एकजण अबकारी खात्याच्या ताब्यात, दुसऱ्याने पळ काढला
काणकोण, दि. १७ (प्रतिनिधी) - काणकोण तालुक्यातील शेळी- पोळे येथे आज अबकारी खात्याने छापा टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मोठ्या प्रमाणातील बेकायदा मद्यसाठा जप्त केला. या ठिकाणी अत्यंत दुर्गम भागात एका घरात बेकायदा दारूभट्टीच तयार करण्यात आली होती व तिथे देशी तथा विदेशी बनावटीची मद्यनिमिर्ती करण्यात येत होती असे आढळून आले. यावेळी जॉन मिंझ नामक झारखंडच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून घराचे मालक लिगोरियो डिसोझा यांनी घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात अबकारी खात्यातील कथित घोटाळा अजूनही धुमसत असताना काणकोण तालुक्यातील शेळी- पोळे येथे अबकारी खात्याने टाकलेल्या या छाप्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अबकारी खात्याचे आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी अलीकडेच पत्रादेवी येथे छापा टाकून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. आता शेळी- पोळे येथील छाप्यातही लाखोंचा मद्यसाठा सापडल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यव्यवसाय सुरू आहे या विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे. काणकोण तालुक्यातील पैंगीण मतदारसंघात शेळी- पोळे येथे बेकायदा मद्यनिर्मिती सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिल्यावरून आज अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील अबकारी खात्याच्या पथकाने हा छापा टाकला. या छाप्यात मद्यसाठ्यासह मद्य उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्रीही जप्त केली आहे, अशी माहिती अबकारी अधीक्षक नवनाथ नाईक यांनी दिली. सकाळी ११.३० च्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. यावेळी अबकारी खात्याचे निरीक्षक शांबा नाईक, राजेश सालेलकर, महेश्वर पै, हसन खान व खात्याच्या अन्य कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. जप्त केलेल्या मालाचे सुमारे आठ पिकअपचे लोड आणून पोळे येथील अबकारी कार्यालयात संध्याकाळी ७.३० पर्यंत खाली करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.
यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेळी या ठिकाणी लिगोरियो डिसोझा नामक व्यक्तीच्या अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या जागेत पक्के बांधकाम केलेल्या घरात ही भट्टी चालू होती. या भट्टीत तयार करण्यात आलेले मद्य इम्पेरियल ब्लू, रॉयल स्टॅग व अन्य स्थानिक कंपनीचा ब्रॅण्ड वापरून भरल्या जात होत्या, असेही आढळून आले आहे. दुसऱ्या एका इमारतीत मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता. या सर्व मालाची किंमत अंदाजे वीस लाख रुपयांवर जाणार, अशीही माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली.हा व्यवसाय पूर्णपणे बेकायदा सुरू होता. त्यासाठी कोणताही परवाना घेण्यात आला नसल्याचेही अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. हा व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून सुरू असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आल्याने यापूर्वी अबकारी खात्याचे याकडे नेमके कसे दुर्लक्ष झाले, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सदर इमारतीचा काही भाग "बेसमेंट' (तळघर) या स्वरूपाचा असून तिथे सर्व यंत्रसामग्री ठेवण्यात आली होती. याच जागेत मद्याच्या बाटल्यांचे फिलिंग, लेबलिंग आदी करण्यात येत होते,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, याठिकाणी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता छुप्या पद्धतीने जरी हा व्यवसाय सुरू असला तरी ज्या गतीने व मोकळेपणाने तो केला जात होता ते पाहता कुणातरी बड्या व्यक्तीच्या भरवशावरच तो सुरू होता, अशीच दाट शक्यता आहे. हा साठा राज्यात व राज्याबाहेरही बेकायदा पाठवण्यात येत असावा, असाही संभव आहे.
या बेकायदा धंद्याला नेमका कुणाचा आश्रय होता याची चौकशी करण्यात येणार असून मालकाला ताब्यात घेण्याचीही तयारी अबकारी खात्याने सुरू केल्याचेही सांगण्यात आले.
इजिदोर फर्नांडिस यांची हजेरी !
काणकोण येथे अबकारी खात्याने या बेकायदा मद्यनिमिर्ती अड्ड्यावर छापा टाकल्याची वार्ता कळताच या ठिकाणी अनेकांनी धाव घेतली. माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस हे देखील याठिकाणी हजर झाले,अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. ते या घटनेबाबत मोबाईलवरून कुणाशीतरी सातत्याने बोलत असल्याचे तेथील उपस्थित लोकांनी सांगितले. इजिदोर यांच्या हजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अबकारी निरीक्षकांचे अभय?
जम्मू- काश्मीरहून मोठ्या प्रमाणात बेकायदा बीअरसाठा पाठवण्यात आल्याने त्याच्या चौकशीसाठी
काही दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीर गुन्हा विभागाचे पोलिस दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शांबा नाईक या अबकारी निरीक्षकांची जबानी घेतली होती, अशी माहिती मिळाली आहे. शांबा नाईक हे मडगाव येथे होते व त्यांची पोळे येथील अबकारी नाक्यावर बदली करण्यात आली होती. काणकोणात राहूनही एवढ्या मोठ्या मद्यनिमिर्ती अड्ड्याची त्यांना माहिती कशी मिळाली नाही,असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बेकायदा व्यवसायाला अबकारी खात्यातीलच काही लोकांचा अभय होते,असाही आरोप केला जात आहे.
Sunday, 18 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment