Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 8 September 2010

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हा महाघोटाळा

कमलनाथ-चर्चिल हेच सूत्रधार : पर्रीकर यांचा आरोप
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण हा केंद्रीय मंत्री कमलनाथ व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांनी रचलेला फार मोठा घोटाळा आहे व त्यासाठीच त्याबाबतचे काम हाती घेण्याची त्यांना घाई आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.
आमदार दामोदर नाईक यांच्यासमवेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एरव्ही भाजप महामार्गाच्या बाजूने आहे, परंतु येथे सरकारचा हेतू भलताच असल्याने त्याला विरोधी भूमिका घेणे भाग पडले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गांची गरजच गोव्याला नाही कारण तशी व्यापारी वाहने गोव्यातून जा-ये करीत नाहीत. गोव्यात ज्या वर्गातील वाहने येतात वा जातात त्यांच्या व्यवस्थेसाठी सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण व गरज असेल तेथे बगलमार्गांची उभारणी केली तर प्रश्र्न सुटेल. चारपदरी-सहापदरीची गरजच नाही, पण सध्या सरकारने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकांच्या घरादारांवर नांगर फिरविण्याचे जे सत्र सुरू केले आहे तो कमलनाथ यांनी केलेल्या घाईचाच परिपाक आहे.
कमलनाथ यांनी "सेझ' साठीही अशीच घाई करून गोव्यासाठी डोकेदुखी निर्माण केली होती व जमिनीच्या हस्तांतरातून प्रचंड माया केली होती. सेझ रद्द झाल्यामुळे अर्धवट राहिलेला हेतू साध्य करण्यासाठीच त्यांनी हे महामार्ग रुंदीकरणाचे पिल्लू सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.
महामार्ग प्राधिकरणाने अधिकृतरीत्या गोवा सरकारशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नाही व म्हणून राष्ट्रीय महामार्ग या व्याख्येत बसणारे रस्ते खरोखरच गोव्याला हवेत की काय याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. "बूट' तत्त्वावर तसा मार्ग झाला तर स्थानिक नागरिकांना जबरदस्त टोलच्या रूपाने मोठा फटका बसेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
परवाची बैठक ही सभागृह समितीची बैठक नव्हती, असा दावा पर्रीकर यांनी केला व सांगितले की सभागृह समितीची बैठक ही सभापतींच्या सूचनेवरून विधिमंडळ सचिव बोलावतात तर परवांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रधान मुख्य अभियंत्यांनी बोलावली होती. मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांनी ती सभागृह समितीची असल्याचे सांगून सर्वांचीच दिशाभूल केल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

No comments: