मुंबई, दि. ६ - अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या पहिल्या अणुचाचणीला दिशा देणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होमी एन. सेठना यांचे प्रदीर्घ आजारानंतर काल रात्री त्यांच्या मलबार हिलस्थित निवासस्थानी निधन झाले.
होमी सेठना ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. काल रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सेठना यांच्या पार्थिवावर उद्या डोंगरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९५९ मध्ये ट्रॉम्बे येथे भारतातला पहिला प्ल्यूटोनियम प्रकल्प स्थापन करण्यात अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंते असलेल्या सेठना यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईत दाखल होण्यापूर्वी सेठना केरळमधील इंडियन रेअर अर्थचे संचालकही होते.
होमी सेठना १९८४ मध्ये अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९८९ ते २००० या काळात त्यांनी टाटा पॉवर कंपनीचे अध्यक्षपद भूषवले होते. टाटा सन्स, बॉम्बे डाईंग आणि इतर अनेक नामांकित कंपन्यांचे ते संचालक होते. १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे "स्माईलिंग बुद्ध' या नावाने घडवून आणलेल्या पहिल्या अणुस्फोटाच्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्यांचे अतुलनीय योगदान होते.
सेठना यांना पद्मविभुषण हा देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पी. के. अय्यंगार यांनी सेठना यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सेठना हे अत्यंत गुणवान आणि स्फुर्तीदायक अभियंते होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेकवेळा धोका पत्करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. प्रकल्प सुरळीतपणे चालावा यासाठी त्यांनी कधीही नोकरशाहीच्या निर्णयाची वाट बघितली नाही, असे गौरवोद्गार अय्यंगार यांनी सेठना यांना श्रद्धांजली अर्पण करताना काढले.
Tuesday, 7 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment