प्रतिमहिना एक हजार रुपये
पणजी, दि.१० (प्रतिनिधी): राज्यातील मोटरसायकल पायलट व त्यांच्या कुटुंबीयांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना समाज कल्याण खात्यातर्फे जनतेच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आली आहे.या सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक अधिकृत मोटरसायकल पायलटांना एक हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक साहाय्य देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे.
राज्य समाज कल्याण खात्याचे संचालक एन.बी.नार्वेकर यांनी जनतेच्या माहितीसाठी ही योजना सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या व खात्याने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक मोटरसायकल पायलट या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेअंतर्गत मोटरसायकल पायलटाची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. दुचाकी मोटरसायकल चालवण्याचा अधिकृत परवानाधारक व परिवहन खात्याकडून पिवळा-काळा टॅक्सी बॅंच प्राप्त झालेला व केवळ मोटरसायकल पायलटचा स्वयंरोजगार करणारी व्यक्तीच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बचत खात्यात जमा केली जाईल.
या योजनेसाठी पात्र मोटरसायकल पायलट हा किमान १५ वर्षे गोव्यात वास्तव्य करणारा असावा, या मोटरसायकल पायलटाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.५० लाख रुपयांवर असता कामा नये, या योजनेसाठी अर्ज करताना मोटरसायकल पायलटाचे वय ५० वर्षे पूर्ण असावे,या योजनेअंतर्गत अर्ज करणारा मोटरसायकल पायलट कोणत्याही बेकायदा व्यवहारात गुंतलेला असता कामा नये, अर्जदार किमान पाच वर्षे मोटरसायकल पायलट व्यवसायात असणे गरजेचे आहे, मोटरसायकल पायलटाच्या नावे दुचाकीची नोंदणी व अधिकृत मोटरसायकल परवाना बॅच किमान पाच वर्षांचा असावा,प्रत्येक अर्जदार मोटरसायकल पायलट हा मोटरसायकल टॅक्सी संघटनेचा अधिकृत सदस्य असणे बंधनकारक आहे व ही संघटना सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत अधिकृत नोंदणीकृत असावी, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा मोटरसायकल पायलट हा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी असता कामा नये तसेच तो राज्य किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचाही लाभार्थी असता कामा नये,असेही या योजनेच्या अटींत नमूद करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला अधिकृत अर्ज संबंधित तालुका गट विकास अधिकाऱ्यांमार्फत समाज कल्याण खात्याच्या संचालकांकडे देण्याची गरज आहे.या अर्जासोबत तालुका मामलेदारांकडून प्राप्त वास्तव्य दाखला,उत्पन्न दाखला,जन्म दाखला,रेशनकार्ड प्रत,निवडणूक ओळखपत्र प्रत,पिवळी-काळी दुचाकीची मालकी व इतर संबंधित कागदपत्रे, वाहन चालक परवाना व मोटरसायकल पायलट बॅच, बचत खाते पासबुकची प्रत आदी दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल व पात्र अर्ज समाज कल्याण खात्याकडे सुपूर्द केले जातील.
Saturday, 11 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment