भाजपच्या मेळाव्यात इशारा
पणजी, दि.१८ (प्रतिनिधी) - मागासवर्गीयांच्या आरक्षणाविषयीच्या ठरावाची अंमलबजावणी लवकरात लवकर न केल्यास विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी लाखो मागासवर्गीयांचा विराट मोर्चा विधानसभेवर नेण्यात येणार असल्याचा खणखणीत इशारा फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी भाजपच्या "मागासवर्गीय विभाग' मेळाव्यात आरक्षणविषयी ठराव मांडताना दिला. स्वतःला बहुजन समाजाचे नेते म्हणवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आजपर्यंत या समाजाची केवळ ढाल म्हणूनच वापर केला आहे. विधानसभेत बहुजन समाजाच्या हितासंदर्भात गेल्या २ ऑगस्ट रोजी विधानसभेत आपण मांडलेल्या ठरावाला पाठिंबा देण्याचे सोडून खुर्चीवर बसून राहणारे कॉंग्रेस नेते बहुजनांचा विकास तो काय करणार, असेही आमदार नाईक यांनी म्हटले. बहुजन समाजातील मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण मिळणे हा घटने प्रमाणे आमचा हक्क आहे. कॉंग्रेस राजवटीत रस्त्यावर आल्याशिवाय हक्क मिळत नाही. म्हणून बहुजन समाजाने आपल्या हक्कासाठी संघटित होऊन रस्त्यावर येणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आज पणजी येथे हजारो बहुजन समाजातील बांधवांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या "मागासवर्गीय विभागा'चे उद्घाटन उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करून आरक्षणाचा ठराव घेण्यात आला. सदर ठरावाला कुंदा चोडणकर, मयेचे आमदार अनंत शेट, उदय डांगी, संजय हरमलकर, आणि माजी सभापती विश्वास सतरकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, गोविंद पर्वतकर, नरहरी हळदणकर, पक्षाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, दिलीप परूळेकर, अनिल होबळे, मुक्ता नाईक, उल्हास अस्नोडकर, मनोज कोरगावकर, नवनाथ नाईक, अशोक नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार नाईक म्हणाले, की बहुजन समाजाचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही. आज गोवा मुक्त होऊन अनेक वर्ष उलटली परंतु बहुजन समाजाचा म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही. म्हणूनच आज जागे होण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्ष बहुजन समाजाच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यास कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले. घटनेतील अधिकार आम्हाला मिळायलाच हवा, आम्हाला भीक नको. विद्यमान सरकार हे समाजाला लाचार करणारे सरकार असल्याने आम्ही एकत्र येणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. पक्षाध्यक्ष प्रा.पार्सेकर यांनी कॉंग्रेस पक्षावर टीकेचे अस्त्र सोडताना म्हटले, की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना थोतांड म्हणून हिणवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष जनतेत पक्षाचा विस्तार करत असतो तर कॉंग्रेस पक्षाचे नेते आपल्याबरोबर आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना राजकारणात आणून आपल्या कुटुंबाचा विस्तार करीत आहेत. दिल्लीत घराणेशाही आणि आता राज्यातही घराणेशाही करण्याचा प्रयत्न हा पक्ष करत आहे. १९ जमातींचा समावेश असणाऱ्या मागासवर्गीय समाजाला घटनेप्रमाणे मिळणारे हक्क देण्यास टाळाटाळ करत असलेला कॉंग्रेस पक्ष मागासवर्गीयांचे हित ते कसले पाहणार. असेही त्यांनी म्हटले. आमदार दयानंद मांद्रेकर यांनी आपल्या खास शैलीत विश्वजित राणेवर खरपूस टीका करीत येणाऱ्या काळात आमच्याच हक्कांसाठी खूप आंदोलन करावे लागेल, असे सांगितले. अनिल होबळे व महादेव नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद पर्वतकर यांनी केले.
Monday, 19 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment