Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 September 2010

अटालाविरुद्ध आता "रेड कॉर्नर' नोटीस

पणजी,दि.४(प्रतिनिधी) - पोलिस, ड्रग माफिया आणि राजकारणी यांच्या साटेलोटे प्रकरणातील मुख्य संशयित व सध्या फरारी असलेल्या अटाला याच्या शोधासाठी गुन्हा विभागाने आज "रेडकॉर्नर' नोटीस जारी केली. या नोटिशीत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ व इंटरपोलला सतर्क करण्यात आले असून अटाला सापडल्यास त्याला तात्काळ पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यात गाजत असलेल्या ड्रग प्रकरणातील मुख्य संशयित अटाला याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याऱ्या गुन्हा विभागाच्या हलगर्जीपणामुळे अटाला बेपत्ता झाला असून त्यामुळे सरकारची अत्यंत नाचक्की झाली आहे. दरम्यान, अटाला याच्या बेपत्ता होण्यामागे पोलिस फितूर असल्याचा आरोप विरोधी भाजप व इतर संघटनांनी केला आहे. गृहमंत्री रवी नाईक यांना तर हा विषयच फारसा गंभीर वाटन नसल्याचे त्यांच्या यासंदर्भातील वक्तव्यावरून दिसून आले होते.
या प्रकरणाची चौकशी करणारे गुन्हा विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर हे टीकेचे लक्ष्य बनले आहेत. दरम्यान, अटालाच्या जामिनासाठी ठेवण्यात आलेली ५० हजार रुपयांची अनामत रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तथा अटालाची माजी प्रेयसी लकी फार्महाऊस हिने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गोव्यात येऊन जबानी देण्याची तयारी दर्शवली; होती परंतु अद्याप ती फिरकली नसल्याने आता स्वीडनला जाऊन तिची जबानी घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारकडून यासंबंधीची मान्यता मिळाली असून केवळ स्वीडन पोलिसांची परवानगी मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत साळगावकर यांनी दिली.

No comments: