पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): कामगार संघटनेचा सकाळी महागाईच्या विरोधातील संप आणि सायंकाळी राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त पणजी शहरात काढण्यात आलेल्या रॅलीच्यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिसांना पूर्णपणे अपयश आले. चर्च स्क्वेअर, सांतीनेझ, रुअ द औरेम रस्ता, मुख्य रस्ता असलेला १८ जून मार्ग, महात्मा गांधी मार्ग, डी.बी.मार्ग तसेच पणजी बसस्थानकावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता.
पणजीत सध्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे, त्यात स्थानिक रहिवासी आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे एरव्हीच वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसतो. वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले परंतु, प्रशिक्षण न घेतलेले अनेक वाहतूक पोलिस चक्क रस्त्याच्या बाजूला उभे राहून मजा पाहत असतात. बहुतेक रस्ते आधीच वाहतुकीने भरलेले असतात, अशावेळी अन्य रस्त्यांचा वापर करण्यासाठी वाहनचालक मांडवी किनाऱ्यावरून जाणारा रस्ता पसंत करतो. आज मात्र सकाळी कामगारांचा प्रचंड मोर्चा आणि संध्याकाळी ऐन वाहतुकीच्या वर्दळीवेळी राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त आगमन झालेली क्वीन्स बॅटनची मिरवणूक यामुळे राजधानीच वेठीस धरण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. सगळ्यांच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहने एकाच जागी अडकली होती. या सर्व गदारोळात वाहतूक पोलिस मात्र गायब झाले होते. प्रशासन नावाची चीज या राज्यात आहे, असे वाटतच नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया खुद्द राजधानीत जनता व्यक्त करीत होती, तर नेते मात्र "आपण या गावचेच नाही' अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांत मश्गूल होत जिवाचा गोवा करीत असलेले दिसले!
Wednesday, 8 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment