दामू नाईक यांच्या मागणीनंतर शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- गोवा मुक्तिदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ होताना तरी यापुढे या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिवसाचा अवमान शैक्षणिक संस्थांकडून होणार नाही याची काळजी शिक्षण खात्याने घेतली पाहिजे, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी एका खासगी ठरावाद्वारे केली. १९ डिसेंबर या दिवशी राज्यातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेतर्फे हा दिवस साजरा केला जावा व या दिवशी गोमंतकीय कला, संस्कृती व परंपरा यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
शुक्रवारी खासगी कामकाजाच्या दिवशी दामोदर नाईक यांनी हा पहिला खासगी ठराव सभागृहासमोर सादर केला. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्था ऐतिहासिक दिनांचा अवमान करीत आहेत. राज्यातील अनेक केंद्रीय विद्यालयांकडून हा दिवस साजरा केला जात नाही तर काही संस्था सुट्टी जाहीर करणेच पसंत करतात. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व १९ डिसेंबर यासारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिवसांच्या सुट्टीचा गैरवापर केला जातो व नाममात्र तिरंगा फडकावून घरी राहणेच अनेकजण पसंत करतात, अशी खंत दामू नाईक यांनी व्यक्त केली. आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व आमदार रमेश तवडकर यांनीही या ठरावावर आपल्या भावना व्यक्त करून किमान यापुढे तरी हे प्रकार बंद व्हावेत, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासंबंधी सरकारतर्फे विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समितीच पुढील कार्यक्रमांची आखणी करणार असून या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचीही आखणी करणार आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या दिवसांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. त्यासंबंधीचे स्पष्ट निर्देश शैक्षणिक संस्थांना दिले जातील, असे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले व अखेर दामू नाईक यांनी आपला हा ठराव मागे घेतला.
Saturday, 31 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment