ही नेत्यांना कॉंग्रेसमध्ये जाण्याची घाई नसल्याचेही स्पष्ट झाले. अशावेळी आज अचानकपणे पुन्हा एकदा पाटणेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होऊन ते कॉंग्रेसच्या कळपात दाखल झाल्याच्या अफवा सुरू झाल्या. मध्यंतरी ते दिल्लीला रवाना झाल्याचेही काही लोक ठामपणे सांगत होते. भाजपच्या नेत्यांनी मात्र याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, दक्षिण गोव्यातील आणखी एका आमदाराच्या जाण्याचीही चर्चा दिवसभरात सुरू होती परंतु तो आमदार आपल्या मतदारसंघातच असल्याचे नंतर कळले. या एकंदर पार्श्वभूमीवर नेमकी परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कार्यालयांचे फोन रात्री उशिरापर्यंत घणघणत होते.

पर्यटनमंत्र्यांना कॅसिनोमुळे सव्वा कोटींचा फटका

माजोर्डातील तारांकित हॉटेलविरुद्ध तक्रार
मडगाव,दि.१८(प्रतिनिधी) : माजोर्डा येथील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित बीच रिझॉर्टविरुद्ध खुद्द पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आपणास या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कॅसिनोद्वारे १.२५ कोटीला फसवल्याची तक्रार कोलवा पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी ती अजून नोंद केलेली नाही; पण तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
या तक्रारीनुसार पाशेको यांना तेथील कॅसिनोवर लागलेली रक्कम परत केली गेलेली नाही. ही शुद्ध फसवणूक असून संबंधितांवर कारवाई करावी व आपणास ही रक्कम मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. मंत्र्यांनी केलेल्या या तक्रारीची दखल घेण्यात आली असून तपास सुरू केल्याची माहिती कोलवाचे पोलिस निरिक्षक एडविन कुलासो यांनी दिली. दरम्यान, एका मंत्र्यालाच कॅसिनोप्रकरणी आलेल्या या अनुभवाची चविष्ट चर्चा सध्या या भागात चालू आहे.

Thursday, 18 June 2009

असे अडकले दरोडेखोर जाळ्यात
यशवंतपूर रेल्वेतून पोबारा केल्यानंतर दरोडेखोरांनी लोंढ्याहून निघालेल्या एका मालगाडीच्या इंजिनमध्ये पुढच्या प्रवासासाठी घुसण्याचा प्रयत्न केला. चालकाने त्यांना आत न घेतल्याने मागे असलेल्या "डमि इंजीन'मध्ये त्यांनी प्रवेश केला. "यशवंतपूर एक्सप्रेस'मध्ये अज्ञातांनी लूटमार केल्याची माहिती त्या माल गाडीच्या चालकाला मिळाल्याने त्याने चालत्या गाडीतूनच रेल्वेच्या मुख्य कार्यालयाला माहिती दिली आणि आपल्या मालगाडीमध्ये चढलेल्या चारही अज्ञातांबाबत संशय व्यक्त केला. मालगाडी धारवाडच्या रेल्वे स्थानकावर पोचली असता येथे पूर्वीच तयारीत असलेल्या रेल्वे पोलिसांनी चारही अज्ञात दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांना केलेल्या गोळीबारात दोन दरोडेखोर जखमी झाले, त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर धारवाड येथील सरकारी इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

यशवंतपूर-वास्को एक्सप्रेसवर दरोडा

अलणावर येथील थरार चौघे पोलिसांच्या ताब्यात गोळीबारात दोघे जखमी

पंकज शेट्ये
वास्को, दि. १७ ः यशवंतपूर (कर्नाटक) येथून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये काल मध्यरात्री सुमारे १५ दरोडेखोरांनी प्रवेश करून प्रवाशांना लुटून सुमारे २० ते २५ जणांना हत्यारांच्या साहाय्याने जबर मारहाण केली. रात्री १.३० च्या सुमारास अलणावर स्थानकावर गाडी थांबली असता दरोडेखोरांनी हल्ला चढवला. रेल्वे पोलिसांनी त्वरित कारवाई करताना चार दरोडेखोरांना गजाआड केले असून त्यांपैकी दोघे जण पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
बंगळूर-यशवंतपूर येथून गोव्यात येणारी यशवंतपूर एक्सप्रेस (क्र. ७३०९) ही रेलगाडी काल रात्री अलणावर रेल्वे स्थानकावर थांबली असता सुमारे १५ जणांचा गट रेलगाडीच्या सामान्य श्रेणीच्या डब्यात घुसला. रेलगाडी पुढच्या मार्गावर जाण्यासाठी निघाली असता दरोडेखोरांच्या गटाने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करून त्यांच्याशी जबरदस्ती करून त्यांचे भ्रमणध्वनी संच तसेच इतर सामान हिसकावण्यास सुरुवात केली. यावेळी सदर दरोडेखोरांना प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चाकू, टेप ब्लेड आदी हत्यारांच्या साह्याने हल्ला चढवण्यात आला. अज्ञात दरोडेखोरांनी डब्यातील सुमारे २० ते २५ जणांना जखमी करून हाती आलेल्या वस्तूंसह धावत्या रेलगाडीतून पलायन केले. यावेळी रेलगाडी लोंढा स्थानकाजवळ पोचली होती.
सुमारे एक तास रेलगाडीमध्ये उच्छाद मांडणारे दरोडेखोर आपले काम साधून येथून निसटल्याचे प्रवाशांना समजताच त्यांनी साखळी ओढून गाडी थांबवली. येथे असलेल्या रेल्वे पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.
लोंढा येथील रेल्वे पोलिसांना त्वरित कारवाई करून लूटमार करून निसटलेल्या दोघा दरोडेखोरांना या वेळी लोंढा स्थानकाच्या आसपास गजाआड केल्याची माहिती रेल्वे पोलिस सूत्रांनी दिली असून त्यांच्याकडून लुटलेला ऐवज व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
"गोवा दूत'च्या वास्को प्रतिनिधीने आज बेळगाव येथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता धारवाड पोलिसांनी गोळीबार करून दोन दरोडेखोरांना जखमी केल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. दरोडेखोरांची तब्येत ठीकठाक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. धारवाड येथे जखमी झालेल्या दरोडेखोरांचे नाव संतोष बसय्या पुजार (रा. पुडकालकट्टी, कर्नाटक, वय सुमारे २० ते २५) व नागराज बाबू पवार (रा. हुबळी, कर्नाटक, वय सुमारे २० ते २५) असे त्यांच्यासोबत महमद आरिफ कुडागोळ (रा. हुबळी, वय २० ते २५) व अशोक चव्हाण (रा. बागलकोट, वय २० ते २५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या इतर दोघांचे नाव मंजू (सायंटिस्ट) व नासीर असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. दोघेही हुबळी येथील रहिवासी आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही दरोडेखोरांजवळ लूटमारीचा ऐवज सापडला असून त्यांच्याकडून काही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या दरोडेखोरांचा इतर काही गुन्ह्यांमध्ये हात असण्याचा संशय पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काल रात्री "यशवंतपूर एक्सप्रेस'मध्ये झालेल्या घटनेत सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज असून सुदैवाने प्राणहानी न होता ही रेल्वे आज सकाळी वास्को स्थानकावर येऊन पोचली.
(सांताक्रुझ दरोडा प्रकरण)
संशयित जुने गोवे पोलिसांच्या स्वाधीन
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) ः सांताक्रुझ बांबोळी येथील मुजफ्फर मंजूर कादीर यांच्या फ्लॅटवर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना न्यायालयात हजर करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. आज कोकण रेल्वे पोलिसांकडून जुने गोवे पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. श्री. कादीर यांच्या फ्लॅटवर दरोडा घालणारी टोळीचे मोठे जाळे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे या दरोड्याचा "रिझवान' हाच "मास्टरमाईंड' असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
रिझवान हा सांताक्रुझ येथे फॅब्रिकेशनचे काम करीत असून काही दिवसांपूर्वी त्याने शामीन याला बरोबर घेऊन या फ्लॅटमध्ये फॅब्रिकेशनचे काम केले होते. त्यामुळे त्याला कादीर याच्या घरातील खडानखडा माहिती होती. "शामीन' या नावावरूनच रिझवान गजाआड झाला. फ्लॅटमध्ये सोने आणि पैसे लुटण्याचे सत्र सुरू असताना तिघेही दरोडेखोर "शामीन जल्दी करो...जल्दी करो' असे म्हणत होते. त्यावेळी मुजफ्फर याची आई जयलाबानू हिला शामीन नावाचा तरुण रिझवान याच्याबरोबर आपल्या घरी येऊन गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिस येताच तिने सर्वांत आधी रिझवान याच्यावर संशय व्यक्त केला होता. पळून गेलेले दरोडेखोर हाती लागण्यापूर्वीच "मास्टरमाईंड' रिझवान सांताक्रुझ येथेच पोलिसांच्या हाती लागला होता.
पोलिसांनीही मानले देवाचे आभार!
दरोडा घालून दरोडेखोरांनी सर्वांत आधी करमळी रेल्वे स्थानक गाठले. याठिकाणी त्यांना किमान दोन तास रेल्वे येणार नसल्याचे सांगण्यात आले. करमळी येथे त्यांना पळून जाण्यासाठी रेल्वे मिळाली असती तर, चौघेही दरोडेखोर त्यांच्या हाती लागले नसते, असे सांगून पोलिसांनी खासगीत बोलताना देवाचे आभार व्यक्त केले. पणजी बस स्थानकावरून ते रिक्षाने करमळीला गेले होते. त्यानंतर त्यांनी करमळीहून टॅक्सी करून फोंडा गाठले आणि तेथून बसने मडगाव गाठले होते. मडगाव बस स्थानकावर त्यांची ताटातूट झाल्यामुळे दोघे आधीच रेल्वे स्थानकावर पोचले तर इतर दोघे मागे राहिले.
ते दोन मोबाईल क्रमांक कोणाचे?
करमळी रेल्वे स्थानकावरून भाड्याच्या टॅक्सीने फोंडा येथे जात असताना या दरोडेखोरांनी टॅक्सी चालकाच्या मोबाईलवरून दोन मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधला होता. ते दोन मोबाईल क्रमांक कोणाचे आहे, यांचा पोलिस शोध घेत आहेत. या टोळीचे जाळे मोठे असण्याचा अंदाज असून मोठा मासा हाती लागण्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोबाईल कंपनीकडून जलद प्रतिसाद मिळत नसल्याने ते दोन मोबाईल क्रमांक कोणाच्या नावावर आहेत, याची माहिती आज सायंकाळपर्यंत पोलिसांना मिळू शकली नव्हती.
विनंती करून "जपमाळ'ही चोरली
धमकी आणि मारहाण करून पैसे आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाने जयलाबानू हिची देवाची जपमाळ मात्र परवानगी घेऊनच हिसकावली. ""अम्मा मैं ये माला लेके जाऊ...इसके जरीये मैं तुम्हें याद रखूंगा'' असे त्या दरोडेखोराने जयलाबानू यांना सांगितले.
एटीएम कार्ड हरवल्याने
४.७५ लाखांचा गंडा

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - एचडीएफसी बॅंकेचे एटीएम कार्ड आणि त्याचा पिनकोड चोरून एका महिन्याच्या कालावधीत ४ लाख ७५ हजार रुपये काढल्याची तक्रार आज आल्तिनो पणजी येथील व्यावसायिक शांताराम झांट्ये यांनी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याने या कार्डाचा उपयोग करून गोवा, कारवार आणि बेळगाव येथील "एटीएम'मधून हे लाखो रुपये चोरल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
घरात ठेवलेले एटीएम कार्ड गहाळ झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याची माहिती बॅंकेला दिली. यावेळी त्यांच्या खात्यातून ४ लाख ७५ हजार रुपये काढल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्याबरोबर कार्ड "ब्लॉक' करून सुमारे ७ लाख २५ हजार रुपये वाचवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दि. २५ मे ०९ पासून हे पैसे काढण्यात आल्याचे उघड झाले आहे.
तक्रारदार शांताराम झांट्ये यांना एटीएम कार्ड वापरता येत नसल्याने त्यांनी ते तसेच आपल्या घरात ठेवले होते. त्याच ठिकाणी एटीएमचा पिनकोड असलेले पोस्टातून आलेले पत्राही ठेवले होते. आज सदर कार्ड शोधण्यासाठी गेले असता त्यांना ते त्याठिकाणी सापडले नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित एचडीएफसी बॅंकेत संपर्क साधला, त्यावेळी त्यांच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या विषयी त्यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.सं. ३८० कलमानुसार गुन्हा नोंद केला असून या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नारायण चिमुलकर करत आहेत.
पणजी बेळगाव महामार्ग चौपदरीकरणास मंजुरी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग १७ च्या सहापदरी महामार्गावरून आपल्या राजकीय नेत्यांत मतभेद असले तरी राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) अंतर्गत पणजी ते कर्नाटक दरम्यान चौपदरी महामार्गाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कंत्राट "आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड' या कंपनीला मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० वर्षांसाठीच्या अनुदान पद्धतीवर या महामार्गाचे काम केले जाणार असून त्यासाठी सुमारे आठशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गेल्या दीड वर्षांपूर्वी गोव्याला भेट दिली होती, त्यावेळी गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खास पॅकेजची घोषणा केली होती. ही घोषणा आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे "राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प' योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी अलीकडेच निविदा मागवण्यात आली होती व त्यात "आयआरबी'ची निविदा मान्य करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे ६५.०७ किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प "बूट' (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) पद्धतीनुसार राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी "आयआरबी' कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान मागितल्याची माहितीही सूत्रांनी दिली. यासंबंधी स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या महामार्गाचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याची अट कंपनीला घालण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सुमारे आठशे कोटी रुपये खर्च करण्यात येणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत खांडेपार व बाणस्तारी नदीवर नवीन पुल उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे मार्गासह इतर अनेक ठिकाणी उड्डाण पुलांचेही बांधकाम केले जाणार आहे. या चौपदरी महामार्गामुळे गोवा ते कर्नाटक प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या नवीन मार्गामुळे मोले व अनमोड मार्गे बेळगावला जाण्यासाठी फक्त दीड तास लागणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
महापालिकेच्या मदतीला
आता संजित रॉड्रिगीस
बायंगिणी अधिसूचित करण्याचा
महापालिकेचा एकमुखी ठराव

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- पणजी महानगरपालिकेचा ढासळता कारभार आपल्या कार्यकाळात बऱ्यापैकी रुळावर आणण्यात यशस्वी ठरलेले व विशेष करून कचऱ्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचललेले गोवा नागरी सेवेतील अधिकारी संजित रॉड्रिगीस यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या आयुक्तपदी पाचारण करण्यात आले आहे. महापालिकेच्या अनेक निर्णयांत वादग्रस्त भूमिका घेणारे आयुक्त मेल्विन वाझ यांची आज आयुक्तपदावरून तात्काळ बदली करून श्री. रॉड्रिगीस यांना या पदावर नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले.
गेल्या दोन आठवड्यांपासून प्रलंबित असलेल्या आणि पणजी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या विषयावरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे एकही जागा नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पसरले आहेत व दुर्गंधीमुळे नागरिकांचे जिणे असह्य झाले आहे. विद्यमान आयुक्त मेल्विन वाझ हा विषय हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी बोलावलेल्या बैठकीत श्री.वाझ यांच्या बदलीची जोरदार मागणी केली होती. नगर विकास खात्याने महापालिकेसाठी बायंगिणीची जागा निश्चित करून सात महिने उलटले तरी अद्याप ही जागा ताब्यात घेण्यास महापालिकेला अपयश आल्याने ज्योकीम आलेमाव यांनीही महापालिका आयुक्तांना खडसावून काढले होते. दरम्यान, पणजी महानगरपालिकेत निर्माण झालेल्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व हा कारभार व्यवस्थित रुळावर आणण्यासाठी संजित रॉड्रिगीस हेच योग्य अधिकारी आहेत, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याने नगर विकास मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी रॉड्रिगीस यांची महापालिका आयुक्तपदी नेमणूक केली आहे. त्यांना महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

बायंगिणीची जागा औद्योगिक विभाग घोषित करा
बायंगिणीची जागा ही सध्या रहिवासी विभागाअंतर्गत येते तेव्हा राज्य सरकारने ताबडतोब ही जागा औद्योगिक विभाग क्षेत्रात अधिसूचित करावी व या जागेचा ताबा महापालिकेकडे सुपूर्द करावा, असा एकमुखी ठराव आज महापालिका मंडळाने संमत केला. महापौर कॅरोलिना पो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विरोधी गटासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. बायंगिणी येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे व येथे वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा कोणताही प्रश्न उपस्थित होणार नाही, असेही यावेळी महापौर पो यांनी स्पष्ट केले. पणजीचा कचरा अन्यत्र कशासाठी? असा विरोध करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे पणजी ही राजधानी आहे व येथे राज्यभरातून लोक, पर्यटक येतात. त्या सर्वांचा कचरा येथे साठतो. त्यामुळे हा कचरा पणजीचाच कशावरून? असा प्रश्न उपस्थित करून जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर पवित्र शव प्रदर्शनावेळी पणजी महापालिकेकडूनच कचरा उचलला जात होता, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. सरकारकडून वारंवार आपल्या निर्णयात फेरफार केला जातो, त्यामुळेच हा विषय अजूनही ताटकळत असल्याचेही महापौर पो म्हणाल्या.
दोन दिवसांत पणजी चकाचक
शहरात साठलेला कचरा उचलण्याचे काम सुरू झाले असून येत्या दोन दिवसांत पणजी शहर चकाचक होईल, असा विश्वास कॅरोलिना पो यांनी व्यक्त केला. शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दोना पावला येथील पठारावर तात्पुरती सोय करण्यासाठी जागा उपलब्ध केल्याने सध्या हा कचरा तिथे टाकण्यात येणार आहे व तो वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. बायंगिणीची जागा ताब्यात घेतल्यानंतर ही जागा रद्द करून नंतर संपूर्ण कचऱ्याची प्रक्रिया बायंगिणीत होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Wednesday, 17 June 2009

सांताक्रुझ येथे दिवसाढवळ्या दरोडा
खुल्या दरवाजाचा फायदा उठवला...
सकाळची वेळ...१०.३० वाजता वडील आणि मुलगा पणजी येथे असलेल्या आपल्या दुकानावर निघून गेले. घरात एक लहान मुलगी, तिची आई, सासू आणि मोलकरीण एवढीच मंडळी होती. एवढ्यात चार तरुण फ्लॅटमध्ये घुसले. सासू कपडे धुण्याच्या तयारीत होती. यावेळी त्यांनी सरळ बंदूक काढून तिच्या कानफटीवर लावली आणि सोने आणि पैसे कोठे आहे, अशी विचारणा केली. घरात पैसे आणि सोनेही नाही, असे उत्तर मिळताच दुसऱ्या खोलीत असलेल्या छोट्या मुलीच्या कानफटीवर बंदूक लावण्यात आली. पैसे कोठे आहे हे न सांगितल्यास मुलीला गोळ्या घातल्या जाईल अशी धमकी देण्यात आली. त्याबरोबर तिने पैसे आणि सोने असलेले कपाट त्यांना दाखवले. परंतु, त्या कपाटाची चावी त्यांना मिळाली नसल्याने वृद्ध सासूला मारहाण करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी पडलेल्या एका दुपट्ट्याचा गळफास करून तुला येथेच लटकवले जाईल, अशी धमकी देण्यात आली. त्याबरोबर तिने येथील चावी त्यांना दिली. त्याबरोबर कपाटातील सोने आणि पैसे आपल्या जवळ असलेल्या बॅगेत भरून सर्वांना एका खोलीत नेण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांना खोलीत बंद करून बाहेर कडी घातली गेली. दरवाजाची कडी घालण्याच्या गडबडीत असलेल्या एका दरोडेखोराच्या हातातील बंदुकीची गोळी झाडल्याने ती त्याच्या हाताला लागली. त्याही परिस्थिती ते फ्लॅटमधून निघाले.
---------


फोंडामार्गे दरोडेखोर मडगावला पसार...
दरोडा घातल्यानंतर त्यांनी रस्त्यावर येऊन कालापूर येथून पणजीला जाणारी बस पकडली. पणजी येथे त्यांनी भाड्याची टॅक्सी केली आणि करमळी रेल्वे स्थानक गाठले. परंतु, त्यांना रेल्वे मिळाली नाही. त्यामुळे त्याच टॅक्सीने त्यांनी फोंडा गाठले. येथून ते बसने मडगावला गेले, अशी माहिती मिळाली आहे. तोपर्यंत दोन तास झाले होते. दरम्यान बांबोळी येथे दरोडा पडल्याची माहिती मिळताच पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दरोडेखोर रेल्वेतून पळून जाण्याची शक्यता व्यक्त करून एक पथक करमळी रेल्वे स्थानकावर तर, दुसरे पथक मडगाव रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आले.
-------------





बांबोळीतील दरोड्याचा तीन तासांत उलगडा

कोकण रेल्वे व मडगाव पोलिसांची संयुक्त मोहीम यशस्वी

सर्व चारही आरोपी अटकेत
तेरा लाखांचा ऐवज हस्तगत
सूत्रधारालाही कोठडी


मडगाव, दि. १६(प्रतिनिधी)ः कोकण रेल्वे पोलिस व मडगाव पोलिस यांनी समन्वयाचे उत्तम उदाहरण सादर करताना एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे संयुक्त मोहीम हाती घेताना बांबोळी येथील एका फ्लॅटमधील दरोड्याचा अवघ्या तीन तासात सोक्षमोक्ष लावला. दरोड्यात सहभागी झालेल्या चारही आरोपींना अटक करून चोरीस गेलेला अंदाजे तेरा लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. या दरोड्याचा मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुलेही हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिस महानिरीक्षकांनी या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिस पथकाचे अभिनंदन करून त्यांना दहा हजारांचे इनाम जाहीर केले आहे.
कोकण रेल्वेचे पोलिस अधीक्षक वामन तारी यांनी उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे (कोकण रेल्वे) व गजानन प्रभुदेसाई (पणजी पोलिस स्टेशन) यांच्या समवेत पत्रकारांना या एकंदर कारवाईची माहिती दिली. जुने गोवे पोलिसांनी यासंबंधी पाठवलेला बिनतारी संदेश मिळताच मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस सतर्क झाले. तेथील पोलिस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह साध्या वेशात शोध सुरू केला. यावेळी आर. वेंकट, राजेश राणे व प्रदीप नाईक या साध्या वेशातील रेल्वे पोलिसांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अगदी टोकाला असलेल्या बाकावर दोघे संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करून तिकीट मागितले असता एकाने बॅग उघडून ते बाहेर काढताना आत असलेली छोटी पर्स काखेत दडविण्याचा प्रयत्न केला. त्यात काय आहे असे विचारताच ते गडबडले, आत दागिने असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे पोलिस स्टेशनवर त्यांची चौकशी केली असता त्यांनी बांबोळी येथील दरोड्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या सुरेंद्र रणबीर सिंग व शमीन यांनी आपले अन्य दोन सहकारी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे सांगितले.
रेल्वे पोलिसांनी लगेच मडगाव शहर पोलिसांना सतर्क केले. मडगावात दोघांना ताब्यात घेतल्याचा संदेश मिळताच पणजीहून उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व गुरुप्रसाद म्हापणे, पोलिस उपनिरीक्षक रवी देसाई तसेच एका घरगुती कार्यक्रमासाठी मडगावात असलेले पोलिस निरीक्षक संतोष देसाई व त्यांचे सहकारी रेल्वे स्थानकावर दाखल झाले.
रवी देसाई यांनी आके बाजूच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर तपासणी करताना एके ठिकाणी बोटाला गंभीर इजा झालेल्या व हातात बॅग असलेल्या इसमाला हटकले व त्याची बॅग तपासली असता त्यात देशी बनावटीची दोन पिस्तुले व एक सुरा सापडला. त्याला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिस स्थानकावर आणले असता त्याने आपले नाव बिपीन भानुप्रताप सागर (मूळ मुरादाबाद-दिल्ली) असल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक संतोष देसाई हे चौथ्या आरोपीच्या मागावर होते, यावेळी आपले सहकारी आपणाला सोडून गेले तर नाहीत ना या शंकेने कॉईन बॉक्स फोनवरून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचून त्याला आकेच्या बाजूने असलेल्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे येण्याची सूचना देण्यास सांगितले. नंतर तो कोठून बोलला होता ते शोधून काढून आके येथे पांडव कपेलाजवळील टेलिफोन बूथपाशी त्याला पकडले. त्याचे नाव सुरेंद्र बिपीन पवनकुमार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. या सर्वांना नंतर कोकण रेल्वे पोलिस स्टेशनवर ठेवण्यात आले.
पोलिस अधीक्षक वामन तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे रु.३६,२७० रोख व १२.५६ लाखांचे दागिने सापडले. ते चौघेही चार दिवसांपूर्वी मांडवी एक्सप्रेसने गोव्यात आले होते. या एकंदर कटाचा सूत्रधार शमीन रिझवान सांताक्रूझ येथील एका वर्कशॉपमध्ये कामाला असून त्यानेच त्यांना येथे बोलावून घेतले होते तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. बांबोळी येथील सदर फ्लॅट त्यानेच दाखवला होता, अशी कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. यानंतर शमीन याला जुने गोवे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फ्लॅटमध्ये दरोडा घालून चौघेही प्रवासी बसने मडगावपर्यंत आले व संशय येऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने चालत रेल्वे स्टेशनवर गेले. ते प्रथमच गोव्यात आले होते व केवळ मडगाव रेल्वे स्टेशन व पणजी हा मार्गच त्यांना माहीत होता. सदर आरोपी २० - २५ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधीक्षक तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा जुने गोवे पोलिसांच्या हद्दीत घडलेला आहे व नोंदही तेथे झालेली असल्याने आरोपी तसेच त्यांच्याकडे सापडलेला ऐवज रेल्वे पोलिस त्यांच्या हवाली करणार आहेत. अधीक्षक तारी यांनी आजच्या कारवाईत सहभागी झालेले सहकारी अधिकारी व पोलिसांचे, विशेषतः आपले सहकारी तुषार लोटलीकर यांचे अभिनंदन केले. या आरोपींचा आणखी कोणत्याही प्रकरणात हात आहे की काय याचा तपास आता केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
-------

तीन दिवसापूर्वी दरोडेखोर गोव्यात...
दरोडा टाकण्याचे नक्की झाल्यानंतर या चारही तरुणांना गोव्यात बोलावण्यात आले. यावेळी पणजी येथील गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. तीन दिवसापूर्वी ते गोव्यात आले होते. दोन दिवस पणजीत मजा केल्यानंतर आज सकाळी त्यांनी दरोडा टाकण्याचा मुहूर्त निवडला. फ्लॅटमधील कोणती व्यक्ती कोणत्या वेळी बाहेर निघते याची पूर्ण माहिती त्यांना होती. ही माहिती त्यांना सांताक्रूझ येथे फॅब्रिकेशनचे काम करणारा "रिझवान' याने पुरवली होती. तक्रारदारानेही या रिझवान याच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे गावठी बंदुकाही रिझवान यांनी त्यांना पुरवली होती, अशी माहिती मिळाली आहे. रिझवान मुजफ्फर यांच्या घरी परिचयाची व्यक्ती होती. काही वेळा तो त्यांच्या घरीही आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-------------

पुन्हा मोबाईल उपकारक
मोबाईलने आपला उपयोग गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी होऊ शकतो हे आज पुन्हा दाखवून दिले. पोलिसांना सीरियल किलर महानंदाप्रत पोचवणाऱ्या मोबाईलने पुन्हा एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यास मदत केली. आज बांबोळी येथे एका फ्लॅटवर दरोडा घालून पळून आलेल्या चार दरोडेखोरांपैकी एकाला त्याने आपल्या सहकाऱ्याला मोबाईलवर केलेल्या फोनवरूनच पोलिस जेरबंद करू शकले. सदर व्यक्ती कोणत्या "पे फोन'वरून बोलतो ते दिसून आले व पोलिसांनी लगेच त्या भागात दबा धरला. "पे फोन' मालकाशी संपर्क साधून माहिती घेतली व त्याच्यावर झडप टाकून त्याला पकडले.
गोवा एक्सप्रेसचा विलंब नडला
आज वास्को - निजामुद्दीन या गोवा एक्सप्रेसला विलंब झाला नसता व ती वेळेवर आली असती तर कदाचित हे आरोपी पोलिसांच्या हातीही लागले नसते. वास्तविक या आरोपींची एकंदर कामगिरी नियोजनबद्ध होती कारण त्यांच्यापाशी गोवा एक्सप्रेसची आजची तिकिटेही होती. यावरून ही कामगिरी पार पाडल्यावर मडगाव गाठावयाचे व दुपारी ३.३० ची गोवा एक्सप्रेस पकडून गोवा सोडायचा असा त्यांचा बेत होता. पण गोवा एक्सप्रेसला विलंब झाला, दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी ती मुंगुल जवळ तब्बल २० मिनिटे ताटकळून राहिली व त्यामुळे पोलिसांचे हे ऑपरेशन यशस्वी झाले.
मांडवी कदापि सोडणार नाही
कॅसिनोंची न्यायालयात "दादागिरी'

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - "जिंकू किंवा हरू, मांडवी नदी सोडणार नाही' अशी "दादागिरी' करत नदीच्या कोणत्याही एका किनाऱ्यावर सर्व जहाजे एका ओळीत नांगरून ठेवण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी आज कॅसिनो कंपन्यांनी न्यायालयात केली. कॅसिनोंची ही मागणी सरकार मान्य करून शकत नसल्याने ऍडव्होकेट जनरल यांनी न्यायालयात कळवल्यानंतर येत्या दोन दिवसांत "कॅप्टन ऑफ पोर्ट'सोबत होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय कळवला जाईल, अशी ठोस भूमिका कॅसिनो कंपन्यांनी न्यायालयात घेतली. यामुळे याविषयीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
""आम्ही हा खटला जिंकू किंवा हरू पण मांडवी नदी सोडून समुद्रात जाणार नाही'' असे यावेळी कॅसिनो कंपन्यांच्यावतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. सर्व कॅसिनो जहाजांची बांधणी केवळ नदीत नांगरून ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यामुळे ती जहाजे समुद्रात नांगरण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे या जहाजांना नदीच्या काठावर एका रांगेत राहण्याची परवानगी दिल्यास नदीत अन्य जहाजांच्या वाहतुकीला होणारा त्रासही मिटणार, असा दावा कॅसिनो कंपन्यांनी केला. यामुळे आम्हाला बेती वेरे किंवा पणजी शहराच्या बाजूला नदीच्या तीरावर कॅसिनो जहाजे नांगरण्यासाठी परवानगी दिली जावी, असा युक्तिवाद या कंपन्यांनी केली.
असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेली नाही, असे यावेळी सरकारी वकिलाने सांगितले. त्यावेळी हा प्रस्ताव "कॅप्टन ऑफ पोर्ट'कडे सादर करण्यात आला असून त्यावर येत्या दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे कॅसिनो कंपन्यांनी खंडपीठाला सांगितले. यावेळी काय निर्णय घेतला जातो, त्याची न्यायालयाला माहिती दिली जावी, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
"सेझ'संबंधी व्यवहारात काळेबेरे?
पेनेन्सुलाच्या अर्जामुळे गोंधळ

पणजी,दि.१६ (प्रतिनिधी)ः- विशेष आर्थिक विभाग (सेझ) रद्द करण्याची घोषणा करून दीड वर्ष उलटले तरी अद्याप केंद्राकडून अधिसूचित झालेल्या तीन "सेझ' कंपन्यांची मान्यता रद्द करण्यास टाळाटाळ होण्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय "सेझ' विरोधकांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच गोवा औद्योगिक विकास महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत "पेनेन्सुला फार्मा' या कंपनीतर्फे "सेझ'साठी मिळालेली जमिनीचे अन्य उद्योजकाला हस्तांतर करण्याची मागणी करणारा अर्ज सादर झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, "सेझ' प्रकरणी आधीच गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तावून सुलाखून बाहेर पडलेल्या संचालक मंडळाने हा प्रस्ताव फेटाळून लावला, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
याप्रकरणी उद्योग खात्याचे सचिव व्ही. के. झा यांची भेट घेतली असता त्यांनी केंद्राकडे "सेझ' रद्द करण्याबाबतच्या मागणीचा पाठपुरावा अखंडितपणे सुरू असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडेच केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांना पत्र पाठवले आहे व त्यात राज्य सरकारच्या "सेझ' रद्द करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. "सेझ' मान्यता मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सरकारतर्फे आपली शिफारस केली आहे पण गोव्याने "सेझ' रद्द करण्यासंबंधी पाठवलेल्या प्रस्तावाचा विषय बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर येत नसल्याने त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे ते म्हणाले. अलीकडेच "सेझ' मान्यता मंडळाकडून "डीएलएफ'च्या मागणीनुसार त्या कंपनीचे तीन "सेझ' रद्द करण्यात आले. पण येथे खुद्द राज्य सरकार मागणी करत असतानाही त्याची दखल कशी काय घेतली जात नाही, असा प्रश्न केला असता याबाबत वक्तव्य करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे म्हणून श्री.झा यांनी मौन धारण केले.
दरम्यान, गोवा सरकारला "सेझ' प्रवर्तकांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढण्याचा सल्लाही केंद्र सरकारने दिला होता व त्याबाबत चर्चाही झाली होती. या "सेझ' प्रवर्तकांना त्यांचा प्रस्ताव पाठवण्याची मोकळीक केंद्र सरकारने दिली होती पण त्यांनी तो प्रस्ताव सादर केलाच नाही, असेही ते म्हणाले. "सेझ'च्या बदल्यात इतरत्र भूखंड देण्याचा प्रस्ताव काही "सेझ' कंपन्यांनी दिल्याचे वक्तव्य यापूर्वी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केले होते, त्याबाबत विचारले असता झा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या दोन आठवड्यापूर्वी पेनेन्सुला कंपनीतर्फे "सेझ'साठी दिलेली जमीन अन्य उद्योजकाला हस्तांतरित करण्याची परवानगी गोवा औद्योगिक विकास महामंडळाला केली होती. हा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळून लावला,अशी माहिती यावेळी झा यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाने "सेझ' रद्द करण्याच्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे हे पटवून देण्यासाठी "सेझ' धोरण मागे घेण्याची घोषणा काल केली खरी पण मुळात अधिसूचित झालेल्या तीन "सेझ'बाबत मात्र काहीही बोलण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नकार दिला होता. मुळात ही दिरंगाई का होते आहे, याबाबत कोणीही बोलत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. "सेझ' च्या निमित्ताने कमी किमतीत मिळालेले लाखो चौरस मीटरचे भूखंड सोडण्यास या "सेझ' कंपन्यांनी नकार दर्शवला आहे. या जागा आता बाहेरच्या बाहेर विकून अव्वाच्या सव्वा पैसा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न असून पेनेन्सुला कंपनीकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव ही त्याचे संकेत देत असल्याची प्रतिक्रिया "सेझ' विरोधकांनी व्यक्त केली आहे. सरकारकडून या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव जाणवत असल्याची टीका करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचेही यावेळी सेझ विरोधी आंदोलकांनी कळवले आहे.
ख्रिस्ती समाजाला भाजपचा पर्याय खुला
चर्चसंस्था वक्तव्याशी ठाम

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - ख्रिस्ती समाज हा कदापि भाजपबरोबर जाणार नाही, अशी फुशारकी मारून या समाजाचा केवळ वोटबॅंक म्हणून आत्तापर्यंत वापर करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला यंदा लोकसभा निवडणुकीत चांगलीच चपराक मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यात दोन्ही ठिकाणी झालेल्या मतदानात यावेळी ख्रिस्ती समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने कॉंग्रेसची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर , गोव्यातील ख्रिस्ती समाजाला भाजपशी काहीही वैर नाही,असे यापूर्वी चर्चसंस्थेच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याशी चर्च ठाम असल्याचे सांगून या वक्तव्याचा काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढून चर्चसंस्थेवर विनाकारण टीका केल्याचेही चर्चने केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना भाजपला मतदान करण्याची पूर्ण मोकळीक आहे, असे वक्तव्य लोकसभा निवडणुकीवेळी रोमन चर्चकडून करण्यात आले होते. या वक्तव्यामुळे तथाकथित निधर्मवादी राजकीय पक्षांचे पित्त खवळल्याने त्यांनी या वक्तव्याबाबत अपप्रचार सुरू केला व त्यामुळे काही स्थानिक प्रसारमाध्यमांतून चर्चसंस्थेवरच आगपाखड करण्यात आली. याप्रकरणी गोवा व दमण आर्चबिशप कार्यालयातून खुलासा करण्यात आला आहे. ख्रिस्ती बांधवांना भाजपला मतदान करण्याची पूर्ण मोकळीक आहे, या वक्तव्याशी चर्च अजूनही ठाम आहे,असे स्पष्ट प्रत्युत्तर टीकाकारांना देण्यात आले आहे.
काही लोकांनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला व त्यामुळेच या वक्तव्यावरून गोंधळ निर्माण झाल्याचे या पत्रकांत म्हटले आहे. मुळात केवळ सत्य परिस्थितीची जाणीव होण्यासाठीच हे वक्तव्य करण्यात आले होते. या वक्तव्यात चर्चसंस्थेचे धोरण वगैरे जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असेही स्पष्टीकरण यावेळी करण्यात आले. चर्चसंस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही, ख्रिस्ती बांधवांना गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी वापरा आणि मतदान करा,असा सल्ला देण्यात आला होता व त्याप्रमाणे त्यांनी मतदान केले,असेही यावेळी सांगण्यात आले. यापूर्वीही ख्रिस्ती समाज बांधवांनी भाजपला मतदान केले होते व त्यामुळेच भाजप सत्तेवरही आला होता, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. केवळ काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला व चर्चसंस्थेकडून ख्रिस्ती लोकांची दिशाभूल केल्याचा खोटा आरोपही करण्यात आला. राष्ट्रीय एकता व धार्मिक सलोखा मानणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे चर्चसंस्थेचे काहीही वैर नाही, असेही यावेळी सांगण्यात आले होते. कंदहार येथे ख्रिस्ती आदिवासींवर झालेल्या हल्ल्याबाबत गोव्यातील चर्चसंस्थेकडून मोठीशी दखल घेतली गेली नसल्याचा खोटा अपप्रचारही काही स्थानिक प्रसारमाध्यमांतून करण्यात आला. हा आरोप पूर्णपणे निरर्थक आहे. गोव्यातील चर्चसंस्थेने या आदिवासींना मदत पाठवलीच, वरून या लोकांवर झालेल्या अत्याचाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ९० हजार लोकांच्या सह्याही जमवल्या,असेही यावेळी सांगण्यात आले.
पैसे घेतले, आता कसला विरोध ?
नारायण राणेंचा कळणेवासीयांना सवाल
खाणप्रश्न विधानसभेत
सरपंच, उपसरपंचांचे प्रतिआव्हान

सावंतवाडी, दि. १६ (प्रतिनिधी) - कळणे सरपंच व उपसरपंच यांनी मायनिंगसाठी आपली जमीन विकून १६ लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे त्यांना खाणविरोधात बोलण्याचा अधिकार नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेत सांगितले. या प्रकरणी कळणे सरपंच सुनिता भिसे व उपसरपंच संपदा देसाई यांनी आम्ही एकही पैसा घेतलेला नाही. आमच्या सह्या असलेले खरेदीपत्र दाखवण्याची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवावी असे प्रतिआव्हान दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिज उत्खननास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. पण तिरोडा (ता. सावंतवाडी) येथे खनिज उत्खननास परवानगी दिलेली नसल्याची माहिती खनिज विभागाचे राज्यमंत्री नाना पंचभुते यांनी शिवसेना आमदार शिवराम दळवी यांनी विधानसभेत दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले. मात्र कळणे येथील खाणविरोधी आंदोलनात कळणेवासीयांवर प्रशासन, पोलिस व खाण कंपनी खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा सभागृहात आमदार दळवी यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर पालकमंत्री राणे यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
आमदार दळवी यांनी, दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खाण उत्खननास स्थानिक जनतेचा विरोध आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात खाण प्रकल्प असल्यास तेथील शेती, बागायती, पाणीसाठे, निसर्ग साधनसंपत्तीचा दूरगामी परिणाम होणार असून कळण्यासोबतच तिरोडा येथे बागायत व वनसंपत्ती, पर्यावरण नष्ट होणार आहे. जनतेने जनसुनावणीत विरोध करूनही मायनिंग प्रकल्प सुरू केले जात असल्याबद्दलची लक्ष्यवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. यामध्ये कळणेवासींयावर खुनाचे गुन्हे दाखल केल्याचे नमूद केले होते.
आज ही सूचना सभागृहासमोर आल्यानंतर राज्यमंत्री पंचभुते यांनी आमदार दळवी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात खनिज सवलती अद्याप मंजूर न झालेल्या क्षेत्रासंदर्भातील अधिसूचना रद्द करून यापुढे पर्यटन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतेही क्षेत्र अधिसूचित न करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कळणे मायनिंग विरोधी आंदोलनाच्या प्रश्नांवर पालकमंत्री राणे सांगितले की, कळणे सरपंच व उपसरपंचांना मायनिंग विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी विकलेल्या जमिनीचे १६ लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत. तसेच पोलिस व प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, 16 June 2009


लखलखती सौदामिनी... रविवारी मध्यरात्री गोव्याला पावसाने झोडपून काढले. त्यावेळी मधूनच विजेचे लोळ अशा प्रकारे उठून आसमंत उजळून निघत होते. (छाया : दत्ताराम)

कोपरपंत समाजाकडून स्वागत

विशेष आर्थिक विभाग धोरण रद्द
पाणी थकबाकीदारांसाठी एकरकमी योजना
दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी वस्त्रभेट योजना
कर थकबाकीसाठी विशेष योजना


मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कोमरपंत समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केल्याबद्दल या समाजातर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. गेली कित्येक वर्षे हा विषय रेंगाळत पडला होता. आत्तापर्यंत अविकसित राहिलेल्या या समाजाला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळणार आहे. समाजाने त्याचा लाभ घेऊन आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी सोयरू कोमरपंत यांनी केली.

कोमरपंत व ख्रिस्ती रेंदेर आता इतर मागासवर्गीयांत
पणजी,दि.१५ (प्रतिनिधी): केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीची दखल घेऊन राज्य सरकारने कोमरपंत व ख्रिस्ती रेंदेर समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची आज घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विशेष आर्थिक विभाग (सेझ) धोरण रद्द करणे, पाणी बिल थकबाकीदारांसाठी एकरकमी योजना, दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी वस्त्रभेट योजना सुरू करण्याच्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
आज मॅकनिझ पॅलेस येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. यावेळी गृहमंत्री रवी नाईक व हंगामी मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव हजर होते. मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशींची दखल राज्य सरकारने घेतली आहे. कोमरपंत व ख्रिस्ती रेंदेर समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयांत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने संमत केला. दरम्यान, धनगर समाजाचाही या वर्गात समावेश होण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत राज्यातील धनगर समाजाचे सर्वेक्षण करून तो अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला असून त्याचा अभ्यास सुरू असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्य सरकारने २००६ साली अधिसूचित केलेले विशेष आर्थिक धोरण रद्द करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळाने घेतला. हे धोरण मागे घेतले याचा अर्थ सेझ रद्द झाला असा होत नाही व तो निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला घ्यावयाचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वीज थकबाकीदारांप्रमाणे आता पाणी बिल थकबाकीदारांसाठीही एकरकमी योजना तयार करण्यात आली आहे. किमान २० हजार रुपये थकबाकी असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळेल व ही योजना ३० सप्टेंबर २००९ पर्यंत लागू असेल, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा आचारसंहितेमुळे अडकलेली कर थकबाकी योजनाही सुरू केली जाईल, असेही ते म्हणाले.
महिला व बालकल्याण खात्यातर्फे राज्यातील दारिद्र्‌यरेषेखालील लोकांसाठी खास वस्त्रभेट योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना साड्या व इतर कपडे भेट देण्यात येणार आहेत. ही योजना गट विकास कार्यालयामार्फत राबवण्यात येईल, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
--------------------------------------------------------------------
रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींची घोर निराशा
रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना सेवेत नियमित करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार अशी अपेक्षा होती पण हा विषय चर्चेसाठी आलाच नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याने या प्रशिक्षणार्थींची घोर निराशा झाली. आता यापुढे संयम ठेवणे शक्य नाही, त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आता उच्च न्यायालयातच होऊ द्या, असा निर्धार या प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी नव्याने सुरू करण्याची तयारी आता पिडीत व राजकीय बळी ठरलेल्या कर्मचाऱ्यांनी चालवली आहे.

कचरा विल्हेवाटीसाठी धारगळ व धारबांदोडा?

सभागृह समितीचा लवकरच अहवाल
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या सभागृह समितीच्या बैठकींना आपण हजर राहत होतो, बाकी कोणीही येत नव्हते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज केला. सभागृह समितीने उत्तरेत धारगळ व दक्षिणेत धारबांदोडा येथे जागेची पाहणी केली असून लवकरच समितीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. सभागृह समितीने जागा शोधण्याचे काम केले तरी स्थानिक लोकांचा विरोध होत असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे खुद्द मुख्यमंत्री कामत यांनी मान्य केले. यापूर्वी आपण नगरविकासमंत्री असताना सभागृह समितीने कोलवाळ व बेंदुर्ले येथे जागेची पाहणी केली होती. पण, त्यालाही विरोध झाल्याने त्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या. आता धारगळ व धारबांदोडा येथील जागेलाही विरोध होईल, त्यामुळे जोपर्यंत खरोखरच प्रामाणिकपणे हा विषय हाताळला जाणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नगरविकासमंत्र्यांची आज बैठक
पणजीतील कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या दि. १६ रोजी नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी पर्वरी येथे आपल्या दालनात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात, महापालिका आयुक्त मेल्विन वाझ, महापौर कॅरोलिना पो आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत या विषयावर गरमागरम चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. मनोहर पर्रीकर यांनी महापालिका आयुक्त मेल्विन वाझ यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. महापालिकेत विरोधी गटाला कोणत्याही प्रकारे प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत पालिका सचिवांचे आदेश असूनही त्याची पूर्तता आयुक्तांकडून केली जात नसल्याने याचा जाबही या बैठकीत ते विचारणार आहेत.
दरम्यान, राजधानीत निर्माण झालेल्या कचरा समस्येबाबत आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मुख्य सचिव हौजूल हौकुम, शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात, पालिका संचालक दौलत हवालदार आदींशी चर्चा केली. महापालिकेने आजपासून कचरा उचलण्यास आरंभ केल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी यावेळी दिली. महापौर कॅरोलिना पो यांनी मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही, चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिली आहे.

आमिषे दाखवून धर्मांतर अयोग्यच

आर्चबिशपच्या प्रवक्त्याचा खुलासा
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : विविध प्रकारची आमिषे दाखवून करण्यात येणारे धर्मांतर योग्य नाही. राज्यात बिलिव्हर्सतर्फे होत असलेल्या धर्मांतराच्या या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका गोव्यातील चर्चने घेतली आहे. व्हॅटीकन चर्च अशा प्रकारच्या धर्मांतराच्या विरोधात असल्याचा दावा यावेळी आर्चबिशपचे प्रवक्ते फा. फ्रान्सिस्को कालदेरा यांनी केला आहे.
पैशांच्या आमिषांना बळी पडून धर्म बदलणारे हे स्वधर्मातही राहत नाही आणि त्यांनी नंतर स्वीकारलेल्या धर्मांतही त्यांना मानाचे स्थान मिळत नाही, असे फा. कालदेरा यांनी सांगितले. गोव्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या गरीब व गरजू लोकांचा फायदा उठवत बिलिव्हर्स पंथाने त्यांना आमिषे दाखवून धर्मांतर करण्याचे सत्र सुरू केल्याचे प्रकरण गोवादूतने उजेडात आणले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता फा. कालदेरा यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
या बिलिव्हर्स पंथीयांवर आमचा कोणताही अधिकार नाही आणि आम्ही त्यांचा या कृतीचा स्वीकारही आम्ही करत नाही. येशू ख्रिस्ताला पुजण्यासाठी आणि त्याची तत्त्वे जपण्यासाठी धर्म बदलावा लागतो, असेही आम्हांला वाटत नाही, असे फा. कालदेरा म्हणाले. सन १९६० मध्ये रोममध्ये झालेल्या एका सभेत धर्म प्रमुखाने कोणाचेही धर्मांतर करू नये, असे स्पष्ट केले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हिंदू धर्मात खूप चांगली तत्त्वे आहेत, व्हॅटीकन चर्चमध्ये त्याची नेहमी प्रशंसाच केली जात असल्याचे ते म्हणाले.
धर्मांतराचा हा प्रकार येणाऱ्या काळात डोकेदुखी बनणार असून आमच्याकडे नेमकी तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचे "स्पेशल सेल'चे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
राजधानीपासून काही अंतरावर असलेल्या चिंबल आणि मेरशी परिसरात मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर करण्यात आल्याचे गोवादूतने उघड केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. "सेवा ट्रस्ट ऑफ इंडिया' या बिगर सरकारी संस्थेतर्फे गरिबांना मदत करत असल्याचे भासवण्यात येत असले तरी ही संस्था गोव्यात धर्मांतराच्या कार्यात गुंतल्याचे उघड झाले आहे. राज्यात शंभर पेक्षा जास्त बिलिव्हर्सची प्रार्थनास्थळे चालत असल्याचा दावा या ट्रस्टने केला असून ६० पेक्षा जास्त लहान मुलांचा सांभाळ करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या मुलांना त्यांच्या आई वडिलांची भेट घेण्यास मिळत नसून केवळ रविवारच्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आपल्या मुलांना पाहण्याची मुभा मिळते. या सर्व मुलांना पणजीतील एका हॉटेलमध्ये प्रार्थनेसाठी बसमधून आणले जाते, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

कुठ्ठाळी येथे अपघातात दुचाकीस्वारासह दोघे ठार

दोघांची प्रकृती गंभीर
वास्को, दि. १५ (प्रतिनिधी): बेफाम वेगाने मडगावहून पणजीच्या दिशेने जात असलेल्या "सुमो'गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पंचवाडी, शिरोडा येथील २४ वर्षीय कल्पेश गावडे हा मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला तर दुसऱ्या पादचाऱ्याचे इस्पितळात निधन झाले. अपघातात सापडलेले इतर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
आज सकाळी ७.४५ च्या सुमारास मडगावहून पणजीला जात असलेली जीए ०६ ए २५३६ क्रमांकाची सुमो जीप कुठ्ठाळी उतारावरील आर. के. मार्बलजवळ पोचली असता चालक रोहिदास गावकर (वय २४, रा. बिर्ला, झुआरीनगर) याचा गाडीवरून ताबा सुटला. यावेळी समोरच्या बाजूने येणाऱ्या जीए ०५ सी ५६०२ या पॅशन मोटारसायकलला गाडीची जबर धडक बसली. तसेच बसची वाट पाहत उभ्या राहिलेल्या इतर तीन प्रवाशांना गाडीने धडक दिली. यानंतर त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. सदर अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार कल्पेश गावडे याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती १०८ रुग्णवाहिकेला मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन जखमींना बांबोळीच्या गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले.
कुठ्ठाळी येथील सुनील नाईक (वय ३३) याचे इस्पितळात उपचार घेत असताना दुपारी निधन झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. रजनकुमार मलिक (वय २२, रा. कुठ्ठाळी) या मूळ ओरिसामधील तरुणाची प्रकृती सुधारत असून अन्य एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.
वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून सुमोचालक चालक रोहिदास गावकर याला अटक करण्यात आली आहे.
अपघातात सापडलेल्या मोटरसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून सुमो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघातात मरण पावलेला कल्पेश आयएफबी आस्थापनांत साहाय्यक हिशेबनीस म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. मयत कल्पेश याचा मृतदेह त्याच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आला असून सुनील याचा मृतदेह बांबोळीच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करत आहेत.

संपकरी गोमेकॉ कामगारांकडे कोणी फिरकलेच नाही

पणजी,दि.१५ (प्रतिनिधी): "विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे पाषाणहृदयी आहे व या सरकारला राज्यातील "आम आदमी' ची अजिबात चिंता नाही', असा सनसनाटी आरोप गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांनी केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे कामगार संपावर आहेत, पण त्यांची भेट घेण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी एकही सरकारी अधिकारी अथवा मंत्री येथे फिरकलेला नाही. यावरून या सरकारला "आम आदमी' चा किती पुळका आहे हे उघड झाले, अशी टीका कामगार संघटनेच्या नेत्या अनिषा नाईक यांनी केली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेली नऊ वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे २०७ चतुर्थश्रेणी सफाई कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन विद्यमान सरकारने दिले होते. गेली दोन वर्षे या कामगारांना या आश्वासनावर झुलवत ठेवून आता आपल्या मर्जीतील नव्या लोकांची भरती करण्याचे सत्र सुरू झाले आहे. सध्या सेवेत असलेल्या कामगारांच्या पोटावर लाथ मारून नव्या लोकांचा भरणा करण्याची ही कृती निषेधार्ह असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सत्तरी भागातील सुमारे ५८ नव्या कामगारांना थेट नेमणूकपत्रे देण्यात आली आहेत, ते कामावर रुजू झाले आहेत. मुळात येथे सेवेत असलेल्या कामगारांना नियमित करण्यापूर्वी या नव्या कामगारांची भरती केल्याने सफाई कामगार गेल्या सहा दिवसांपासून संपावर गेले आहेत.
"या कामगारांनी अद्याप आपल्या संपाचा परिणाम कामावर होऊ दिलेला नाही. पण परिस्थिती अशीच राहिल्यास कामावर बहिष्कार घालणे भाग पडेल', असा इशारा अनिषा नाईक यांनी दिला. मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारने अलीकडेच दोन वर्षे पूर्ण केली. या निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री कामत यांनी आपण राज्यातील सामान्य लोकांच्या हृदयाशी भिडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री कामत हे देवभक्त आहेत व देवभक्त व्यक्ती ही संवेदनशील असते, अशी आत्तापर्यंतची धारणा आहे. परंतु, राज्यात विविध पातळीवरील सामान्य कामगारांचा विचार करताना मुख्यमंत्र्यांचे संवेदनशील हृदय अजूनही कसे हेलावत नाही, असा खडा सवाल या कामगारांनी केला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांकडूनच कोडकौतुक केले जाते, त्याच आरोग्यमंत्र्यांकडून या कामगारांच्या पोटावर लाथ मारली जात आहे. याचेही कौतुक संबंधित नेतेमंडळी करणार आहेत काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कामत आपल्या सहकारी मंत्र्यांचे लाड पुरवत असतील, तर ते घोडचूक करत आहेत, अशी टीका या कामगारांनी केली आहे. मुख्यमंत्री जर खरोखरच परमेश्वराला मानतात व त्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे तर त्यांनी सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, त्यांच्या खुर्चीला अजिबात धोका संभवणार नाही, असा विश्वास या कामगारांनी व्यक्त केला आहे.

Monday, 15 June 2009

गोव्याला संतोष करंडक

कडवी झुंज दिल्यानंतर पेनल्टीवर ४-२ ने विजय
चेन्नई, दि. १४ : येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर झालेल्या ६३ व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत गोव्याने बंगालविरुध्द प्रतिकूल इतिहास असतानाही गोलरक्षक व कर्णधार फेलिक्स डिसोझा याच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळविला. बंगालचा संघ आत्तापर्यंत २९ वेळा संतोष करंडकाचा मानकरी ठरला होता. गोवा व बंगालचा संघ यापूर्वी यापूर्वी सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यातील पाच सामन्यांत बंगालने गोव्यावर बाजी मारली तर एकवेळेस गोव्याला संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गोव्याने उपांत्य फेरीत बलाढ्य तामिळनाडू संघाला नमवित अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सामन्याच्या सुरुवातीपासून गोवा व बंगाल या दोन्ही संघाने एकमेकांवर जोरदार चढाया करत गोल नोंदविण्याचे जोरदार प्रयत्न केले. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला गोव्याला फ्री किक मिळाली होती परंतु, फुल्गान्को कार्दोझो याला चेंडूला हेडरद्वारे योग्य दिशा न देता आल्याने गोव्याची आघाडी घेण्याची संधी हुकली. लगेच तीनच मिनिटांनी ज्योकिम अब्रांचिस याने बंगालच्या क्षेत्रात जोरदार आक्रमण केले. बंगालच्या अझिम याने अब्रांचिसचा प्रयत्न विफल ठरवत बंगालसमोरील संभाव्य धोका टाळला. यानंतर गोव्याने १२ व्या मिनिटाला गोल नोंदविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर बंगालने गोव्याच्या गोलक्षेत्रात अनेक चढाया केल्या परंतु, चपळ, दक्ष असलेल्या फेलिक्स डिसोझा याने बंगालच्या सर्व चढाया विफल ठरविल्या. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त वेळेचा अवलंब करावा लागला अतिरिक्त वेळेतही ही कोंडी न सुटल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये गोव्यातर्फे क्लायमॅक्स लॉरेन्स, बिव्हन डिमेलो, जॉन डॉयस व फुल्गान्सियो कार्दोझो यांनी गोलजाळीचा वेळ घेतला तर निकोलस रॉड्रिगिजचा फटका बंगालचा गोलरक्षक स्नेहाशिष याने झेपावत अडविला. बंगालतर्फे स्नेहाशिष चक्रवर्ती व लालवमुपिया यांनी गोल नोंदविले तर साफर सरकार, लालकमल भौमिक यांचे जोरदार फटके फेलिक्सने अडविले.
-----------------------------------------------------------------
शंखवाळकर यांच्या विक्रमाशी फेलिक्स डिसोझाची बरोबरी
चेन्नई येथील याच जवाहरलाल नेहरु मैदानावर १९८३ -१९८४ साली गोव्याचा माजी फुटबॉल खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेता ब्रह्मानंद शंखवाळकर याने संपूर्ण संतोष करंडक स्पर्धेत एकही मैदानी गोल न स्वीकारण्याचा विक्रम केला होता. आज गोव्याचा कर्णधार फेलिक्स डिसोझा याने संपूर्ण स्पर्धेसह बंगालविरुध्दच्या अंतिम सामन्यातही प्रतिस्पर्धी खेळाडूंना एकही मैदानी गोल न नोंदवू देता ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
अभिनंदनाचा वर्षाव
गोव्याने मिळविलेल्या या यशाबद्दल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. गोव्याच्या खेळाडूंनी मोठ्या चिकाटीने झुंज देत सामना अनिर्णित ठेवला आणि अखेर पेनल्टीवर विजय खेचून आणला, ही राज्याला अभिमानास्पद बाब आहे. सर्वच खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या आजच्या विजयाने फुटबॉल खेळाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. फुटबॉल हा गोव्याचा मूळ खेळ असून अनेकवेळा गोव्याने या खेळात चमक दाखविली होती, तथापि मध्यंतरी आलेली मरगळ आता झटकली गेली असून या विजयाने नवी दिशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही.एम.प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, क्रीडा मंत्री बाबू आजगावकर व आमदार दयानंद नार्वेकर यांनी गोवा संघाचे अभिनंदन केले असून, हा विजय राज्यातील फुटबॉल खेळाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
-----------------------------------------------------------------------
गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे प्रत्येक खेळाडू तसेच संघातील इतर पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख
स्पोर्टिंग क्लब दी गोवाचे मालक पीटर वाझ यांच्यातर्फे संपूर्ण संघाला १ लाख रुपये.
नगर नियोजन मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्यातर्फे संघाला १ लाख रुपये

नागालॅंडच्या तरुणाची पणजीत निर्घृण हत्या

हॉटेलातील साथीदारानेच केले २२ वार
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) : पणजी येथील हॉटेल फिदाल्गोच्या समोर काल रात्री १२ च्या सुमारास एकाची धारदार चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर संशयित आरोपी विक्रम इंद्रबहादूर साबा (२०) हा फरार असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. मयत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव तुशी मंग्बू जमीर (२६) असे असून तो नागालॅंड येथे राहणारा आहे. तुशी याच्यावर धारदार हत्याराने तब्बल २२ वार करण्यात आले असून त्यातील ९ वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे डॉक्टरांनी शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे.
विक्रम हा मयत व्यक्तीबरोबर पणजीतील एका नामवंत रेस्टॉरंटमध्ये नोकरीला होता. विक्रम या स्वयंपाक्यानेच हा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून काल रात्रीपासून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपी नेपाळ येथे राहणारा असून त्याच्या शोधासाठी नेपाळ येथे पोलिसांचे एक पथक रवाना होणार असल्याची माहिती निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त यांनी आज दिली.
प्राप्त माहिती नुसार तुशी हा सह स्वयंपाकी म्हणून या रेस्टॉरंट नोकरीला होता तर, त्याचठिकाणी विक्रम हा स्वयंपाकी म्हणून नोकरी करीत होता. दोन दिवसापूर्वी विक्रम आणि तुशी यांच्यात एका शुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यांचे हे भांडण त्याचवेळी हॉटेलमालकाने सोडवले होते. परंतु, त्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना विक्रम याने तुशी याला जिवंत मारण्याची धमकी दिली होती. तुशी व अन्य कामगारांची राहण्याची सोय जुन्ता हाउस येथे असलेल्या क्रिस्टल अपार्टमेंट मध्ये करण्यात आली होती. तर, विक्रम हा सान्तिनेज येथे राहत होता. कालच विक्रम याने आपण नोकरी सोडत असल्याचे मालकाला कळवले होते आणि त्याच रात्री विक्रम याने तुशी याचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले. कामावरून परतलेला तुशी खोलीत जाण्यासाठी पायऱ्या चढताना त्याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या विक्रम याने त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. यावेळी त्याच्या डोक्यावर, गालावर, मानेवर, कपाळावर, गळ्यावर तसेच पोटावर सपासप वार करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर तुशी तसाच हॉटेल फिदाल्गोच्या दिशेने पळत सुटला, यावेळी त्याच्या मागे एक तरुण पळत होता, हे एकाने पाहिले होते. गंभीर जखमा झालेला तुशी रस्त्याच्या बाजूला कोसळला. पोलिसांना माहिती मिळताच त्याठिकाणी पोलिस व १०८ रुग्णवाहिका पोचली. यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो मृत झाल्याने घोषित करण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिला. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त करीत आहे.

'पोर्तुगीज आश्चर्यां'मध्ये गोव्याचे चर्च कसे?

स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा तीव्र आक्षेप
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): पोर्तुगीज सात आश्चर्यांमध्ये गोव्यातील बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च आणि दीव येथील किल्ल्याचा समावेश करण्यास गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना मूळ पोर्तुगीज म्हणवण्याचा पोर्तुगालला काहीच अधिकार नसल्याचे स्पष्ट मत स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली यांनी व्यक्त केले आहे.
बासिलिका चर्च उभारण्यासाठी वापरण्यात आलेले चिरे, लाकडे आदी साहित्य मूळ गोव्यातील असून, त्यामुळे या वास्तू पोर्तुगीज आहेत असे म्हणण्याचा प्रश्नच येत नसल्याचे करमली यांनी सांगितले. या वास्तू उभारण्यासाठी ज्या भारतीय कामगारांचा वापर करण्यात आला ते पोर्तुगीज सत्तेचे कैदी होते आणि त्यांच्यावर जबरदस्ती करून अगदी मरेस्तोवर त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले होते, असेही करमली यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारने हा मुद्दा केंद्र सरकारशी चर्चा करून उचलून धरावा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक संघटनेने केली आहे.
जुन्या गोव्यातील "बासिलिका ऑफ बॉम जिझस 'आणि दीवमधील किल्ला यांचा समावेश पोर्तुगीज संस्कृतीचे साक्षीदार असलेल्या ७ आश्चर्यांमध्ये करण्यात आलेला आहे. "बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' हे जुन्या गोव्यातील चर्च १६९५ मध्ये उभारण्यात आले आहे. भारतातील ख्रिश्चन धर्माच्या उदयाचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे.
दीव येथील किल्ला हा सम्राट हुमायूनच्या कालखंडातील आहे. गुजरातचा सुलतान बहादूरशहा जफर याच्यावर हुमायूनने हल्ला केला तेव्हा पोर्तुगिजांना सामील होत दीवमध्ये किल्ला उभारून गॅरिसनच्या आधिपत्याखाली त्याने तिथे आश्रय घेतला, असे इतिहास सांगतो. या सात पोर्तुगीज आश्चर्यांसाठी इंटरनेट आणि टेलिफोनद्वारे मतदान घेण्यात आले. २ लाख ३९ हजार ४१८ जणांनी मत नोंदवले. १० जून रोजी या सात आश्चर्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. या यादीत वरील दोन ठिकाणांशिवाय माझगावचा किल्ला(मोरोक्को), ओल्ड टेंपल टाऊन ऑफ सॅंटिगो (केप वदेर्) चर्च ऑफ सेंट पॉल (मकाऊ), कॉन्व्हेंट ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी(ब्राझील) आणि कॉन्व्हेंट ऑफ सेंट फ्रान्सिस (ब्राझील) या स्थळांचा समावेश आहे.