मडगाव दि. २२ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी सध्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांचा पोलिस कोठडीतील रिमांड उद्या संपत असून त्यांनी सत्र न्यायाधीशांकडे जामिनासाठी नव्याने अर्ज सादर केला आहे. उद्या दुपारी या अर्जावर युक्तिवाद होणार आहे.
८ जुलैपासून अनुक्रमे ७, ४ व ३ दिवस पोलिस कोठडीत असलेल्या मिकींचा रिमांड उद्या संपत असल्याने त्यांना प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ही संधी साधून त्यांच्यावतीने त्यांचे भाऊ सिंप्लिसियो पाशेको यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.
हा अर्ज फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ खाली दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तब्बल दोन आठवडे सखोल चौकशी केली आहे व आता कसलीच चौकशी बाकी उरलेली नाही. तपाससंस्थांनी कलम ३०४ खाली गुन्हा नोंदवावा असा कोणताही पुरावा पुढे आणलेला नाही, असा दावा करताना शवचिकित्सा अहवाल व उपचार कागदपत्र यातील निष्कर्ष भिन्न आहेत याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यातून आपल्यावर ३०४ व ३०६ कलमाखाली सहेतुक गुन्हा नोंदविण्यात आल्याने वास्तविक त्यातील कोणत्याही एका कलमाखाली गुन्हा नोंद होऊ शकतो असे म्हटले आहे.
आपण निरपराध असून कोणत्याही गुन्ह्यात गुंतलेलो नाही. आपण अबकारी व अमली द्रव्य घोटाळ्याची न्यायालयीन मागणी केल्यामुळेच आपल्याला या प्रकरणात अडकविल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. आपल्याला असलेल्या अनेक शारीरिक व्याधींकडे लक्ष देऊन जामीन मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
आपण आमदार असल्याने सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनास उपस्थित राहणे कसे आवश्यक आहे तेही पटवून देण्याचा प्रयत्न अर्जात केला आहे. सलग कोठडीत ठेवल्याने कोणताच हेतू साध्य होणार नाही, विधानसभा अधिवेशनामुळे राज्याबाहेर जाणार नाही तसेच या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या सोनिया तोरादो यांना याच न्यायालयाने दिलेला जामीन या बाबी विचारात घ्याव्यात अशी विनंती करताना तपासकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली आहे.
Friday, 23 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment