Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 22 July 2010

'गोव्यात ऑनलाईन सेक्स रॅकेट'

आमदार दामू नाईक यांचा सनसनाटी आरोप
पणजी,दि.२१(प्रतिनिधी): गोव्यातील पर्यटनाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन गोवा हे "सेक्स डेस्टिीनेशन' असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा सनसनाटी आरोप फातोर्ड्यांचे आमदार दामोदर नाईक यांनी केला आहे. विविध संकेतस्थळांच्या मदतीने राज्यात "ऑनलाइन सेक्स रॅकेट' सुरू आहे. याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना वेळीच ताब्यात घेण्याची गरज असल्याचेही श्री.नाईक म्हणाले.
आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेव्दारे दामू नाईक यांनी या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.सध्या विविध संकेतस्थळावरून उघडपणे देहविक्रीचा बाजार मांडल्याचा पर्दाफाशच दामू नाईक यांनी सभागृहात केला. विविध किमान दहा संकेतस्थळांवर अशी जाहिरातबाजी सुरू आहे. त्यावर गोव्यातील विविध ठिकाणांचे पत्ते देण्यात आल्याचे त्यांनी कागदपत्रांव्दारे उघड केले.
"एस्कॉर्ट'च्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक व्यवहारावर पोलिसांचा अजिबात अंकुश नाही. त्यामुळे अशा जाहिरातबाजीला अनेक पर्यटक बळी पडण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विविध कामांसाठी मुली पुरवठ्याचाच हा प्रकार आहे. अशा जाहिराती काही स्थानिक वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध होत आहेत. त्याची चौकशी पोलिसांनी केली आहे काय,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे गोव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी सुरू असून त्याचा मोठा फटका पर्यटनाला बसण्याचा धोका त्यांनी बोलून दाखवला.
'सीआयडी'कडून गंभीर दखल
या सर्व प्रकारांची "सीआयडी'कडून गंभीर दखल घेण्यात आल्याचा खुलासा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला. या जाहिराती मुंबईहून प्रसिद्ध केल्या जातात,असे चौकशीत आढळून आले आहे. या जाहिरात देण्यात येणारे फोन क्रमांक हे गोव्यातील नसल्याचेही उघड झाले आहे. यावर पोलिसांची नजर असून ते चौकशी करीत असल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.

No comments: