विधानसभेवर धडक देण्याचा विरोधकांचा निर्धार
कुडचडे, दि. १७ (प्रतिनिधी) - तिळामळ कुडचडे ते सांगे या प्रस्तावितचौपदरी रस्त्यासंदर्भात आज घेण्यात आलेल्या बैठकीला वेगळेच वळण लागल्याने रस्त्याला विरोध करणाऱ्या गटाने संध्याकाळी कुडचडेत बाजारातून निषेध मोर्चा काढला. तसेच चौपदरी रस्ता कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसून याविरोधात विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्धार बोलून दाखवला.
गेल्या मंगळवारी लोकांनी आमदार श्याम सातार्डेकर यांच्या कार्यालयात धडक देऊन सदर चौपदरी रस्त्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आमदारांनी शनिवारी रवींद्र भवन येथे संध्याकाळी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज संध्याकाळी चौपदरी रस्ता विरोधक सभेसाठी रवींद्र भवनाजवळ गेले असता तेथे कुडचडे विकास संघटनेची बैठक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर तसेच त्याठिकाणी संघटनेचे लोक मोठ्या प्रमाणात जमलेले पाहून रस्ता विरोधकांनी संताप व्यक्त केला. तसेच या मुद्यावरून दोन गट निर्माण करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. आमदारांकडून विरोधकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी
आयोजलेल्या बैठकीशी कुडचडे विकास संघटनेचा कोणताच संबध नसल्याने ही जनतेची फसवणूक असल्याचे विरोधकांनी सांगितले. त्यामुळे या घटनेचा तीव्र निषेध करीत बैठकीसाठी जमलेल्या लोकांनी आपसात चर्चा करून तेथून निषेधफेरी काढली. कुडचडे बाजारातून निघालेल्या या फेरीचे नायगरा सभागृहाजवळ सभेत रूपांतर झाले. चौपदरी रस्त्याची अधिसूचना व रस्त्यासाठी लावण्यात आलेले कलम ६४ ताबडतोब रद्द करण्याची मागणी करत आमदारांच्या दुटप्पी धोरणांचा सभेत जोरदार निषेध करण्यात आला.
चौपदरी रस्त्यासंदर्भात सरकारला पाठवण्यात आलेला संपूर्ण अहवाल दिशाभूल करणारा व चुकीचा असून यासाठी साहायक अभियंत्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे ऍड. अत्रेय काकोडकर यांनी सांगितले तसेच गावराखण जागृत मंचातर्फे अभियंता सतेश काकोडकर सतेश काकोडकर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार चौपदरी रस्त्यामुळे ७६ घरांसह अनेक झाडे, इमारती व ५९ कुंपणांना याचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी नगरसेवक परेश भेंडे, कामगार नेते रायसू नाईक, शिवसेनेचे नामदेव नाईक, श्रीमती झरीना डिकुन्हा यांची भाषणे झाली. जिल्हा पंचायत सदस्य रुझारियो फर्नांडिस, श्रीमती सुकोरीन गौस, आशिष करमली, अनिल माड, डॉ. केतन देसाई, फ्रान्सिस फर्नांडिस, उल्हास करमली, क्रिस्तानंद पेडणेकर यांच्यासह सुमारे ३०० लोकांची उपस्थिती होती.
दरम्यान, स्थानिक आमदार सातार्डेकर यांच्या कुडचडे विकास संघटनेतर्फे रवींद्र भवनात झालेल्या बैठकीत सदर चौपदरी रस्त्याचे समर्थन करण्यात आले. स्थानिक आमदारांचे प्रयत्न लक्षात घेता चौपदरी रस्त्यास विरोध करणे योग्य नसल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
आमदारांनी सांगितले, विकासकामे करताना कोणालाच दुखविण्याचा आपला विचार नसून या चौपदरी रस्त्याची गरज ओळखून आपण हा प्रस्ताव पुढे केला. या रस्त्याचे रूंदीकरण करकताना कोणाचीच घरे अथवा इतर बांधकामे पाडण्याचा आपला इरादा नाही.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांना इजा पोहचणार नाही, असा दावा त्यांनी केला. ग्रामस्थांनी सर्वच विकासकामांना विरोध केल्यास कुडचडे मतदारसंघ विकासापासून वंचित राहून तो मागासलेला राहील अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चौपदरी रस्ता झाल्यावर या भागाला किती झळाळी येईल व सर्वांसाठी तो कसा लाभदायी ठरेल याचा सर्वप्रथम विचार करावा असा सल्ला त्यांनी या रस्त्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना दिला. अमृत नाईक, दिनेश नाईक, केपेचे नगरसेवक नारायण गांवकर, भास्कर करमळी व आदींनी यावेळी आपले विचार मांडले.
व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक श्री. पारकर नगरनियोजन खात्याचे श्री. बांदोडकर, अभियंते प्रदीप पेडणेकर यांची उपस्थिती होती.
Sunday, 18 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment