मडगाव दि. २३ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शर्मीला पाटील यांनी त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर सडा येथील तुरुंगात रवानगी केलेल्या मिकी पाशेको यांना मडगाव पोलिसांनी गेल्या वर्षीच्या एका कागदपत्र बनवेगिरीप्रकरणी अटक करून मडगावात आणले व दिवसभर आपल्या कोठडीत ठेवून नंतर दहा हजारांच्या व्यक्तिगत जामिनावर मुक्तता करून पुन्हा सडा तुरुंगात पाठविले. यामुळे माजी मंत्र्यांची एका अर्थाने कायदेशीर कज्ज्यात फरफट सुरू झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मिकी पाशेको यांनी येथील सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्यासमोर युक्तिवाद पूर्ण झाले. त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.
मिकींच्या वतीने या प्रकरणात आज प्रथमच ऍड. आनाक्लात व्हिएगश यांनी बाजू मांडताना सांगितले की, याच प्रकरणातील सहआरोपी असलेले लिंडन मोंतेरो यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला तर सोनिया तोरादो यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मग आपल्या अशिलालाच जामीन नाकारण्यामागे विशिष्ट असे कोणतेच कारण नाही. आपल्या अशिलाची १४ दिवसांच्या कोठडीत संपूर्ण चौकशी झालेली आहे, आता काहीच बाकी राहिलेले नाही. शिवाय पाहिजे तेव्हा मिकी चौकशीस हजर राहतील व सहकार्य करतील. मिकी लोकप्रतिनिधी असल्याने या दिवसात सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात हजर राहण्यासाठी त्यांना जामीन द्यावा, तो नाकारण्यासारखे खास असे कोणतेच कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जामीन अर्जास विरोध करताना सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापासून खालच्या न्यायालयापर्यंत सर्वांनी दिलेल्या निवाड्यांचा अभ्यास केल्यास न्यायालयाला वस्तुस्थिती काय आहे ते कळून येईल, असे सांगितले. आरोपी विरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा आढळल्यानेच त्याचे आजवरचे जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत. आरोपीस विधानसभेत हजर राहावयाचे असेल तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यास त्याला यापूर्वीच उच्च न्यायालयाने बजावलेले आहे, मग त्यासाठी जामिनाची गरज ती काय? असा सवाल त्यांनी केला.
या वेळी ऍड. व्हिएगश यांनी अन्य न्यायालयांच्या निवाड्यांचा प्रभाव या अर्जावर निवाडा देताना पडता कामा असे सांगताना त्यावेळची व आत्ताची परिस्थिती वेगळी असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर न्या. देशपांडे यांनी सोमवारी सकाळी निवाडा दिला जाईल असे सांगितले. उद्या न्यायालयाला सुट्टी आहे व न्यायिक परिषद गोव्यात होत आहे, त्यात आपण व्यस्त असेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------------------------------------------------------------
मिकींच्या अर्जावर सुनावणी सुरू असतानाच मडगाव पोलिसांनी जाळे विणून ठेवले होते. त्यांना सडा येथील कोठडीत नेताच पोलिसांनी, २००९ मध्ये सारा पाशेको यांनी नोंदवलेल्या प्रकरणात चौकशीसाठी मिकी यांना ताब्यात घेण्याचे वॉरंट मिळविले व त्यांना लगेच सडा येथून मडगाव पोलिस कोठडीत आणून ठेवले. सायंकाळी प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी त्यांची दहा हजार व्यक्तिगत जामीन व तेवढ्याच रकमेची हमी या अटींवर मुक्तता केली. यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा सडा तुरुंगात नेण्यात आले.
सारा पाशेको यांनी २००९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार बेताळभाटी येथील घर व मालमत्तेसंदर्भातील व्यवहारासाठी त्यांनी मिकींना दिलेल्या मुखत्यारपत्राची नक्कल करून बनावट कागदपत्र व सह्या करून दुसरी पत्नी व्हियोलाच्या नावे केले. या कागदपत्रांचा वापर करून त्यांनी ईडीसीकडून ४ कोटींचे कर्ज घेतले होते.
ही तक्रार नोंद झाली त्यावेळी मिकी हे मंत्रिपदी होते व त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पाचारण करणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. आता मिकी न्यायालयीन कोठडीत जाताच पोलिसांनी हे प्रकरण वर काढले व त्यांना ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत ठेवले आणि चौकशी केली.
मिकींना मडगाव पोलिसांनी अटक केल्याची वार्ता पसरली व त्यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनसमोर गर्दी केली, यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
दरम्यान, माजी पर्यटनमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत नोंदवलेली अन्य तीन प्रकरणे वर काढण्यात आली. यामुळे या प्रकरणांत पोलिस अटक करतील या भीतीपोटी त्यांच्या वतीने आज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्यात आला असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी आपल्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी घेऊन येत्या सोमवारपर्यंत त्यांना अटक करू नये अशा सूचना पोलिसांना केल्या आहेत.
त्यातील एक प्रकरण केपे पोलिसांत नोंदवले गेलेले बनावट सही करून आलिशान गाडी विकल्याचे, दुसरे मडगाव पोलिसांत नोंदवलेले गेलेले बनवेगिरी करून फ्लॅट विक्रीचे तर तिसरे नगरनियोजन खात्याने नोंदविलेले बेकायदा भरावाचे आहे. पैकी दोन प्रकरणांतील तक्रारी सारा पाशेको यांनी नोंदविलेल्या आहेत. या एकंदर प्रकरणावरून नादिया तोरादो मृत्युप्रकरणाबरोबर माजी पर्यटनमंत्र्यांमागे पोलिसांचे शुक्लकाष्ठ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Saturday, 24 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment