Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 July 2010

ड्रगविरोधी मोर्चाला परवानगी नाकारली

पोलिस म्हणतात हा राजकीय विषय
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)- पोलिस ड्रग्स माफिया प्रकरणी पणजी शहरातून काढण्यात येणारी विद्यार्थ्यांची नियोजित रॅली आज पोलिसांनी चक्क "राजकीय विषय' असल्याचे कारण देऊन रोखली. तसेच, रॅलीला जमलेले विद्यार्थी परत जाईपर्यंत पाच विद्यार्थ्यांना पोलिस स्थानकात बसवून ठेवल्याची माहिती या रॅलीचे आयोजक तथा "एनएसयुआय'चे ऍड. सुनील शेट्ये यांनी दिली.
विधानसभा सुरू असल्याने सर्व ठिकाणी १४४ कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला रॅली काढता येणारा नाही, असा दावा यावेळी करण्यात आला. परंतु, विद्यार्थ्यांनी आज रॅली काढणार असल्याची लेखी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. तसेच, वाहतूक पोलिसांनाही कळवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी रॅलीला विरोध का केला नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
ड्रग्स विरोधातील प्रत्येक घटना राजकीय दृष्टिकोनातून पाहिली जात असून आपली कात वाचवण्यासाठी कारवाई करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप ऍड. शेट्ये यांनी केला. सध्या पोलिस ड्रग्स माफिया प्रकरण राज्यात बरेच गाजत असून या प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांच्या व ड्रग्स माफियांच्या विरोधात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात भाग घेण्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर पणजी शहरातील शेकडो विद्यार्थी जमले होते.
आझाद मैदानावरून विद्यार्थ्यांची रॅली बाहेर पडणार एवढ्यात पोलिसांनी या रॅलीच्या आयोजकांना पोलिस स्थानकावर बोलावून घेतले व तेथेच बसवून ठेवले, असे ऍड. शेट्ये यांनी सांगितले. "सर्वत्र १४४ कलम लावले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला रॅली काढायला परवानगी देऊ शकत नाही. आम्हाला आमची कात वाचवायची आहे', असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याचे ऍड. शेट्ये म्हणाले.
विधानसभा पर्वरी भागात येते. त्यामुळे मांडवी पुलापर्यंत हे १४४ कलम लावण्यात आले आहे. तरीही पोलिसांनी पणजी शहरात काढण्यात येणारी रॅली का रोखली, असा सवाल करून पोलिस ड्रग्स विरोधात केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विरोध करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका "एनएसयुआय'चे राष्ट्रीय प्रतिनिधी गौतम भगत यांनी केली आहे. सह्यांची मोहीम रोखण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी सुनील कवठणकर याला गुन्हा अन्वेषण विभागाने पोलिस चौकशीसाठी बोलावले. आता रॅली काढण्यासाठी विरोध केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्स व पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

No comments: