फसवणूक व लुबाडणुकीचे आरोप
पणजी, दि. ८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्यासह अन्य दोघांवर आज केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने फसवणूक व लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला. तसेच दुपारी बाणावली येथील त्याच्या बंगल्यावर छापा टाकून काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतल्याचे "सीबीआय' च्या प्रवक्त्याने सांगितले. मिकी तसेच पेद्रू आन्तानियो जुवीस व डॅनिएल रेमंड फर्नांडिस यांच्याविरुद्ध भा.दं.सं १२०(ब), ४२० ४६८ व ४७१ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत मिकी पाशेको यांनी २००७ व २००८ साली मुंबई येथील अमेरिकेच्या दूतावासातून बनावट कागदपत्रांद्वारे काही व्यक्तींना जहाजावर नोकरीला पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. जहाजावर पाठवलेल्या त्या व्यक्तींनी मोठी रक्कम देऊन व्हिसा व नोकरीचा परवाना मिळवल्याचेही उघड झाले असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
नादिया प्रकरणानंतर पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ मिकी पाशेको यांच्यावर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात कधीही त्यांनी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि हवाला व्यवसायात गुंतल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केला होता. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने भारत सरकारला मिकींच्या व्यवहाराविषयी एक अहवाल सादर होता. त्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण प्राथमिक चाचणीसाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले आहे. तसेच, मिकी पाशेको यांनी विदेशी बॅंकांद्वारे केलेल्या पैशांच्या उलाढालीची कागदपत्रेही "सीबीआय'च्या ताब्यात देण्यात आली होती. त्यावरून सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा मिकी यांनी स्पष्ट केले आहे. "सारा' ही "ओव्हरसीस मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' या नावाने ही कंपनी चालवत होती. या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये झाली होती. ही कंपनी तरुणांना जहाजावर नोकरीला ठेवण्यासाठी कार्यरत होती, असे स्पष्टीकरण श्री. पाशेको यांनी दिले आहे.
अमेरिकेच्या विविध विमानतळांवर गोव्यातील नागरिकांना बनावट कागदपत्रांद्वारे प्रवेश केल्याने अटक केल्यानंतर ही बाब उजेडात आल्याचे म्हटले आहे. या लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाशेको यांनी मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या संस्थेने केला आहे.
Thursday, 9 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment