Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 26 July 2010

जेम्सच्या अज्ञानाचा असाही कळस!

छत्रपती शिवाजी महाराजांवरील जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकावरून शिवप्रेमींमध्ये संताप पसरला आहे. प्रत्यक्षात या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती, तथापि प्रथम हायकोर्टाने व अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठविल्याने पुन्हा एकदा शिवप्रेमी खवळले आहेत. छत्रपतींचा अवमानकारक इतिहास आणि खोट्यानाट्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, या पुस्तकात नेमके काय आहे आणि ते कसे विपर्यस्त आहे, याचे विवेचन करणारी ही लेखमाला...२

-डॉ.प्रमोद पाठक
मो.क्र. ९९७५५५९१५५


"शिवाजी ः हिन्दू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' या पुस्तकाच्या प्रारंभीच आभार प्रदर्शनाच्यावेळीच सर्वांत पहिले वाक्य सामान्य वाचकाला अचंबित करणारे आणि जेम्सची स्वतःची शेखी मिरवणारे आहे. तो लिहितो I have been thinking about lilfe of Shivaji for almost two decades and have received encouragement इ. गर्भितार्थ असा की वीस वर्षे माझा अभ्यास चिंतन "शिवाजी' या विषयावर सुरू आहे. मला कुणी आव्हान देऊ नये. जेम्स साहेबाने भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या काही फेऱ्या केलेल्या असाव्यात. कारण पुस्तकाच्या प्रारंभीच डेक्कन क्विनच्या प्रवासाचे वर्णन येते आणि लगेच दुसऱ्या पानावर जेम्स फाकडा आपले (अ) ज्ञान पाजळतो. For every year, at the time of Dasara a fall fastival originally associated with the begining of military campains and the blessings of weapons, children all over maharashtra shape small mounds of mud into the hill forts of shivaji and populate them with toy figures of maratha warriors, their horses, and elephants (पृ.२)
वीस वर्षे "शिवाजी' या विषयावर चिंतन, अनेकदा भारतात वाऱ्या, भारतातील आणि भारताबाहेरच्या विद्वानांशी चर्चा इ. केल्यावरही जेम्स फाकड्याला समजू नये की, दसरा हा Fall मध्ये येत नाही? दसरा हा सण शरद ऋतूत येतो. दसऱ्यानंतर येणारी पौर्णिमा शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून सर्व हिन्दू साजरा करतात. Fall हा पानगळीचा शिशिर ऋतू डिसेंबर, जानेवारी दरम्यान येतो. दसरा गेल्या शेकडो वर्षात कधीच त्यावेळी आलेला नाही. Fall हा पाश्चात्त्य राष्ट्रात सर्वत्र अत्यंत थंडी आणि बर्फ साचले आहे; बाहेर पडण्याची इच्छा होत नाही; वातावरणात एक प्रकारची उदासीनता आली आहे अशावेळी ओढून ताणून साजरा केला जातो तो ख्रिस्तजन्माचा सण. हिंदूमध्ये शिशिरात उत्सव नाही. दसरा हा नव्या पिकांच्या कोठारांनी भरण्याच्या वेळी येणारा सण आहे. शरद पौर्णिमेला नवान्न पौर्णिमाही म्हणतात. त्याचे कारणही नव्या पिकांचा-धान्यांचा लक्ष्मीला कोजागिरीच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो. आनंददायी शरद ऋतूच्या - ज्ञानदेवांच्या शारदीय चंद्रकळेच्या - वर्षावात दसरा सण येतो.
जेम्स फाकड्याचे अज्ञान इथेच संपत नाही. त्याच वाक्यात जेम्स बहाद्दर सांगतात की, दसऱ्याच्यावेळी महाराष्ट्रातील मुले किल्ले बनवतात. यावर हसावे की, जेम्स फाकड्याची कीव करावी, असा प्रश्न पडतो. फाकडे बहाद्दूर! महाराष्ट्रात किल्ले दिवाळीच्या वेळी बनवतात. मी स्वत: ४०-४२ वर्षापूर्वी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनविले होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेला उठून स्वत: बनविलेल्या किल्ल्यासमोर शूरवीराच्या आवेशात लक्ष्मी बॉम्ब फोडण्याची मजा काही और होती. अशी दसरा दिवाळीची गल्लत करू नका जेम्स फाकडे साहेब. मला दुसरीच शंका सतावते. "गोरा वाक्य प्रमाणमं' याची बरेचदा प्रचिती आल्याने ते खोडून काढण्याचे कर्तव्य करणे भाग आहे. कारण उद्या अमेरिकेत जेम्स साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील किल्ले बनविण्याची परंपरा; प्रथा यावर कोणी प्रकल्प Project करू लागला तर तो हेच वाक्य थोपवून देईल. पन्नास वर्षांनी हे पुस्तक जर संदर्भासाठी वापरले गेले तर वीस वर्षांच्या व्यासंगानंतर मिळालेल्या अज्ञानावर त्यावेळचा विद्यार्थी संदर्भ म्हणून उद्धृत quote करून त्यावर शिक्कामोर्तब होईल. तेव्हा जेम्स फाकड्याला वेळीच आवर घालणे भाग आहे. (क्रमशः)

No comments: