Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 6 September 2010

आजचा "बस बंद' लांबणीवर

तोडगा न निघाल्यास १ ऑक्टो.पासून बेमुदत बंद

मडगाव,दि. ५ (प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी गोवा बसमालक संघटनेने पुकारलेला उद्याचा संप आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. तोपर्यंत आपल्या मागण्यांवर योग्य तोडगा निघाला नाही तर १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज बसमालक संघटनेला वाटाघाटींसाठी पाचारण केले असता एका शिष्टमंडळाने त्यांच्या मालभाट येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून होणारी छळणूक, कदंबला मिळणाऱ्या सवलती व आणखी मार्गांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा यांचा समावेश होता.
बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले व आपण यापूर्वीच वाहतूक संचालक अरुण देसाई यांना संपूर्ण माहिती सादर करण्याची सूचना केली आहे; ती येताच त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. तसेच योग्य तो न्याय दिला जाईल, असे सांगितले. २७ रोजी बसमालक, वाहतूक मंत्री, वाहतूक संचालक यांची संयुक्त बैठक बोलावून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यावर विसंबून उद्याचा बस बंद २७ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र २७ रोजी तोडगा निघाला नाही तर १ ऑक्टोबर पासून बसवाले बेमुदत संपावर जातील असे ताम्हणकर यांनी जाहीर केले.
संघटनेने बंदची नोटीस पुरेशी अगोदर दिली असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत तोडग्याबाबत प्रतीक्षा करण्याच्या पद्धतीसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही आज रात्री ८ वाजता बैठक बोलावली आहे. संघटनेचे सुमारे ६०० सदस्य आहेत. सदस्य नसलेलेही काही बसवाले आहेत. ते काही मंत्री अथवा वाहतूक अधिकारी यांचे मिंधे असल्याने ते सरकारविरुद्ध पवित्रा घेऊ शकत नाहीत; पण याचा अर्थ संघटनेत फूट पडली असा होत नाही. भीती वा दडपण या कारणास्तव त्यांना बसेस सुरू ठेवणे भाग असते. तरी पण बसमालकांवरील अन्याय व छळवाद दूर करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्रित राहणे गरजेचे आहे. शेवटचा पर्याय म्हणून बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतला होता, त्यामागे कोणाचा व्यक्तिगत व्देष वा राग नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. शैलेंद्र फळदेसाई व कृष्णनाथ देसाई हेही यावेळी हजर होते.

No comments: