-बॅंक खाती गोठविली
-तीन मोबाईल जप्त
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): माजी मंत्री मिकी पाशेको यांची आज बांबोळी येथील "सीबीआय'च्या कार्यालयात चार तास चौकशी करण्यात आली, तसेच त्यांची बॅंक खातीही गोठवण्यात आली असून तीन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली येथून गोव्यात आलेल्या "सीबीआय'च्या पथकाने ही चौकशी केली.
"सीबीआयला काय चौकशी करायची आहे ती त्यांना करू दे, मला त्यांच्या चौकशीच्या आड यायचे नाही. त्यांना जी काय माहिती पाहिजे होती, ती मी त्यांना दिलेली आहे. यापूर्वीही माझी बॅंक खाती गोठवण्यात आली होती व मोबाईलही जप्त केले होते", असे श्री. पाशेको "सीबीआय'च्या चौकशीला सामोरे जाऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
मिकी पाशेको यांची गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, तर त्यांचे सर्व मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. तसेच, त्याच्या कार्यालयाची झडतीही घेण्यात आली असून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. मिकी पाशेको बनावट कागदपत्रांद्वारे लोकांना विदेशात पाठवण्याच्या रॅकेटमध्ये गुंतल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केल्यानंतर याची सीबीआय मार्फत चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, मिकी बरोबर पेद्रू आन्तानीयो जोयस हा गोव्यात परतला आहे. सारा व मिकी चालवत असलेल्या एका एजन्सी मार्फत २००७ मध्ये तो अमेरिकेत एका जहाजावर नोकरीसाठी गेला होता. परंतु, त्याच्या कागदपत्रांत घोटाळा असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाल लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तसेच तुरुंगात टाकण्यात आले होते.
पेद्रू याने अधिक कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. "मिकी हे आमदार असून तेे सर्वांना मदत करतो. लोकांनी विदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व मदत त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे अनेकांना विदेशात नोकरीला जायला सोयीस्कर झाले आहे. माझा व्हिसा हा "फ्रान्सा ट्रॅव्हल एजन्सी'कडून मिळाला होता' अशी माहिती पेद्रू यांनी दिली आहे.
या एजन्सीचे कार्यालय मिकी यांच्या घराच्या तळ मजल्यावर असून त्या एजन्सीचा परवाना हा सारा या तिच्या पहिल्या बायकोच्या नावावर आहे. २००३ सालापासून ही एजन्सी कार्यरत आहे. श्री. पाशेको यांनी यापूर्वीच आपण ही एजन्सी सोडलेली आहे, असे स्पष्ट केले आहे. तसेच, "सारा' ही अजूनही ही एजन्सी चालवते की नाही, हे आपल्याला माहीत नाही, असेही मिकी यांना म्हटले आहे.
आत्तापर्यंत या एजन्सीच्या माध्यमातून सुमारे २०० जणांना विदेशात नोकरीसाठी पाठवण्यात आले आहे. विदेशातून मागणी असल्यानेच या तरुणांना नोकरीसाठी पाठवल्याचे सीबीआयला दिलेल्या जबानीत सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
Saturday, 11 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment