अमित शहांवर सीबीआयचे आरोपपत्र
अहमदाबाद, दि. २३ : सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने आज दाखल केलेल्या आरोपपत्रात गुजरातचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने त्याचे सावट पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या भोजन समारोहावर पडले. लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, अरुण जेटली व सुषमा स्वराज या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप नेत्यांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र पाठवून या समारंभाला येण्याबाबत असमर्थता दर्शवली. तसेच सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याबद्दल निषेध व्यक्त केला.
गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमकीच्या संदर्भात गुजरातचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक केली जात आहे, हे काल स्पष्ट झाले होते. त्यानंतर रात्री भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली व पक्षाचे सरचिटणीस अनंतकुमार यावेळी उपस्थित होते. गुजरातमध्ये निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
मोदी कणखर
सी. बी. आय. ने गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या अटकेची तयारी चालविली असली, तरी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र पूर्णपणे कणखर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. परिस्थितीला हाताळण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे समर्थ आहे, असे त्यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
२००५ मधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी "सीबीआय'ने गेल्या २८ एप्रिल रोजी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी असलेले गुजरातमधील पोलिस उपायुक्त अभय चुडासामा यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर ९० दिवसांच्या आत या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणे "सीबीआय'वर बंधनकारक असल्याने अखेर आज (ता. २३) ते दाखल करण्यात आले. या आरोपपत्राबाबत अधिक माहिती देण्यास "सीबीआय'च्या अधिकाऱ्याने नकार दिला. अमित शहा हे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे सहकारी मानले जातात. "सीबीआय'ने चौकशीसाठी त्यांना आज दुपारी १ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, शहा यांच्याऐवजी त्यांचे वकील मितेश अमीन हे "सीबीआय'च्या कार्यालयात उपस्थित झाले आणि त्यांनी आणखी वेळ तसेच चौकशीसाठीच्या प्रश्नांची यादी मागितली. मात्र, त्यांच्या या दोन्ही मागण्या फेटाळण्यात आल्या. त्यानंतर शहा यांचा शोध घेण्यासाठी "सीबीआय'चे पथक रवाना झाले तर वकील अमीन यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.
Saturday, 24 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment