Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 September 2010

पूरग्रस्त निधीचा घोटाळा तर ७५ लाखांचा !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुन्हा आरोप

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - काणकोण पूरग्रस्त मदत निधी प्रकरणात कॉंग्रेस पक्षाचाही हात असून काणकोण पूरग्रस्तांच्या नावावर युवक कॉंग्रेसने सुमारे ७५ लाख रुपयांचा घोटाळा केला असल्याचा दावा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केला. सदर प्रकरण बरेच गाजायला लागले असून पक्षाचे काही पदाधिकारी गोत्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
निधीची रक्कम अद्याप कोणत्याही बॅंकेत जमा करण्यात आलेली नाही. मदत निधी गोळा करण्यासाठी युवक कॉंग्रेसने कुपने छापली होती, त्या पावत्यांवर कोणताही क्रमांक नाही. त्यामुळे यात प्रचंड मोठी घोटाळा झाला आहे. या आरोपावर कॉंग्रेस पक्षाने येत्या चोवीस तासांत खुलासा न केल्यास पोलिस खात्याने याची त्वरित दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी श्री. डिमेलो यांनी केली. पक्षाने परवानगी दिल्यास आपणही स्वतः पोलिस तक्रार सादर करणार असल्याचे श्री. डिमेलो यांनी सांगितले. लोकांनी आपल्या खिशातून पूरग्रस्तांना केलेली मदत आहे, काणकोणच्या नावाने कॉंग्रेसची तिजोरी भरण्यासाठी नाही. कॉंग्रेसने पूरग्रस्ताची मस्करी केली आहे, अशी टीका श्री. डिमेलो यांनी यावेळी केली.
युवक कॉंग्रेसने हा निधी "काणकोण रिलीफ फंड' म्हणूनच जमवला होता, त्याचे पुरावेही आज श्री. डिमेलो यांनी पत्रकारांना दिले. आज त्यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण कॉंग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे आता कॉंग्रेस यावर कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढे बोलताना श्री. डिमेलो म्हणाले की, कॉंग्रेस पक्षही या घोटाळ्यात सामील असून त्यावर सारवासारव करण्यासाठी एन. शिवदास यांना पुढे करण्यात आले होते. मात्र तेही तोंडघशी पडले.
मदत निधी गोळा करण्याची शेवटी तारीख होऊनही तो निधी बॅंकेत का जमा करण्यात आला नाही. "काणकोण रिलीफ फंड' या नावाने बॅंक खाते का खोलण्यात आले नाही. कोणकोण पूरग्रस्तांच्या नावाने जमवलेले पैसे पक्षाच्या खात्यात का जमा केले. निधी जमवण्यासाठी किती कुपन छापण्यात आली होती. किती लोकांनी मदतीसाठी धनादेश दिले होते, या सर्वांची माहिती उघड करण्याचे आव्हान राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिले असून कॉंग्रेस पक्षाने त्वरित या प्रश्नांची उत्तरे जनतेला देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वडीलभाऊ आहे तर, माग त्या कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत भ्रष्टाचाराचे "बाप' असल्याची टीका करून श्री. डिमेलो यांनी मुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली. कॉंग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीचा वडीलभाऊ आहे, त्यामुळे या पक्षाने कॉंग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असा टोला काल संकल्प आमोणकर यांनी लावला होता.
दिगंबर कामत यांचे सरकार "आयसीयू'त पोचले होते, तेव्हा ते सरकार केवळ जुझे फिलीप यांच्यामुळे तरले होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि युतीच्या सरकारमध्ये असलेले मंत्री भ्रष्ट आहेत, त्यांच्या भानगडी आहेत असे म्हणता, मग त्या सरकारचे मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे "बाप' असल्याचा पलटवार डिमेलो यांनी यावेळी केला.
त्याचप्रमाणे, काणकोण पूरग्रस्त मदत निधीत घोटाळा झाला आहे हा आरोप राष्ट्रवादीने केलेला नसून काही महिन्यांपूर्वी खुद्द युवक कॉंग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने केला होता. त्याने याची तक्रार कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडेही इमेलद्वारे केली होती. मात्र त्याला युवक कॉंग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे. युवक कॉंग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष तन्वीर खतिब यांनी ईमेल द्वारे ही तक्रार केली होती, अशी माहिती यावेळी डिमेलो यांनी दिली.
तन्वीर खतिब याच्या तक्रारीत असलेले मुद्दे...
१) युवक कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान नाही.
२) संघटनेत लोकशाही पद्धत नाही.
३) कोणताही विचार न करता संकल्प आमोणकर घेत असलेलेच निर्णय सर्वांवर लादले जातात.
४) ८० टक्के कार्यक्रम हे प्रसिद्धीसाठी केले जातात. नेते पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी मिळवतात व त्याची कात्रणे काडून राष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात.
५) ४० वर्षांच्या तरुणांनीही मागील दरवाजातून युवक कॉंग्रेसमध्ये स्थान बळकावले आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी युवक कॉंग्रेसच्या नावाने आपली ओळखपत्रे छापली आहेत. काहींनी लेटरहेडही छापली आहेत. त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला जातो.
६) गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.
७) काणकोण पूरग्रस्तांसाठी जमवण्यासाठी छापलेली कुपन आणि जमवलेल्या निधीचा ताळमेळ बसत नाही. ३० लाख रुपये जमवण्यासाठी ही कुपने छापली आहेत. त्याचप्रमाणे धनादेश आणि डीडी द्वारेही निधी गोळा करण्यात आला आहे.

No comments: