Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 18 July 2010

... तर पंचवाडीत रक्ताचे सडे पडतील

बचाव समितीचा सरकारला झणझणीत इशारा
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- पंचवाडीवासीयांना खाण प्रकल्प नको असेल तर तो अजिबात होणार नाही, असे ठोस आश्वासन या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला महिनाही उलटला नाही तोच तेथील खाण कंपनीकडून थेट पंचवाडीतील नियोजित ठिकाणी बेकायदा खारफुटीची कत्तल सुरू होते, याचा अर्थ काय, असा खडा सवाल पंचवाडी बचाव समितीने केला आहे. याठिकाणी लोकांना डावलून व दहशतीचा वापर करून खाण प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला तर रक्ताचे सडे पडतील आणि त्याला सरकार पूर्णतः जबाबदार असेल, असा कडक इशारा क्रिस्टो डिकॉस्टा यांनी दिला आहे.
पंचवाडी गावात एका बड्या खाजगी कंपनीची खनिज हाताळणी प्रकल्प सुरू करण्यासाठी धडपड सुरू आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सार्वजनिक हिताचे निमित्त पुढे करून भूसंपादन करण्याचीही कृती घडली आहे. याठिकाणी खनिज वाहतुकीसाठी वेगळा मार्ग तयार करण्याचे कारण पुढे करून लोकांना मूर्ख बनवण्यात आल्याचीही माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सदर कंपनीतर्फे गावातील काही लोकांना हाताशी धरून त्यांना रोजगार किंवा व्यवसायाचे आमिष दाखवण्यात आले आहे. पंचायतीच्या काही सदस्यांनाही या कंपनीकडून भुलवण्यात आले आहे. या खाण प्रकल्पाला पाठिंबा देणारा ठराव संमत करण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण हे सगळे प्रयत्न पंचवाडीवासीयांनी एकजुटीने हाणून पाडले. अखेर एका ग्रामसभेत बेकायदा ठराव संमत करून घेण्यात आला खरा; मात्र सदर या ठरावालाही पंचायत संचालकांपुढे आव्हान देण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित कंपनीकडून आता हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी गावातीलच आपल्या समर्थकांना हाताशी धरून पंचवाडी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना धाकदपटशा दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गावात फूट पाडून ही कंपनी पंचवाडीचे अस्तित्वच नष्ट करू पाहते आहे. या गावात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे लोक राहतात. त्यांची गरिबी व असह्यता आणि निरक्षरता यांचा फायदा उठवून व त्यांना पैशांची लालूच दाखवून भडकावले जात असल्याचा आरोपही पंचवाडी बचाव समितीने केला. कोणत्याही स्थितीत तेथे खाण प्रकल्प उभारू देणार नाही, असा वज्रनिर्धारच पंचवाडीवासीयांनी केला आहे. त्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देऊ, असे खणखणीत आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.
दुर्मीळ खारफुटीची कत्तल ही कायद्याने अवैध आहे. मात्र सदर नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी खारफुटीची कत्तल बिनदिक्कत सुरू असल्याची माहिती समितीने तात्काळ वन खात्याला दिली. त्यावर ताबडतोब खात्याचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यावेळी वनाधिकाऱ्यांना मदत करीत असतानाच अचानक काही लोकांनी समितीच्या सदस्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. विशेष म्हणजे या हल्लाप्रकरणी अटक झालेल्यांना तात्काळ जामिनावर सोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पंचवाडीवासीयांना अंधारात न ठेवता या नियोजित प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आवाहन श्री.डिकॉस्टा यांनी केले आहे.

No comments: