पाशेकोंचा साफ इंकार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो आत्महत्या प्रकरणात होरपळून निघालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको हे नव्या वादात सापडले असून बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि हवाला व्यवसायात गुंतल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाणावली मतदारसंघात खळबळ माजली आहे. दरम्यान, मिकी पाशेको यांनी आपण कोणत्याही बेकायदा प्रकारात गुंतल्याचा इन्कार करताना आपल्या राजकीय विरोधकांचा हा कट असल्याचा आरोप पत्रकात केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने भारत सरकारला मिकींच्या व्यवहाराविषयी एक अहवाल सादर केला आहे. त्यात त्यांनी पाशेको हे बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि सावकारी व्यवसायातील जागतिक टोळीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आला असून केंद्र सरकारने हे प्रकरण प्राथमिक चाचणीसाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले आहे. तसेच, मिकी पाशेको यांनी विदेशी बॅंकांद्वारे केलेल्या पैशांच्या उलाढालीची कागदपत्रेही "सीबीआय'च्या ताब्यात देण्यात आली आहेत. म्हापसा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिवेशन भरलेले असतानाच याविषयीचे एका वृत्त राष्ट्रीय वर्तमानपत्रावर झळकले आहे.
दरम्यान, मिकी पाशेको यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केलेले आरोप फेटाळून लावले असून आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. "मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. माझी बॅंक खाती पारदर्शक आहेत, ती कोणतीही तपास यंत्रणा पाहू शकतात. ज्या वर्तमानपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे ते पाहून मला धक्का बसला आहे. पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर तिची "समुद्री कामगार संस्था' ही मी चार वर्षापूर्वीच सोडलेली आहे' असा दावा मिकी पाशेको यांनी केला आहे. तसेच आपण कोणालाही बनावट कागदपत्रांद्वारे नोकरीसाठी विदेशात पाठवलेले नाही, असेही मिकी पाशेको यांनी सांगितले.
श्री. पाशेको यांनी सांगितले की, "सारा' ही "ओव्हरसिस मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने ही कंपनी चालवत होती. तिच्याकडे अजुनीही या कंपनीचा परवाना आहे की नाही, हे सिद्ध मला माहीत नाही. तसेच ती या कंपनीद्वारे अजुनीही लोकांना विदेशात पाठवते हीही आपल्याला माहीत नाही. या कंपनीची १९९६ मध्ये स्थापना झाली होती. ही कंपनी तरुणांना जहाजावर नोकरीला ठेवण्यासाठी कार्यरत होती. काही वर्षापूर्वी आम्ही दोघेही वेगळी झाल्यानंतर मी या कंपनीशी कोणताही संबंध ठेवला नाही, असे स्पष्टीकरण श्री. पाशेको यांनी पुढे दिले.
व्याजाद्वारे लोकांना पैसे पुरवण्याच्या सावकारी व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेतील एका बॅंकेत आपल्या नावावर १.५० कोटी डॉलर आहेत. त्यातील २ लाख डॉलर काही महिन्यांपूर्वी भारतात बॅंकेत जमा केले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणतीही मोठी रक्कम नाही. असल्यास मी ते सिद्ध करण्यासाठी खुले आव्हान देतो, असे ते म्हणाले. विदेशात असलेले काही कामगार आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी या बॅंक खात्याचा वापर करीत होते. ते पैसे मी गोव्यात काढून त्यांच्या कुटुंबीयांना देत होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
अमेरिकेच्या विविध विमानतळावर गोव्यातील नागरिकांना बनावट कागद पत्राद्वारे प्रवेश केल्याने अटक केल्यानंतर ही बाब उजेडात आल्याचे म्हटले आहे. या लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाशेको यांनी मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या संस्थेने म्हटले आहे.
Monday, 6 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment