मडगावातील जाहीर सभेत श्रीपाद नाईक यांचे आवाहन
मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : आम आदमीच्या अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणून सत्तापिपासू कॉंग्रेसवाल्यांना धडा शिकवा, असे जोरदार आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी आज मडगाव येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना केले.
केंद्रातील असो वा गोव्यातील असो कॉंग्रेस पक्ष तोंडाने आमआदमीच्या कल्याणाचे गोडवे गातो. प्रत्यक्षात त्या पक्षाचा एकूण एक कार्यक्रम आम आदमीला संपवणारा असल्याची घणाघाती टीकाही नाईक यांनी केली.
ते म्हणाले, कॉंग्रेस सरकारचा आजवरचा इतिहास पाहिला तर जेव्हा हा पक्ष सत्तेवर आला तेव्हा दरवेळी महागाई गगनाला भिडली. देशाची घसरगुंडी सुरू झाली. पंतप्रधान चलनवाढ रोखल्याचे व अन्य दावे करतात पण महागाई का वाढली ते सांगत नाहीत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या अर्थतज्ज्ञाला देशातील महागाई रोखता येऊनये ही दुर्दैवी बाब आहे. यासंदर्भांत त्यांनी जनता पक्ष व भाजप राजवटीत स्थिर असलेले अत्यावश्यक जिनसांचे दर कॉंग्रेस सरकार सत्तेवर येताच कसे वाढले त्याचे उदाहरण दिले. त्यावरून हे नेते आणि महागाई निर्माण करणारे यांचे साटेलोटे आहे हेच दिसून येते, असे सांगितले.
त्यांनी काश्मीरप्रश्र्नाचा उल्लेख केला व सांगितले देशासमोरील आजच्या या समस्येस पं. नेहरू कारणीभूत आहेत. वल्लभभाई पटेल यांनी अन्य संस्थानांबरोबर काश्मीरही खालसा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण नेहरूंनी काश्मीर त्यापासून वेगळे ठेवले. त्यामुळे गेली ६१ वर्षें ती समस्या देशाला सतावत आली आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांच्या नावाने चालू असलेल्या लूटमारीचे उदाहरण देऊन सांगितले, कॉंग्रेसला सत्ता व धन संपादन याखेरीज दुसरे काहीच दिसत नाही. जे दिल्लीत तेच गोव्यात सुरू आहे. गोव्याची वाटचाल घराणेशाहीकडे वळविण्याचे काम त्या पक्षाने हाती घेतले आहे. काही नेते आपल्या घरातील इतरांना निवडणुकीत उभे करण्यासाठी करीत असलेल्या धडपडीकडे लक्ष वेधले. सत्तरीत तब्बल सदतीस वर्षें एकछत्री राजकारण करणाऱ्या नेत्याला तेथे एकदेखील नाव घेता येण्यासारखा प्रकल्प उभारता येऊ नये यावरून या मंडळींचे राजकारण लोकांसाठी नव्हे तर स्वतः पुरते मर्यादित असल्याचे स्पष्ट होते असा दावा नाईक यांनी केला.
Monday, 6 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment