Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 24 July 2010

सुनील कवठणकरवर प्राणघातक हल्ला

पणजी व म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी): अंमलीपदार्थ विरोधात सह्यांची मोहीम राबवणारा आणि नुकतेच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर सनसनाटी आरोप करणारा "एनएसयुआय'चा अध्यक्ष सुनील कवठणकर याला आज सायंकाळी दुचाकीवर स्वार होऊन आलेल्या दोघा अज्ञात तरुणांनी दगडफेक करून गंभीर जखमी केले. यात सुनील याच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली असून त्याचे दातही तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. डिचोली अस्नोडा येथे हा हल्ला झाला असून जखमी अवस्थेत सुनील याला म्हापसा येथील वृंदावन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना "एनएसयुआय'चा अध्यक्ष सुनील कवठणकर आपल्या अन्य चार कार्यकर्त्यांसह डिचोली येथे चालला होता. यावेळी अस्नोडा येथे बस स्थानकाजवळ पोचला असता समोरून पल्सर या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्याच्या वाहनावर दगडफेक केली. समोरून आलेला दगड सरळ कार चालवणाऱ्या सुनील याच्या चेहऱ्यावर आदळल्याने रक्तबंबाळ झालेल्या सुनीलला त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून म्हापसा येथे हालवण्यात आले. त्याचे ओठ फाटले असून त्याला टाके घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
याविषयीची पोलिस तक्रार सादर करण्यात आली आहे. पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरण गंभीर असून त्याची "सीबीआय'मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही याविषयीची मागणी करण्यात आली होती. सुनील याने राबवलेल्या सह्यांच्या मोहिमेला भरपूर पाठिंबा मिळत असल्याचे पाहून त्याच्यावर हा हल्ला केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments: