Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 20 July 2010

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखण्यास सरकार पूर्ण अपयशी

- साडेचार कोटी रुपये खर्च कुठे गेला?
- विरोधकांचा मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले असताना सामान्यांना दिलासा देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून कडधान्य व दैनंदिन गरजेच्या अन्य वस्तू, भाज्या मर्यादित दरात पुरविण्याची योजनाही सरकारच्या नियंत्रणात राहिली नसल्याची संतप्त टीका आज विरोधकांनी विधानसभेत केली. "दरवाढ रोखण्यासाठी सरकारी प्रयत्न' या कार्यक्रमांतर्गत घाऊक दरात माल उपलब्ध करण्याच्या योजनेवर २००८ -०९ साली पावणेदोन कोटी तर २००९ - १० वर्षी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र इतकेही करून दरवाढ रोखणे सरकारला काही शक्य झाले नाही. योजना जर सरकारच्या नियंत्रणात राहणार नसेल तर ती का म्हणून राबवायची? आमआदमीच्या नावाने खास आदमीची सोय करण्यासाठीच तर ती नाही ना? असा सवालही विरोधकांनी यावेळी केला.
फातोर्डेचे आमदार दामू नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका प्रश्नावर विरोधकांनी चारही बाजूंनी सरकारवर तिखट हल्ला चढवला. दरवाढ रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी तर ठरलेच परंतु नियंत्रित दरात जीवनावश्यक व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्याच्या सरकारी योजनेचाही पूर्णपणे बोजवाऱ्या उडाला असेही दामू नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले. नागरी पुरवठामंत्री जुझे फिलीप यांना विरोधकांनी यावेळी चांगलेच फैलावर घेतले. दामू नाईक यांनी दरवाढीचा वाढता आलेख वस्तू आणि वाढलेली किंमत याद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. दाळी, कडधान्य, भाज्या यांचे गेल्या काही काळातले वाढलेले दर त्यांनी यावेळी वाचून दाखवले. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखण्यास कामत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे आणि सरकारी योजनेनंतरही हे दर फारसे कमी झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी केलेल्या या चौफेर हल्ल्याला नागरीपुरवठा मंत्री स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. नियंत्रित दरात सरकारने भाज्या, कडधान्ये व इतर वस्तू कशा पुरवल्या हेच ते सांगत राहिले. विरोधक म्हणतात ती महागाई केवळ गोव्यातच नाही, ती सर्वत्र आहे असेही त्यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी त्यांच्यावर उलट हल्ला केला. शेवटी सभापती प्रतापसिंग राणे यांनी विरोधकांना शांत केले आणि जुझे फिलीप यांची या प्रखर हल्ल्यातून मुक्तता केली.

No comments: