फोंडा, दि.२१ (प्रतिनिधी): तारीभाट-आडपई भागाला आज (दि.२१) सकाळी अकराच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळामुळे एक जण जखमी झाला असून पाच घरे, दोन गाड्यांवर झाडे मोडून पडल्याने सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जुवारी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या तारीवाडा आडपई भागाला २१ रोजी सकाळी ११ च्या सुमारास चक्री वादळाचा जोरदार तडाखा बसला. तारीवाडा येथे दाट घरे असलेल्या भागात मोठ मोठी जुनाट झाडे धोकादायक स्थितीत आहेत. ह्यावादळी वाऱ्यामुळे जुनी झाडे मोडून पडली. बोरीचे मोठे झाड उन्मळून पडले. भेंडी, आंब्याच्या झाड्याच्या फांद्या मोडून घरांवर आणि विजेच्या तारांवर पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. याच वेळी रस्त्यावरून चालत जाणारे विनायक मुळे (५५) हे गृहस्थ वादळात सापडले. त्यांच्या अंगावर मोडलेली फांदी पडल्याने जखमी झाले. सदर फांदी विजेच्या तारांवर प्रथम पडली. त्यानंतर विनायक मुळे यांच्या अंगावर पडली. वादळामुळे तुकाराम नाईक, उमेश सरदेसाई, आनंद तिमलो नाईक, भीमारथी नाईक यांच्या घरांवर झाड्याच्या फांद्या मोडून पडल्याने नुकसान झाले आहे. सुमो जीप (जीए ०२ जे १११८) आणि इंडिका कार (जीए ०२ एस ६३३६) ह्या दोन वाहनांवर फांद्या मोडून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.
तारीवाडा भागातील जुनाट धोकादायक स्थितीत असलेल्या झाडे कापण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. सदर जागा ही भाटकाराची असल्याने धोकादायक झाडे कापण्यात अडचण येते, असे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा अग्निशामक दलाच्या जवांनाही घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेली झाडे हटविण्याचे काम केले. केंद्र अधिकारी फ्रान्सिस मेंडिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी मारुती गावकर, व्ही. के. अष्टेकर, बी.एम. गावस, जे.व्ही. गावडे, ए.जी. नार्वेकर, एस.आर. कुंकळ्येकर, व्ही.आर. गावडे, एच.जी. सावंत, एस.पी. नाईक यांनी झाडे कापण्याचे काम केले.
आडपई परिसरातील तारीभाट तसेच इतर भागात सुध्दा घरांच्या जवळ अनेक मोठी जुनाट झालेली झाडे आहेत. सदर झाडे मोडून पडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात आहे. घरांसाठी धोकादायक असलेली झाडे तोडून टाकावीत, अशी लोकांची मागणी आहे. स्थानिक पंचायतीने गावातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक कृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Thursday, 22 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment