आमदार विजय पै खोत यांचा इशारा
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- गेल्या वर्षी अचानक आलेल्या पुरामुळे काणकोण येथील तळपण नदीच्या पात्रात साचलेला गाळ त्वरित न काढल्यास यंदा पुन्हा तशाच पुराचा धोका काणकोण तालुक्याला संभवत असल्याचा इशारा काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी आज विधानसभेत दिला. प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे श्री. पै खोत यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
गतवर्षी आलेल्या पुरामुळे काणकोण तालुक्यातील काही भागांना मोठा फटका बसला होता. काणकोणच्या माथ्यावर असलेल्या सांगे तालुक्यातील सालजिणी सारख्या गावांत खाणीची पातळी खूपच खाली गेली असल्याने त्यात भरणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतून लांबवर पाण्याचे "चॅनल' तयार झाले आहे. मोठ्या पावसात हे पाणी आतल्या आता वाहू लागते आणि पुढे ते मोठ्या लोंढ्यांच्या स्वरूपात वाहू लागते. गेल्या वर्षी याच लोंढ्यामुळे तो भयावह पूर आला होता. त्या पुरामुळे गालजीबाग नदीच्या आसपास गावांमध्ये अनेक घरे आणि संसार वाहून गेले. कोट्यवधी रुपयांची त्यात वाताहत झाली. शेवटी पूर ओसरला परंतु, पुराबरोबर वाहून आलेली माती गाळाच्या स्वरूपात नदीत ठिकठिकाणी भरून राहिली. तळपण नदीच्या अगदी शेवटच्या मुखावर सुद्धा मातीचा गाळ बसल्याने यंदा पुन्हा पुराची शक्यता निर्माण झाली आहे. गाळामुळे नदीचे पात्र उथळ झाल्यामुळे यंदा साध्या मुसळधार पावसातही पाणी पात्राच्या बाहेरून वाहण्याची, ते पाणी गावांमध्ये घुसण्याची शक्यता आहे. अशा वेळी सरकारकडून ठोस उपाययोजना होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गतवर्षीच्या या पुरामुळे जवळपास ४८ कोटींचे नैसर्गिक प्रकारचे नुकसान झाले आहे, असे गृहीत धरण्यात आले आहे. गाळ उपसणे, नदीचे वळण कमी करणे, बांध बांधणे, कडा बांधून काढणे याद्वारे नुकसानीवर मात करण्याचे काम सुरू आहे. पूर नियंत्रण योजनेंतर्गत जी ४८ कोटींची कामे केली जाणार आहेत, त्यांपैकी ३.४२ कोटींच्या कामांची निविदा यापूर्वीच काढण्यात आली असून ही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येतील असे जलसंधारणमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीज यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या पुराच्या अनुषंगाने उपाययोजनेचा भाग म्हणून आजवर जवळपास ४०.१० ला रुपयेच खर्च करण्यात आल्याचेही एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. नेरी यांनी यावेळी सांगितले.
Tuesday, 20 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment