Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 July 2010

पंचवाडीत खाण प्रकल्प होऊ देणार नाही

पंचवाडी बचाव समितीचा निर्धार

पणजी , दि.१८ (प्रतिनिधी)- निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आमच्या सुंदर अशा गावावर,आमच्या सुपीक शेतावर आक्रमण करून आम्हाला देशोधडीला लावू पाहणाऱ्या खाण प्रकल्पाचे काम बंद व्हायलाच हवे. प्रसंगी मरण पत्करू पण पंचवाडीत "वेदांत' चा खाण प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार पंचवाडी बचाव समितीने आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. येथील मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला पंचवाडी चर्चचे फादर लॉरेन्स रॉड्रिगीस ,पंचवाडी बचाव समितीचे अध्यक्ष ख्रिस्तो डिसोझा, माजी सरपंच व विद्यमान पंच लिना डिकॉस्ता, समिती उपाध्यक्ष क्लेफी सोझा, नाझारेथ गुदिन्हो व सचिव दुर्गेश शिसानी व्यासपीठावर हजर होते.
सुंदर अशा पंचवाडी गावचा विध्वंस करण्यासाठी राजकारणी आणि खाण मालक पुढे सरसावले आहेत .जनतेने सावध राहून त्यांना विरोध करायला हवा. पंचवाडीचे अस्तित्व नाहीसे करणारा खाण प्रकल्प पंचवाडीत नको, असे फादर लॉरेन्स रॉड्रिगीस यांनी निर्धाराने सांगितले.
या प्रकल्पाच्या विरोधासाठी प्राण देईन पण प्रकल्प होऊ देणार नाही असे सांगून माजी सरपंच व विद्यमान पंच लिना डिकॉस्ता यांनी वर्षाला दोन पिके घेणारी आमची सुपीक जमीन आम्ही सोडणार नाही .भूमिपुत्रांवर अन्याय करणे सरकारने बंद करावे .पंचवाडीच्या लोकांना जे हवे तेच पंचवाडीत होईल असे त्या म्हणाल्या.
समितीच्या उपाध्यक्ष क्लेफी सोझा यांनी खाण कंपनीच्या माणसांनी चालवलेली गुंडगिरी त्वरित रोखण्याचा इशारा दिला. नपेक्षा गंभीर परिणाम होतील असे त्यांनी सांगितले. बायका मुलांना मारहाण करून गावात दहशत माजवली जात असल्याचे सांगून पोलीस त्यांना सामील झाल्याचे आरोप त्यांनी केला व मुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखावे असे सांगितले.
सचिव दुर्गेश सिसानींचा इशारा
मुख्यमंत्री व राज्यपाल यांना या प्रकल्पा बाबत एका वर्षापुर्वी निवेदन देऊन सुध्दा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगून समिती सचिव दुर्गेश शिसानी यांनी चर्च व मंदिर समिती एकत्र येऊन हा लढा लढत असल्याचे सांगून आम आदमीचे सरकार म्हणणारे सत्ताधारी भ्रष्ट बनल्याचे प्रतिपादन केले.झुवारी नदीकिनाऱ्यावरील खारफुटी झाडे कापण्याचे प्रकार वन खात्याच्या निदर्शनास आणूनही त्यावर कारवाई होत नसल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा भेटून पाहणार व त्यानंतर हा लढा तीव्र करणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारने या प्रकरणात त्वरित लक्ष घालून हा प्रकल्प बंद करावा व आम्हाला न्याय द्यावा तसेच गावात चाललेली खाण कंपनीची गुंडगिरी रोखावी नपेक्षा आम्ही ठोशास ठोसा देऊ व कायदा हातात घेऊ. असे सांगून क्लेफी सोझा म्हणाले, सरकारला जर आमचे रक्तच सांडलेले पहायचे असेल तर त्यालाही आम्ही तयार असून यापुढे हा लढा हिंसक होण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी पंचवाडीच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होत्या.
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी आपल्या समितीला पाठिंबा दिला असल्याचे यावेळी डिसोझा यंानी सांगितले.

No comments: