Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 24 July 2010

अपहरणप्रकरणी मामीला ७ दिवसांनी अटक

वाळपई, दि. २३ (प्रतिनिधी): ब्रह्माकरमळी सत्तरी येथील आपल्याच १६ वर्षीय भाचीचे अपहरण करून तिला सात दिवस कोंडून ठेवल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी स्नेहल भालचंद्र गावकर या महिलेला अटक केली आहे. सदर मुलीचे १६ जुलै रोजी अपहरण करण्यात आल्यानंतर तिला धबधबावाडा येथील निवासी गाळ्यात कोंडून ठेवण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिला गोमेकॉच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सदर युवती पर्ये उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असून १६ जुलै रोजी दोघा महिलांनी तिच्या शाळेत जाऊन तिला लवकर घरी नेले. दुपारी २.३० पर्यंत आपली मुलगी न आल्याने तिच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला असता सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर दुपारच्या सुमारास सदर युवतीने फोनवरून आपण डिचोली बसस्थानकावर असल्याचे सांगितले. यावेळी संशयित आरोपीचा आवाज ऐकू आला होता. यावेळी तिचे वडील डिचोली येथे गेले असता त्यांना आपली मुलगी सापडली नाही. यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी धबधबावाडा येथे जाऊन मुलीची सुटका केली. परंतु, कोणालाच अटक करण्यात आली नव्हती. या दरम्यान त्या युवतीची प्रकृती खालावल्याने तिला इस्पितळात दाखल करण्यात आले.
कौटुंबिक वादातून तिचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली असून यामुळे तिच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवला असून अपहरणानंतर तिला मारहाण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान तिला विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तिचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या मामीला अटक केली असती तर चित्र अधिक स्पष्ट झाले असते. पोलिसांनी या संदर्भात संशयित महिलेला (मामी) अटक करण्यास सात दिवसांचा अवधी घेतल्याने हे प्रकरण पोलिसांवर शेकण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ड्रग्स व इतर प्रकरणात गृहखात्यावर ताशेरे ओढले जात असताना या प्रकरणामुळे या खात्याच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले जात आहेत.
या प्रकरणी वाळपई पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: