Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 September 2010

गणा धाव रे...

आज श्रीगणेशाचे आगमन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) उत्सवप्रिय गोमंतकीय जनता श्री गणरायाच्या आगमनासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा मात्र मंगलमूर्तीच्या स्वागतावेळी "गणा धाव रे, मला पाव रे' असा धावाच करण्याची वेळ गोमंतकीय जनतेवर ओढवलेली आहे. उद्या ११ रोजी राज्यात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात प्रारंभ होत आहे. राज्यात दीड, पाच, सात, नऊ, अकरा व काहीठिकाणी एकवीस दिवस श्री गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. घरोघरी श्री गणेशपुजनासह विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांचीही रेलचेल या दिवसांत राहणार आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरी भाग काही दिवस ओस पडणार आहेत. चाकरमानी लोक व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेली मंडळी हा सण साजरा करण्यासाठी आपल्या गावांकडे निघाले आहेत. या सणाची खरी मजा ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, आर्थिक मंदीमुळे अनेकांवर ओढवलेली बेकारीची कुऱ्हाड, अनेक वर्षे नोकरीत कायम होणार या एका आशेने राबणारे कंत्राटी कामगार, बेदरकार खाण व्यवसायामुळे विध्वंसाच्या उंबरठ्यावरील असलेले लोक, विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी अपरिमित हानी अशा अनेक संकटांना सामोरे जाताना सर्वसामान्य जनता या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी गणरायाला विनवणीच करणार आहेत.
जीवनात कितीही संकटे असली किंवा दुःख असले तरी या सणाच्या निमित्ताने ती काही काळ का होईना, पण बाजूला सारून भक्तमंडळी आपल्या भविष्याची संपूर्ण मदार श्री गणरायावरच टाकतात.प्रत्यक्ष देव आपल्या घरी पाहुणा म्हणून राहायला येतो, या भावनेने प्रत्येकजण यथाशक्ति आपल्या कुवतीनुसार देवाची भक्ती करतात व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थनाही करतात. या गणेशोत्सवाच्या उत्सवामुळे धार्मिक सलोख्याचेही चित्र आपल्याला पाहायला मिळते.हिंदूंच्या या सणाला ख्रिस्ती तथा मुस्लिमबांधवही भेट देतात व या आनंदात सामील होतात.अनेक हिंदू या सणाच्या निमित्ताने फराळ व इतर खाद्यपदार्थ आपल्या ख्रिस्ती व मुसलमानबांधवांना पोहचवत असतात. हा आवडता सण राज्यभरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणार असल्याने या काळात बहुतांश व्यवहार व सरकारी कामकाजालाही काही काळ विश्रांती मिळणार आहे.

No comments: