Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 July 2010

वादांच्या पार्श्वभूमीवर आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

वादग्रस्त विषयांवरून विरोधक आक्रमक

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - राज्यात गेल्या काही काळापासून वादग्रस्त ठरलेल्या अनेक विषयांच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. सभापती प्रतापसिंग राणे यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप ठेवून भाजपने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या अविश्वास ठरावाच्या नोटिशीमुळे अधिवेशनाची सुरुवातच तणावपूर्ण वातावरणात होण्याची अपेक्षा आहे. अबकारी घोटाळा, अमलीपदार्थ व्यापार आणि राजकीय संबंध, गृहमंत्री रवी नाईक यांचे चिरंजीव रॉय नाईक यांच्यावरील कथित आरोप, बिघडलेली राज्याची आर्थिक स्थिती, मिकी पाशेको यांची अटक, विश्वजित राणे व भाजप यांच्यात पेटलेला संघर्ष अशा अनेक कारणांमुळे या अधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
उद्या १९ पासून सुरू होणारे हे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालेल, त्यात कामकाजाचे १५ असतील. ६ ऑगस्ट हा कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. अधिवेशनाच्या या पंधरा दिवसांच्या कालावधीत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येणार असून सरकारविरोधात विरोधकांनी अनेक प्रश्नांवरून रान उठवण्याचा निश्चय केला आहे. विशेषतः बेकायदा आणि बेदरकार खाण व्यवसाय, राज्याची बिघडलेली अर्थव्यवस्था, रखडलेली विकास कामे, भ्रष्टाचार, अमलीपदार्थ व्यवहारांशी पोलिस तसेच राजकारण्यांचे संबंध, गृहमंत्र्यांच्या मुलावर त्या अनुषंगाने झालेले आरोप, रॉय नाईक यांची चौकशी करण्यासंदर्भात पोलिसांनी चालवलेली टाळाटाळ असे अनेक प्रश्न विधानसभेत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने या अधिवेशनात खुद्द सभापती प्रतापसिंग राणे यांनाच लक्ष्य करण्याचे ठरविले असल्याने राणे विरुद्ध भाजप सदस्य असे चित्रही पाहायला मिळणार आहे. राणे यांचे चिरंजीव तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे सुध्दा विरोधकांकडून लक्ष्य होण्याची चिन्हे दिसत आहेत. विश्वजित यांनी हल्लीच आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदारकीच्या राजीनाम्यानंतरही त्यांचे मंत्रिपद कायम आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच विश्वजित यांनी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळावरून केलेल्या शेरेबाजीवरून विरोधी भाजप सदस्य त्यांना सभागृहात लक्ष्य करणार असे दिसते.
दिगंबर कामत सरकारला अनेक आघाड्यांवर आलेले अपयश विरोधकांसाठी सध्या प्रभावी मुद्दा ठरला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या वित्त, खाण, अबकारी या खात्यांनी निष्क्रियतेची पातळी गाठली असल्याने विरोधकांनी त्यांनाही कोंडीत पकडण्याची जोरदार तयारी केली आहे. सभापतींकडे गेल्या बऱ्याच काळापासून दाखल करण्यात आलेल्या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत याचिका कोणत्याही ठोस निर्णयाविना पडून असल्याने विरोधकांनी तोही विधानसभा अधिवेशनातला मुद्दा बनवला आहे. अधिवेशनाची वेळ सकाळच्या सत्रात ११.३० ते दुपारी १ व नंतरच्या सत्रात दुपारी २.३० ते साधारणतः सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. गृहमंत्री रवी नाईक हे आजारी असल्यामुळे सध्या मुंबईत आहेत. अशावेळी उद्या ते अधिवेशनात उपस्थित राहतील की नाही, याबद्दल शंका आहे.

No comments: