Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 September 2010

कुराण जाळण्याचा निर्णय अखेर धर्मगुरुंकडून मागे

वॉशिंग्टन, दि. १० : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ फ्लोरिडातील एका लहान चर्चचे धर्मगुरू यांनी ११ सप्टेंबर रोजी पवित्र कुराणाच्या प्रतीचे दहन करण्याचे प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.
न्यूयॉर्कमधील ग्राऊंड झिरो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे हे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हे आंदोलन अन्यत्र नेण्याचे जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी धर्मगुरु टेरी जोन्स यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. अशा कृत्यामुळे जगभरात तैनात असलेले आणि विशेषत: मुस्लिम देशांमध्ये असलेल्या अमेरिकी सैनिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो, असे गेट्स यांनी जोन्स यांना पटवून दिले होते.
आता आंदोलन मागे घेतले तरी फ्लोरिडा चर्चचे धर्मगुरु टेरी जोन्स यांची ग्राऊंड झिरो येथे बांधण्यात आलेली मशीद अन्यत्र हलविण्याची मागणी कायम आहे. ही मागणी येथील इस्लामिक सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. मात्र, या आठवड्याअखेर आपण न्यूयॉर्कला जाणार असून मशीद हलविण्याबाबत सेंटरचे अधिकारी अब्दुल रौफ यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे जोन्स यांनी सांगितले.
मशीद हलविण्याच्या जोन्स यांच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असले तरी त्यांनी कुराण जाळण्याचे आंदोलन मागे घेतल्याने जगभरातील विविध देशांचे नेते आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मुस्लिम जगतात अमेरिकेची प्र्रतिमा बदलण्याचा ओबामा प्रशासनाचा प्रयत्न चालू असतानाच अशा घटनांमुळे त्याला तडा गेला असता, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

No comments: