Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 23 July 2010

म्हापशात लक्ष्मीनारायण मंदिरात ५ लाखांची चोरी

म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधीऔ): शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरल्याची तक्रार म्हापसा पोलिसात नोंदवण्यात आली आहे. मूर्तींच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्या चोरट्यांनी लंपास केले.
याविषयी म्हापसा पोलिस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी माहिती देताना सांगितले की, काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश केला. मंदिराच्या लोखंडी दरवाजाच्या कुलपाचे गज तोडून त्यांनी गर्भकुडीत प्रवेश केला. श्री लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीवर असलेला लक्ष्मीहार, बांगडी, सोनसाखळी, दोन बाजूबंद, दोन जानवी आदी सोन्याच्या वस्तूंसह चांदीचे चार मुकुट, एक गदा, अभिषेकाचे पात्र, पंचारती, कापराचे पात्र, लक्ष्मी आणि नारायणाचे (महादेव) मुखवटे, उत्सवमूर्ती व रोख रुपये तीन हजार चोरट्यांनी लंपास केले. याची किंमत सुमारे पाच लाख असल्याचे पुरुषोत्तम भोबे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देवस्थानात येऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काहीच फायदा झाला नाही. ठसेतज्ज्ञांच्या साह्याने ठसे घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
म्हापसा पोलिस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या मंदिरात झालेल्या चोरीमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मंदिरांच्या अध्यक्षांची बैठक बोलावून मंदिरांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेण्याची सूचना केली होती.

No comments: