पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी न्यायालयात मिकी पाशेको यांची बाजू मांडणारे वकील अमित पालेकर यांनी मिकी त्यांचा खटला पुढे चालवण्यास असमर्थता दाखवत त्यांचा वकालतनामा आज मागे घेतला. मिकी समर्थकांनी वकिलांना उद्देशून अपशब्द वापरल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई हे सुद्धा यापुढे मिकी यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उभे राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीला ऍड. पालेकर यांनी आज रात्री दुजोरा दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मिकी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर मिकी समर्थकांनी ऍड. देसाई यांच्या बाबतीत अपशब्द वापरले. हे शब्द कानी पडल्याने या खटल्याचा वकालतनामा स्वीकारलेले ऍड. पालेकर यांनी यापुढे मिकी यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उभे न राहण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनुसार, न्यायाधीश निवाडा देत असताना मिकी यांना जामीन मंजूर होणार असल्याची समजूत होऊन न्यायालयाच्या आवारात असलेल्या त्यांच्या समर्थकांनी सर्वत्र "एसएमएस' पाठवायला सुरुवात केली. मात्र निवाड्याच्या शेवटी न्यायालयाने मिकीचा जामीन फेटाळून लावताच न्यायालय इमारतीच्या खाली असलेल्या समर्थकांचा गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही वकील खाली उतरत असता त्यांच्या कानावर अपशब्द आल्याची माहिती मिळाली.
Friday, 23 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment