पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) ः म्हापसा येथील नवीन जिल्हा इस्पितळात उद्या ९ सप्टेंबरपासून स्त्रीरोग व बालरोग विभागाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने जाहीर केली आहे. भाजपकडून जिल्हा इस्पितळाचा विषय आक्रमकपणे पुढे रेटण्यात आल्यानंतर व जुन्या आझिलो इस्पितळाच्या दयनीय अवस्थेची खातरजमा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केल्यानंतर अखेर नव्या जिल्हा इस्पितळ इमारतीत काही विभाग हलविण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या जिल्हा इस्पितळांत स्त्रीरोग व बालरोग बाह्य रुग्ण विभाग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. हे विभाग नव्या जिल्हा इस्पितळात सुरू केले असले तरी म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील बाह्य रुग्ण विभाग पूर्वीच्या वेळेनुसार कार्यरत असेल. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सुरुवातीला भाजपकडून झालेल्या मागणीला धुडकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु या विषयावरून भाजपने तीव्र आंदोलनाची तयारीच सुरू केल्याने अखेर नव्या जिल्हा इस्पितळाला मुहूर्त सापडला आहे.
Thursday, 9 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment