Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 September 2010

पर्यटकांना लुटणारी टोळी अखेर अटकेत

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बंदुकीचा धाक दाखवून कळंगुट भागात पर्यटकांना लुटणाऱ्या स्थानिक टोळीला ताब्यात घेण्यात अखेर पोलिसांना यश आले. टोळीतील तिघा जणांना आज अटक केली असून एक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सायंकाळी शिवोली मायणा येथे लपून बसलेल्या या टोळीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल, बंदुकीच्या गोळ्या, चार चाकी व एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. यात पोलिसांनी कल्पेश शिरोडकर (कूंकळ्ळी), मूळ नागालॅंड व सध्या कालापूर येथे राहणारा यान जॉन व राजू देवरा, मडगाव या तिघांनाही अटक केली. तर, मायकल फर्नांडिस हा पळून जाण्यास यशस्वी ठरला. रात्री उशिरापर्यंत त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शिवोली येथे सापळा रचला होता. या स्थानिक टोळीकडे बंदुका असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी या टोळीने चोऱ्या केल्या तसेच दरोडे घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपासून पोलिस त्याच्या माघावर होते. करोडो रुपयांची मालमत्ता या टोळीने लुटल्याचाही दावा पोलिसांनी केली. तसेच, पणजी, म्हापसा, पर्वरी, मडगाव, कोलवा याठिकाणी या टोळीने चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. बेळगाव येथेही दरोडा टाकून १० लाख रुपयांची मालमत्ता चोरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी चोरी करायला फिरण्यासाठी एक ईन्होवा वाहनही या टोळीने खरेदी केले असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार गेल्या २० दिवसांपूर्वी या टोळीने दोन विदेशी नागरिकांना व पुणे येथील एका जोडप्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. त्यानंतर या टोळीला अटक करण्यासाठी खास पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. आज सायंकाळी या टोळीतील काही व्यक्ती कळंगुट येथील एका गेस्ट हाउसमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून अटक केली. दरमहा सोळा हजार रुपये भाडे भरून हे याठिकाणी राहत होते, अशी माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.
गोव्यातील टोळीकडे बंदुका सापडल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. या टोळीकडे सापडलेली बंदूक ही इंदूर मध्य प्रदेश येथून उपलब्ध करण्यात आली होती. तर, कालापूर येथील एका टोळीच्या प्रमुखाने व आगशी येथील मायकल फर्नांडिस यांनी ही बंदूक इंदूर येथून आणले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नॉलास्को रापोझ, आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे, पोलिस शिपाई विनय श्रीवास्तव, दत्ता शिरोडकर व अन्य पोलिस शिपायांचा सहभाग होता.

No comments: