मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणात सध्या गुन्हा अन्वेषणाच्या ताब्यात असलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी येथील प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी फर्मावली.
त्यामुळे ते आता १४ दिवस पोलिस कोठडीत राहिल्यासारखे होणार आहे. त्यांनी पोलिस कोठडी चुकविण्यासाठी केलेले सर्व सनदशीर मार्ग निरर्थक ठरले आहेत. गेल्या शुक्रवारी दिल्या गेलेल्या ४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना न्या. केरकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याप्रसंगी सरकारी वकील सुनिता गावडे यांनी युक्तिवाद केला. मिकी यांना आणखी ४ दिवस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. ते चौकशीस सहकार्य देत नाहीत, त्यांच्याकडून हस्तगत करावयाच्या वस्तूंचा थांगपत्ता लागलेला नाही व त्यांची चौकशी या प्रकरणाच्या एकंदर उलगड्यासाठी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी प्रतिपादिले.
मिकींचे वकील अमित पालेकर यांनी, गेले अकरा दिवस ते कोठडीत आहेत. पुरेशी चौकशी झालेली असल्याने त्यांना आणखी पोलिस कोठडी देऊ नये. वाटल्यास एका दिवसाची न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती केली. मात्र न्यायाधीशांनी ती अमान्य करून आणखी ३ दिवस कोठडी फर्मावली. त्यामुळे गुन्हा अन्वेषणाने सुरवातीस जी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती ती पूर्ण झाल्यासारखे होणार आहे.
या न्यायालयाने प्रथम त्यांना सात व नंतर चार दिवसांची कोठडी फर्मावली होती. काल मिकींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे गुन्हा अन्वेषणाला आज कोठडीतील रिमांड वाढवून मिळेल अशी आशा वाटत होती. ती खरी ठरली.
Wednesday, 21 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment