Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 21 July 2010

फाटक ओलांडताना मडगावात अपघात

रेलगाडीखाली सापडून सांगेची विद्यार्थिनी ठार
मडगाव दि. २० (प्रतिनिधी): आज सकाळी येथील पेडा भागातील रेल्वे फाटक ओलांडताना येथील दामोदर विज्ञान उच्च माध्यमिकमध्ये शिकणारी सांगे येथील रोशनी गाब्रियल रेगो ही १७ वर्षीय विद्यार्थिनी रेल्वेगाडी खाली सापडून ठार झाली. सकाळी ८.३० च्या दरम्यान वास्को- कुळे गाडीला हा अपघात झाला. तिच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते.
सावर्डे, सांगे भागातील पाच विद्यार्थिनी भाड्याच्या जीपने नेहमी उच्च माध्यमिक विद्यालयात येत असत. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे खारेबांध मार्गे आल्या, पण गेल्या चार पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसाने भुयारी मार्गात मीटरभर पाणी भरलेले असल्याने व फाटक गाडी यावयाची असल्याने जीप त्यांना फाटकाजवळ सोडून परत गेली. फाटक बंद असल्याने व वास्को -कुळे रेल्वे गाडी मडगाव स्टेशनवर यावयास अवधी असल्याने कित्येक जण बंद फाटकाकडून रस्ता ओलांडत होते, त्यावेळी पाऊसही पडत होता. इतरांबरोबर या मुलीही रेलमार्ग ओलांडू लागल्या. चौघी पुढे होत्या तर रोशनी मागे होती. पुढे असलेल्या विद्यार्थिनींनी रूळ पार केले व रोशनी जात असतानाच गाडी आली, तिच्या पाठीमागे असलेली बॅग रेलगाडीच्या हुकला अडकली व त्यामुळे ती खाली कोसळली व अंगावरून गाडी गेल्याने जागीच ठार झाली.
ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व लोक गोळा झाले. दामोदर विद्यालयाच्या प्राचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात नेला.
फाटकावरील गार्डने ती मोबाईलवर बोलत होती, असा दावा केला होता पण तिचा मोबाईल बॅगेत होता व ती बॅग रेल्वेबरोबर कोकण रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावरून गार्डच्या दाव्यात तथ्य नसल्याचे आढळून आले.
रोशनी रेगो ही हुशार व सुस्वभावी विद्यार्थिनी होती. अभ्यासाबरोबर ती इतर कार्यक्रमातही भाग घेत असे. तिच्या अपघाती निधनाबद्दल प्राचार्य उदय बाळ्ळीकर यांनी शोक व्यक्त केला . दुपारी हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उद्या तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. तिच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करून उच्च माध्यमिक विद्यालयाला आज सुट्टी देण्यात आली.
या दुर्घटनेबद्दल मठग्रामस्थ हिंदूसभा, श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक , विद्यार्थी व व्यवस्थापनाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

No comments: