Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 6 September 2010

जिल्हा इस्पितळात ९ पासून "ओपीडी'

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - म्हापसा येथे नव्याने बांधलेले व रेंगाळत पडलेले जिल्हा इस्पितळ अखेर ९ सप्टेंबर रोजी सुरू केले जाणार असल्याची माहिती आज आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने या इस्पितळात निदान "ओपीडी' तरी तातडीने सुरू केली जावी, अशी जोरदार मागणी केली होती. तसेच, "पीपीपी'तत्त्वावर हे इस्पितळ चालवायला द्यायलाही विरोध केला होता.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात झालेल्या एका कार्यक्रमानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. येत्या ९ सप्टेंबर पासून जिल्हा इस्पितळ सुरू होणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ९ आणि १० सप्टेंबर रोजी "मेडिसीन' विभाग आणि बालरुग्ण विभाग सुरू केले जाणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. याठिकाणी "ओपीडी' सुरू झाल्यानंतर शवागरही या नव्या इस्पितळात हालवले जाणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
सध्या जुन्या आझिलो इस्पितळावर प्रचंड ताण पडलेला असून रुग्णांनाही योग्य वागणूक तसेच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहे.
आझिलोमध्ये रुग्णाबरोबर आलेल्या एका महिलेवर भली मोठी फोटो फ्रेम डोक्यावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली होती. मात्र ती महिला यात गंभीर जखमी झाली होती. नव्या इमारतीत ओपीडी सुरू झाली तरी, जुन्या इस्पितळातील ओपीडी सुरूच राहणार आहे, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन बांधण्यात आलेल्या इस्पितळाला "पीपीपी'द्वारे चालवायला कंपनी मिळत नसल्याने काही वर्षापासून ही इमारत अशीच पडून होती. तसेच, आतील अद्ययावत यंत्रणाही मोडकळीस आली असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. कोणत्या कंपनीला हे इस्पितळ चालवायला द्यावे, यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या इमारतीत सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूकही करण्यात आल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली.

No comments: