सावधानतेचा जनतेला इशारा
मुंबई, दि. १० : सर्व दुःखांचे हरण करणाऱ्या विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा उत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात घातपात घडवण्यासाठी दोघे परदेशी अतिरेकी मुंबईत घुसले असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, मुंबईतील नागरिकांना सतर्क राहण्याचा व सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोन विदेशी संशयित अतिरेकी मुंबईत घुसले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन घातपात घडवण्याचा त्यांचा कट आहे. कलीमुद्दीन खान ऊर्फ रामेश्वर पंडित (वय २५) आणि हाफिज शरीफ (वय २८) अशी या दोन संशयित अतिरेक्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी आज दिली. एवढेच नव्हे तर या दोघा संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रेही पोलिसांनी जारी केली आहेत. या दोघांची माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांच्या २२६३३३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची धामधूम सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच, अतिरेकी हल्ल्याचे सावट निर्माण झाल्याने पोलिस तसेच सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
Saturday, 11 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment