Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 24 July 2010

'आझिलो'वरून विरोधकांनी माजवले रण

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): म्हापशातील आझिलो इस्पितळाची अक्षरशः दैना झाली आहे. तेथे एका रुग्णाची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलेवर आज सकाळी तेथीलच एक भलीमोठी जुनी फोटोफ्रेम कोसळून ती महिला गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला तब्बल अकरा टाके पडले आणि या विषयावरून आज विरोधी भारतीय जनता पक्षाने विधानसभेत दणदणीत आवाज उठवला. प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शून्य प्रहरावेळी हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष या ज्वलंत विषयाकडे वेधले.
सदर महिला ही शिवोली मतदारसंघातील होती. त्यामुळे या घटनेची वार्ता कळताच शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकरही तिथे पोहोचले. खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणेही तेथे दाखल झाले. त्यामुळे इस्पितळातील कर्मचारी व डॉक्टरांचीही त्रेधातिरपीट उडाली. या घटनेनिमित्ताने आमदार मांद्रेकर यांच्यासोबत आरोग्यमंत्र्यांनी संपूर्ण इस्पितळाचीही पाहणी केली. सर्वच वॉर्डांत पाण्याची तीव्र टंचाई, भयानक अवस्थेतील शौचालये, धोकादायक वीज उपकरणे व दुर्गंधी यामुळे तेथील स्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. हे दृश्य पाहून आमदार मांद्रेकर काय म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे, याचा पुनरुच्चारही आरोग्यमंत्र्यांनी केला,असेही आमदार मांद्रेकर यांनी स्पष्ट केले.
आझिलो इस्पितळाचे संपूर्ण स्थलांतर करणे शक्य नसले तरी बाह्य रुग्ण विभाग(ओपीडी) व शवागर विभाग तात्काळ स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर आज अखेर विधानसभेत एकमत झाले.विद्यमान डॉक्टर व कर्मचारी यांच्या भरवशावर संपूर्ण इस्पितळ स्थलांतरित केल्यास ते चोवीस तासही चालू शकणार नाही. प्रशासकीय मंडळाच्या देखरेखीखाली "पीपीपी' पद्धतीवर अशा पद्धतीची इस्पितळे विविध ठिकाणी सुरू आहेत. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळही या धर्तीवर सुरू करण्याचा मनोदय असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
इस्पितळातील बारीकसारीक खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचाही विनियोग केला जात नाही यावरून येथील डॉक्टरांची मानसिकता लक्षात येते. अशा लोकांना घेऊन या इस्पितळाचे स्थलांतर केले तर चोवीस तासही ते चालू शकणार नाही. विरोधी सदस्यांकडे काही सूचना असल्यास त्यांनी त्या अवश्य मांडाव्यात,असेही ते म्हणाले. "पीपीपी' धर्तीवरच जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचा आपला इरादा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही आझिलोतील इस्पितळाची पाहणी करण्याचे ठरवले आहे. सध्या ओपीडी व शवागर विभाग तात्काळ नव्या जागेत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित इस्पितळ स्थलांतरित करण्याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले.

No comments: