"कदंब'च्या अपघातग्रस्त चालकाच्या पत्नीचा करुण सवाल
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - ड्युटी संपल्यानंतर पुन्हा जबरदस्तीने ड्युटीवर पाठवल्यावर अपघातग्रस्त झालेल्या माझ्या पतीला कामगार न्यायालयाने पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश देऊनही कदंब महामंडळ त्याला कामावर परत घेत नसल्याची कैफियत संबंधित चालकाची पत्नी सौ. शिल्पा औदुंबर नार्वेकर यांनी आज येथे मांडली. काळीज पिळवटून टाकणारी त्यांची दर्दभरी कहाणी ऐकताना पत्रकारही गलबलून गेले.
गेली अडीच वर्षे मी न्यायालयाची पायरी झिजवत आहे. न्यायालयात येण्यासाठी आता माझ्याकडे पैसेच नाहीत.आमची उपासमार सुरू आहे. दोघा लहान मुलांना आता खायला काय घालू? मी संसार कसा करू? माझ्या नवऱ्याला नोकरीवर परत घेऊन मला त्वरित न्याय द्या, अशी कळकळीची विनवणी सौ. शिल्पा यांनी केली. आम्ही "कदंब' महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामगारविरोधी निर्णयाचा बळी ठरलो आहोत, असा आरोप त्यांनी कामगार न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औदुंबर नार्वेकर हा "कदंब'मध्ये बदली पद्धतीवर ड्रायव्हर म्हणून सेवेत होता. अडीच वर्षापूर्वी तो आपली ड्युटी संपवून गाडीवरून उतरला. मात्र कदंबच्या अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा ड्युटीची सक्ती केली . पुन्हा ड्युटीवर गेल्यानंतर तो चालवत असलेल्या कदंब बसला अपघात झाला. संतापाची बाब म्हणजे त्यानंतर त्याला कामावरून चक्क काढून टाकण्यात आले.आपण त्याला डबल ड्युटीची सक्ती केली होती याचेही भान कदंबच्या अधिकाऱ्यांनी उरले नाही. या अन्यायाविरुद्ध औंदुबर नार्वेकर यांची पत्नी सौ. शिल्पा यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला असता, कामगार न्यायालयाने औंदुबर नार्वेकर याला नोकरीत पुन्हा घेण्याचा निवाडा दिला. मात्र कदंब महामंडळाने त्यांना नोकरीत न घेता वरच्या न्यायालयात दाद मागितली. तेव्हापासून आजपर्यंत सौ. शिल्पा औंदुबर नार्वेकर न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने वर्तमानपत्रांना बातमी दिली नव्हती; पण आता आपण नाईलाजाने पत्रकारांसमोर आपले दुःख उघड करीत आहोत. सरकारने मला त्वरित न्याय द्यावा, मला जगणेच मुश्कील झाले आहे, अशी व्यथा शिल्पा नार्वेकर यांनी डोळ्यांत आसवे आणत मांडली.
दरम्यान, पाच वर्षे सेवा केलेल्या कदंबच्या बदली ड्रायव्हरना कायम करण्याची हमी कामगार न्यायालयाला कदंब व्यवस्थापनाने दिली होती. मात्र व्यवस्थापनाने अजूनही आपला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षे सेवा बजावलेले ६७ अन्यायग्रस्त ड्रायव्हर कदंबविरोधात आमरण उपोषणाला बसण्याच्या बेतात आहेत. नार्वेकर यांच्यावर कदंबच्या अधिकाऱ्यांमुळे ओढवलेली ही जीवघेणी आपत्ती म्हणजे इरसाल कारभाराचा नमुनाच ठरली आहे. मुख्यमंत्री व इतर कॉंग्रेसजन उठता - बसता आम आदमीच्या नावाचा जप करत असतात. प्रत्यक्षात आम आदमीला भिकेला लावण्याचे तंत्रच या सरकारने अवलंबल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Thursday, 9 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment