Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 22 July 2010

बिहार सभापतींवर चप्पल भिरकावली

६७ विरोधी आमदार निलंबित
पाटणा, दि. २१ : बिहार विधानसभेला विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज सलग दुसऱ्याही दिवशी आखाडा बनविताना रणकंदन माजविले. विधानसभेत तसेच विधानसभेबाहेर नितीशकुमार सरकारविरुद्ध जोरदार नारेबाजी करीत विरोधी पक्षांच्या आमदारांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. वैधानिक प्रतिष्ठा असलेल्या विधानसभा अध्यक्षांवर चप्पल भिरकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कॉंग्रेसच्या एका महिला आमदाराने रूळावरून घसरलेल्या रेल्वेगाडीप्रमाणे तोल गमावताना सरकारविरुद्धचा रोष विधानसभेच्या आवारात असलेल्या रोपट्यांच्या कुंड्यांवरच काढला. अखेर महिला मार्शलांकडून त्यांना वठणीवर आणण्यात आले. सभागृहात असभ्य वर्तन करणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकूण ६७ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले.
"नितीशकुमार सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा,' या मागणीसाठी विधानसभेत जोरदार नारेबाजी करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या ४२ आमदारांसह विरोधी पक्षांच्या एकूण ६७ आमदारांना संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी आज केली. विधानसभेसोबतच विधान परिषदेतही आज सलग दुसऱ्याही दिवशी प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्षांनी वारंवार समज देऊनही विरोधी सदस्यांनी सत्तारूढ सदस्यांना शिविगाळ करणे, अंगावर धावून जाणे, गदारोळ घालणे असे लोकशाहीला काळीमा फासण्याचे प्रकार सुरूच ठेवल्याने या गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढावे लागले. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना मार्शलांनी एकापाठोपाठ एक बाहेर काढले.
यानंतर कॉंग्रेसच्या निलंबित आमदार ज्योती कुमारी यांना सभागृहात जाण्यापासून सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखताच त्यांनी अकांडतांडव करताना रौद्र रूप धारण केले. विधासभेच्या बाहेर शोभीवंत रोपट्यांच्या कुंड्या त्यांनी फोडल्यास सुरुवात केली. त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी करताच त्यांना अधिकच त्वेष चढला. तीन महिला मार्शलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करूनही त्या जुमानत नव्हत्या.
विधान परिषदेतही दृश्य फारसे वेगळे नव्हते. राजदचे आमदार संजय प्रसाद यांनी मायक्रोफोन तोडताच सत्ताधारी बाकांवरून संतप्त पडसाद उमटले. शाब्दिक चकमकींमुळे प्रचंड गदारोळ झाला विधानसभेत राजदचे आमदार आर. सी. पासवान यांना मार्शलकडून सभागृहाबाहेर काढले जात असताना ते प्रवेशद्वाराजवळ मूर्च्छित झाले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय इस्पितळात नेण्यात आले. राजदचे आमदार बबलू देव यांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी मार्शलांनी उचलताच त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीला धावले. याच वेळी एक चप्पल विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावण्यात आली. मात्र, सुदैवाने ती विधानसभा अध्यक्षांना लागली नाही. ही चप्पल नेमकी कोणी भिरकावली, याचा तात्काळ शोध लागला नाही. राजदचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल बारी सिद्दिकी आणि सभागृहातील राजदचे उपनेते शकील अहमद खान या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या ११ आमदारांचाही निलंबितांमध्ये समावेश आहे.
"कॅग'च्या अहवालामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे म्हटलेले आहे. या अहवालावरून नितीशकुमार सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी आमदारांनी आज सलग दुसऱ्याही दिवशी गोंधळ घातला. मंगळवारी घातलेल्या गोंधळात विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या १४ आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

No comments: