गॅले, दि. २२ : शेवटी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या खेळानंतर अखेर मुरलीने आपली लक्ष्य प्राप्ती केली आणि आपल्या शेवटच्या कसोटीत ८०० बळींचे लक्ष्य पूर्ण केले. या शेवटच्या सामन्यानंतर आपण कसोटी क्रिकेटचा निरोप घेणार आहोत, अशी घोषणा जेव्हा मुरलीने सामन्याच्या आधी केली होती, तेव्हा कदाचित त्यानेही आपल्या ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा केली नव्हती. प्रज्ञान ओझाच्या रूपात आपला ८०० वा कसोटी बळी नोंदवून मुरलीधरनने आपल्या १८ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीचा निरोप घेतला. ३८ वर्षीय ऑफ स्पिनरने या कसोटीत आठ फलंदाजांना बाद करून ८०० कसोटी बळींचे लक्ष्य साध्य करून आपल्या वैयक्तिक कामगिरीलाही संस्मरणीय केले. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला जेव्हा "गार्ड ऑफ ऑनर' दिला तेव्हा हा महान फिरकीपटू गदगद आणि भावविभोर झाला होता. मुरलीधरनने १३३ कसोटीत ८०० आणि ३३७ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये ५१५ फलंदाज बाद केले असून क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारांमधील हे दोन्ही विश्वविक्रम ठरले आहेत. मुरलीधरन आता कसोटी सामने खेळणार नसला तरी भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २०११ साली होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय त्याने सध्या राखून ठेवला आहे.
८०० कसोटी बळी पूर्ण करणारा मुरली पहिला व एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्या खालोखाल वॉर्नचा क्रमांक आहे. शेन वॉर्नने १४५ सामन्यांत ७०८ फलंदाज बाद केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुरलीनंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम दुसऱ्या स्थानावर आहे. वसीमने ३५० एकदिवसीय सामन्यांत ५०२ बळी नोंदविले आहेत.
Friday, 23 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment